गेल्या १४ वर्षांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाला आता सीरियात नवे वळण मिळाले आहे. असद कुटुंबाची गेल्या ५३ वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून राजधानी दमास्कसवर बंडखोरांनी यश मिळवले आहे. सीरियाचे राष्ट्रपती बशर अल-असद यांची राजवट संपली आहे. त्यांनी रशियात पलायन केले आहे आणि सीरियातील गृहयुद्धात ५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियाच्या राजकीय स्थितीचा काय परिणाम होणार आहे, याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.


१. सीरियामधील गृहयुद्धाचा मध्यपूर्वेत होणारा परिणाम
या अगोदर लिबियातील मुअम्मर गद्दाफी, ट्युनिशियातील बेन अली, येमेनमधील अली अब्दुल्लाह सालेह, इजिप्तचे होस्नी मुबारक आणि आता सीरियाचे बशर अल-असद. या सर्वांच्या राजवटी टप्प्याटप्प्याने कोसळल्या आहेत. वर्ष २०११ मध्ये अरब स्प्रिंगच्या आंदोलकांनी ज्या नेत्यांना हुकूमशाह म्हटले होते, त्या सगळ्यांची गच्छंती झाली आहे. सीरियातील ‘बाथ पार्टी’चे अध्यक्ष बशर अल-असद सरकारच्या विरोधात झालेल्या बंडाचे परिणाम मध्यपूर्वेत नवी भूराजकीय समीकरणे निर्माण करू शकतात. या बंडाचा मोठा परिणाम इराणवर होणार आहे. सीरियाच्या माध्यमातून इराण हा लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि गाझामधील हमास संघटनेला लष्करी साहाय्य पुरवत असे. सीरियातील सत्तापालट हा इराणच्या ‘अॅक्सिस ऑफ रेसिस्टन्स’ला (प्रतिकाराची आस) मोठा धक्का आहे. सीरियामधील गृहयुद्धाच्या वेळी रशियाचा सीरियाला राजनैतिक आणि लष्करी पाठिंबा होता. त्याच माध्यमातून रशिया स्वतःचा सामरिक प्रभाव मध्यपूर्वेत टिकवून होता; पण युक्रेन युद्धानंतर रशियाला आता सीरियाला राजकीय आणि लष्करी साहाय्य करण्याच्या मर्यादा स्पष्ट दिसत आहेत.
२. सीरियातील पालटलेल्या राजवटीचा पश्चिम आशियावर होणारा परिणाम
इराण आणि रशिया यांच्या राजकीय, आर्थिक अन् लष्करी पाठिंब्यावर बशर अल-असद सरकार २ दशके सीरियात सत्तेवर होते. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यातील युद्धानंतर मध्य आशियात अनेक नवीन सामरिक समीकरणे निर्माण झाली. हमास आणि लेबनॉन येथील महत्त्वाच्या सर्वोच्च कमांडरवर त्यात इस्माईल हनिया, हसन नरसुल्ला आणि याह्या सिनवार हे इस्रायलने केलेल्या लष्करी कारवाईत मारले गेले. त्यामुळे सध्या तरी इराणचे सर्व ‘प्रॉक्सी नेटवर्क’ (छुपे जाळे) उद़्ध्वस्त झालेले दिसत आहे. सीरियातील असद राजवट ‘हयात तहरीर अल-शाम (एच्.टी.एस्.)’ने उलथवून टाकल्याने इराण मोठ्या प्रमाणात कमकुवत होईल. ज्याचा थेट परिणाम पश्चिम आशियातील शक्ती संतुलनावर होणार आहे. सीरियामध्ये इराणचे कमकुवत होणे, हा त्याच्या प्रतिष्ठेला आणि प्रादेशिक रणनीतीला मोठा धक्का आहे. या क्षेत्रात तुर्कीयेला मोठी आघाडी मिळणे, हे इराणसाठी मोठे चिंतेचे कारण आहे. इराणने पश्चिम आशियातील सत्तेच्या केंद्रस्थानी रहाणे भारताच्या हिताचे आहे. इराण कमकुवत झाला, तर सुन्नी राज्यकर्त्यांचा प्रभाव या क्षेत्रात वाढेल आणि ते पाकिस्तानला काश्मीर प्रश्नावर राजनैतिक समर्थन देऊ शकतात.
३. सीरियावर अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादल्याने झालेले परिणाम

सीरियामध्ये तेल आणि वायू यांचे महत्त्वपूर्ण साठे आहेत; परंतु युद्धामुळे त्या साठ्याचा लाभ घेण्याच्या क्षमतेत लक्षणीय घट डिसेंबर २०१९ मध्ये दिसू लागली. त्यातच अमेरिकेने सीरियावर आर्थिक प्रतिबंध आणणारा ‘सीजर अॅक्ट’ लागू केल्याने सीरियातील तेलाचे उत्पादन घटले. अमेरिकेने सीरियाच्या सरकारसह काम करणार्या व्यक्तींवर आर्थिक निर्बंध लादले. त्याचे परिणाम सीरियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. सीरियन सैनिकांचे वेतन, शस्त्रे यांवर सरळ परिणाम झाला. त्यासह लोकांच्या रहाणीमानात प्रचंड घसरण झाली. भ्रष्टाचार इतका वाढला की, लोकांना अन्न मिळवण्यासाठी हाल सोसावे लागले. याचा सैन्यदलाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला. त्यामुळे लष्कराच्या उच्च पदावर असलेले अल असदचे शिया अलावी समुदायाचे जनरल एकाकी पडले.
४. सीरियाच्या अधोगतीचे कारण
इराण, हिजबुल्लाह आणि रशिया यांनी साहाय्य बंद करणे, हे सीरियाच्या अधोगतीचे मोठे कारण ठरले. मर्यादित साधनांसह अनेक दशकांपासून बशर असद राजवटीचे संरक्षण करणारे सैन्यदल हे अल-कायदाचा सहकारी गट असलेल्या ‘हयात तहरीर अल-शाम’ या बंडखोर संघटनेच्या पुढे टिकू शकले नाही. दोन कारणांमुळे त्यांच्या सैनिकांची संख्या घटली. एक तर युद्धात अनेक सैनिक मारले गेले आणि दुसरे म्हणजे अनेक सैनिकांनी बंडखोर गटांशी हातमिळवणी केली. सीरियाच्या हवाई दलाला बंडखोर गट आणि अमेरिकेच्या हवाई दलाशी सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या हवाई दलाची शक्ती न्यून झाली होती. सीरियातील या घडामोडीचे परिणाम जॉर्डनसह इतर शेजारी राष्ट्रांवर येण्याची चिन्हे दिसत आहेत. सीरियाच्या विस्तीर्ण वाळवंटात तथाकथित इस्लामी स्टेटचे वाचलेले काही भागही या परिस्थितीचा लाभ घेऊ शकतात. सीरियामध्ये इस्लामी कट्टरतावाद्यांना मिळालेल्या यशामुळे त्यांच्या देशातील असंतुष्ट कट्टरतावादी गटांना प्रोत्साहन मिळू शकते.
५. सीरियाच्या राजकीय अस्थिरतेचा पश्चिम आशियाई प्रदेशात होणारा परिणाम
सीरियातील राजकीय अस्थिरतेचा लाभ आता इस्रायलने घेऊन ‘ग्रेटर इस्रायल’चे धोरण नव्याने आखण्यास प्रारंभ केला आहे. जून १९६७ च्या अरब-इस्रायलच्या ६ दिवसांच्या युद्धानंतर इस्रायलने सीरियाच्या सीमेवरील विवादित गोलान हाईट्सचा ‘बफर झोन’ (तटस्थ क्षेत्र) कह्यात घेण्यास प्रारंभ केला आहे. इस्रायल-गाझा युद्धामुळे आधीच मध्यपूर्वेत प्रचंड तणाव असतांना आता सीरियातील युद्धामुळे मध्यपूर्वेवर अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत. सीरियाच्या भवितव्यात अमेरिकेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे; कारण कुर्दिश नियंत्रणाखाली असलेल्या सीरियाच्या पूर्व भागात अजूनही अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती आहे. सीरियातील राजकीय संकटानंतर या सर्व बाह्य शक्ती आता सीरियात आपापले महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. असद राजवटीच्या अस्तानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत स्वतःचे हित साधण्यासाठी या शक्ती नवीन व्यूहरचनात्मक मांडणी करण्याचा प्रयत्न करतील. यामुळे केवळ या प्रदेशाचीच नाही, तर जगाची चिंता वाढली आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची सत्ता उलथवून निर्माण झालेली सत्तेची पोकळी पश्चिम आशियाई प्रदेशात अनेक नवीन सामरिक समीकरणे निर्माण करील.
– डॉ. तुषार गंगाराम रायसिंग, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (११.१२.२०२४)
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
आपण हिंदु धर्माविषयीच्या द्वेषाच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ! – US Congressman Sanford Bishop
(म्हणे) ‘मानवाधिकारांचे उल्लंघन झाल्यास भारतावर टीका करण्यास मागेपुढे पहाणार नाही !’ – US Lawmakers
‘श्रद्धे’चा बाजार !
‘जीवोत्तम विद्यापीठ’ : भारतीय ज्ञानपरंपरेचे आधुनिक पुनरुज्जीवन !