हुपरी येथील अवैध मदरशावर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या आमरण उपोषणास प्रारंभ : आज महाआरती !

आमरण उपोषणास बसण्यापूर्वी उपस्थित असलेले हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) – येथील सुन्नत जमियतने उभारलेल्या अवैध मदरशावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ श्री. नितीन काकडे यांच्यासह शिवसेनेचे श्री. राजेंद्र पाटील, बजरंग दलाचे श्री. प्रशांत साळोखे आणि श्री. प्रतापराव भोसले यांनी हुपरी नगर परिषदेसमोर २३ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. नगरपालिका प्रशासनाने कारवाई न केल्यास २४ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता उपोषणस्थळी महाआरती आणि २५ सप्टेंबरला ‘हुपरी बंद’ची चेतावणी देण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन हुपरी नगर परिषदेत देण्यात आले.

आमरण उपोषणास बसलेले हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेले हिंदुत्वनिष्ठ

उपोषण चालू करण्यापूर्वी हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबामातेच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आंदोलनास यश देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली. यानंतर आंदोलकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठ हे उपोषणस्थळी चालत गेले आणि उपोषण चालू करण्यात आले.

या आंदोलनास गोकुळ दूधसंघाचे संचालक आणि शिवसेनेचे श्री. मुरलीधर जाधव, बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. सागर मेथे, दुर्गवेध प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. प्रवीण पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका कार्यवाह श्री. अजित सुतार, वीर शिवा काशीद प्रतिष्ठानचे श्री. निळकंठ माने यांसह विविध संघटना पक्ष, हिंदुत्वनिष्ठ यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

संपादकीय भूमिका

  • अवैध मदरसे निर्माणच होऊ न देणे हे शासनाचे कर्तव्य असतांना हिंदुत्वनिष्ठांना ते पाडण्यासाठी उपोषण करावे लागणे, हे दुर्दैवी !
  • जनतेला समस्या सोडवण्यासाठी आमरण उपोषण करायला लावणारे प्रशासन विसर्जित करा !