तिकीट निरीक्षकाला हॉकी स्टिकने मारहाण !
नालासोपारा – येथे रेल्वेस्थानकात तिकीट निरीक्षक विजयकुमार पंडित यांना एका प्रवाशाने हॉकी स्टिकने मारहाण केली. यात ते गंभीर घायाळ झाले आहेत. संबंधित प्रवासी द्वितीय श्रेणीचे तिकीट घेऊन प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत होता. त्याला ३४५ रुपये दंड ठोठावल्यावर झालेल्या वादातून त्याने मारहाण केली. आक्रमणकर्ता प्रवासी फरार आहे.
संपादकीय भूमिका : समाजातील दिवसेंदिवस वाढणारी हिंसक वृत्ती धोकादायक !
१ लाखांची लाच घेतांना ग्रामविस्तार अधिकारी अटकेत !
जळगाव – येथील पारोळा तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत संमत झालेल्या ६० लाख रुपयांच्या कामांचा कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना ग्रामविस्तार अधिकारी सुनील पाटील आणि साहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) कल्पेश बेलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
संपादकीय भूमिका : लाचखोरांचा भरणा असणारे प्रशासन !
कोस्टल रोड १७ घंट्यांसाठी चालू !
मुंबई – कोस्टल रोड प्रकल्पातील वाहतूकव्यवस्था आठवड्यातील सातही दिवस सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालू रहाणार आहे. रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.
आमदार भरत गोगावले एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष !
मुंबई – शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची एस्.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्तीचे आदेश २० सप्टेंबर रोजी पारित करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर येथे ५० कर्मचार्यांना विषबाधा !
छत्रपती संभाजीनगर – शहरातील शेंद्रा एम्.आय.डी.सी.तील लिबेर आस्थापनातील जवळपास ४० ते ५० कर्मचार्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. उपाहारगृहातील काही पदार्थ खाल्ल्याने आस्थापनातील कर्मचार्यांना उलट्या चालू झाल्या. रुग्णांवर शहरातील आदर्श रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. ही घटना २० सप्टेंबर या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.