छत्रपती शिवाजी महाराज कथेस प्रारंभ !
सोलापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या, असे गौरवोद्गार अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी काढले. सकल हिंदु समाजाच्या वतीने जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथेस १९ सप्टेंबरला प्रारंभ झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. कथेच्या पहिल्या दिवशी ‘शिवजन्म पूर्वकाळ, तत्कालीन परिस्थिती ते शिवजन्म’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
प.पू. स्वामी गोिवंददेव गिरि महाराज म्हणाले, ‘‘छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी मोगलांनी भारतातील अनेक हिंदु साम्राज्ये उद्ध्वस्त करून हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. मोगलांकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, आपसांतील भांडणे आणि त्यातून भारतासमोर निर्माण होणार्या समस्या मातोश्री जिजामाता पहात होत्या. ही परिस्थिती पालटून टाकावी, अशी शहाजी महाराज आणि जिजामाता यांची मनोमन इच्छा होती. ही इच्छा उराशी घेऊनच जिजामातांनी छत्रपती शिवरायांना जन्म दिला. जिजामातेच्या अंत:करणातील भगवद्भक्तीप्रमाणे सध्याच्या महिला-भगिनींनीही देव, देश आणि धर्म यांविषयी श्रद्धा बाळगली पाहिजे.’’
‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सल्लागार समिती सदस्य आणि प्रसिद्ध लेखापरीक्षक श्री. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी सूत्रसंचालन केले.