रेल्वे अपघाताचा प्रयत्न करणारे संशयित २७ वर्षांनंतर कह्यात !

पुणे – पुणे-दौंड-सोलापूर लोहमार्गावर चेन्नई एक्सप्रेस लुटण्यासाठी घातपाताचा प्रयत्न केलेल्या २ संशयितांना दौंड लोहमार्ग पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पिंट्या काळे आणि सुभाष पवार अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर लोहमार्गावर उरळी कांचन ते यवत रेल्वे स्थानकाच्या दरम्यान २ मे १९९७ या दिवशी मध्यरात्री संशयितांनी लोहमार्गावर मोठे दगड रचून चेन्नई एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो फसला. यामध्ये एक्सप्रेसच्या डिझेल इंजिनच्या दर्शनी भागाची हानी झाली होती. दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात रेल्वे अधिनियम कलम १५० (गाडीचा नाश करणे किंवा तसा प्रयत्न करणे, तसेच प्रवासी व्यक्तीची सुरक्षितता धोक्यात आणणे) अन्वये गुन्हा नोंद केला होता; मात्र हे दोन्ही संशयित पसार होते. लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी संशयितांना कह्यात घेतले. दोघांना कह्यात घेताना संशयितांच्या कुटुंबियांकडून प्रतिकार किंवा आक्रमण होण्याचा धोका होता; मात्र दक्षता घेऊन पोलीस पथकाने कारवाई केली. न्यायालयाने त्यांना येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. पुणे लोहमार्ग अधीक्षक, अपर अधीक्षक, उपअधीक्षक, तसेच ३ हवालदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.

संपादकीय भूमिका

  • पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे २७ वर्षांनंतर आरोपी कह्यात येत असल्यामुळे गुन्हेगारांची संख्या वाढत आहे, हे दुर्दैवी !
  • एवढ्या वर्षांनंतर संशयितांना कह्यात घेतले जाते, ही पोलिसांची निष्क्रीयताच नव्हे का ?