पणजी, १६ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील सुमारे २ महिन्यांमध्ये उत्तर गोव्यातील हणजूण, वागातोर, शापोरा, ओझरान आणि शिवोली या परिसरातील ‘व्यवसाय करण्यास अनुमती न घेतल्याने (‘कन्सेंट टू ऑपरेट’ नसणे) सुमारे २७ आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावलेल्या आहेत; मात्र यामधील अनेक प्रसिद्ध उपाहारगृहे आणि नाईट क्लब अजूनही चालूच आहेत.
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वागातोर येथील ‘ड्रीम बीच’, ‘डिस्को व्हॅली’ आणि ‘मेंगो ट्री’, आसगाव येथील ‘बारफ्लाय’, ‘द आसा हाऊस’ आणि ‘व्हिला २५९’ आणि हणजूण येथील ‘बॉब केपर’, ‘द फ्लायिंग गोवा’, ‘डायनामो’ आणि कुप्रसिद्ध ‘कर्लीस’ या प्रसिद्ध आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याची नोटीस पाठवलेली आहे; पण या आस्थापनांनी त्यांचे व्यवसाय राजरोसपणे चालूच ठेवले आहेत. या सूचीमध्ये ‘कर्लिस’ या कुप्रसिद्ध क्लबचाही समावेश आहे. राष्ट्रीय हरित लवादाने चालू वर्षी जून महिन्यांत अनेक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘कर्लिस’चे बांधकाम पाडण्याचा आदेश दिलेला आहे. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावूनही त्याचा ‘कर्लीस’च्या व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही. केवळ ‘रईथ’ आणि ‘झीकी’ या २ आस्थापनांनी नोटीस मिळाल्यावर त्यांचे व्यवसाय बंद ठेवलेले आहेत.
मंडळाचे दायित्व केवळ नोटीस बजावण्यापुरते मर्यादित, तर कारवाई करण्याचे दायित्व प्रशासनाकडे !
अशा प्रकरणांमध्ये गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दायित्व हे केवळ जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत नोटीस पाठवण्यापुरते मर्यादित आहे आणि ही आस्थापने बंद करण्याचे दायित्व हे स्थानिक प्रशासनाचे आहे. जिल्हाधिकार्यांनी नोटीस बजावलेले एखादे आस्थापन बंद झाल्यानंतर त्यासंबंधीचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवायचा असतो; मात्र आस्थापन बंद केल्याचा अहवाल मंडळाला उशिरा मिळतो किंवा अनेक वेळा मिळत नाही. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांच्या मते प्रशासन अन् पोलीस यंत्रणा अशा क्लबवर कारवाई करण्यास डोळेझाक करतात. स्थानिक नागरिक डेस्मंड डिकोस्ता एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतांना म्हणाले, ‘‘नोटीस बजावूनही चालू ठेवण्यात आलेल्या आस्थापनांविषयी मी स्थानिक पंचायत आणि प्रशासन यांना पत्र लिहिले आहे.’’
संपादकीय भूमिकागोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्यक्षात जाऊन क्लब बंद पाडण्याचे अधिकार नसल्याचे क्लबवाल्यांना ठाऊक आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांच्याशी संगनमत साधून क्लब अनधिकृतरित्या चालू आहेत ! |