बांगलादेशामधील हिंदूंची स्थिती आणि त्यांच्या संरक्षणासाठी भारताने उचलावयाची पावले !


बांगलादेशातील राजकीय पक्षांनी हिंदूंची भूमी चोरी करण्याची टक्केवारी

ढाका विद्यापिठाचे प्रा. अबुल बरकत यांनी ‘An Inquiry into Causes and Consequences of Deprivation of Hindu Minorities in Bangladesh through the Vested Property Act’ या पुस्तकात ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९७२’द्वारे हिंदूंच्या भूमी चोरीचे आणि अन्यायाचे पुराव्यासह अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या निर्बंधामुळे बांगलादेशातील ४० टक्के हिंदु कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यात जवळपास ७.५ लाख शेतीवंचित कुटुंबे समाविष्ट होती. परिणामी हिंदु कुटुंबांनी गमावलेल्या एकूण भूमींचा अंदाज १६.४ लाख एकर इतका आहे, जी हिंदु समाजाच्या मालकीतील एकूण भूमीच्या ५३ टक्के आहे आणि बांगलादेशाच्या एकूण भूमीच्या ५.३ टक्के आहे.

प्रा. अबुल बरकत यांच्या सर्वेक्षणानुसार हिंदूंच्या भूमीची सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी चोरी केली आहे. बांगलादेशातील हिंदूंनी या निर्बंधान्वये वर्ष २००१ ते २००६ या ६ वर्षांतच अनुमाने २२ लाख एकर स्थावर आणि जंगम मालमत्ता गमावली आहे, जे बांगलादेशाच्या (त्या वेळच्या वर्ष २००७ च्या) सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (‘जीडीपी’च्या) ५० टक्क्यांहून अधिक आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

१. बांगलादेशातील १६ टक्के हिंदू गेले कुठे ?

बांगलादेशात नुकतेच महंमद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले. सरकारच्या बैठकीत हिंदूंच्या सुरक्षेविषयी चर्चा केली गेली. तेथील ५२ जिल्ह्यांत हिंदूंवर २०० हून अधिक आक्रमणे झाली. बांगलादेशातील युनूस सरकारने हिंदूंवर झालेल्या हिंसेविषयी चिंता व्यक्त केली. बांगलादेशातील हिंदु आपल्या सुरक्षेविषयी अत्यंत घाबरले आहेत, तर काहींनी भारतीय सीमेवर पलायन केले आहे.

आज २ कोटी हिंदू बांगलादेशामध्ये आहेत. पाकिस्तानातील हिंदूंची संख्या वर्ष १९५० मध्ये ८ ते ९ टक्के होती, ती आज ५ लाखांवर, म्हणजे १ टक्क्यांहून न्यून झालेली आहे. पूर्व पाकिस्तानात (आताच्या बांगलादेशात) फाळणीनंतर वर्ष १९५० मध्ये २४ ते २५ टक्के हिंदू होते. बांगलादेशात आज केवळ ८.६ टक्के हिंदूच शिल्लक राहिले आहेत. बाकी १६ टक्के हिंदू गेले कुठे ? ते मारले गेले किंवा त्यांनी धर्म परिवर्तन केले किंवा काही भारतामध्ये पळून आले.

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

२. अल्पसंख्यांक बांगलादेशी भारतात पळून येण्यामागील कारणे

शेख हसीना यांच्या सरकारपुढील इस्लामी मूलतत्त्ववादाचे आव्हान अत्यंत बिकट होते. अवघ्या ५ दशकांपूर्वी ‘एक धर्म एक राष्ट्र’, अशा वैचारिक मांडणीस पूर्णपणे नाकारून बंगाली अस्मितेवर आधारलेल्या राष्ट्रवादाचा पुरस्कार केलेल्या बांगलादेशामध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाच्या प्रभावामुळे ‘आमार शोनार बांगला’ची (आमच्या सोन्यासारख्या बंगालची) वाटचाल आता वहाबी मूलतत्त्ववादाकडे चालू आहे. हिंदु, ख्रिस्ती, बौद्ध हे अल्पसंख्यांक जीव मुठीत घेऊनच रहात आहेत. त्यांना येथील कडव्या मूलतत्त्ववाद्यांच्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक बांगलादेशींचे भारतात पळून येण्याचे प्रमाण वाढू शकते.

३. बांगलादेशातील हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी पुरोगामी, निधर्मीवादी, बुद्धीवादी, मानवतावादी गप्प का ?

वर्ष १९७१ च्या युद्धात झालेला ३५ लाख हिंदूंचा वंशविच्छेद अमेरिकन पत्रकार गॅरी बासला जगासमोर आणावा लागला. अमेरिकन ज्यू आणि मानवतावादी कार्यकर्ता डॉ. रिचर्ड बेन्किन बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर वैचारिक आणि कायदेशीर मार्गाने लढत आहे. भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी (सेक्युलर्स), मानवतावादी, बुद्धीवादी विचारवंत बांगलादेशात होणार्‍या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी काही अपवाद वगळता गप्प का बसतात ?

४. तत्कालीन पश्चिम पाकमधील भारतियांची संपत्ती पाकने कह्यात घेणे आणि तेच धोरण पुढे बांगलादेश स्वतंत्र झाल्यावरही चालू रहाणे

भारतात स्थलांतरित झालेल्यांची संपत्ती बांगलादेश सरकारने कह्यात घेतली. पाकिस्तानने वर्ष १९६५च्या युद्धाच्या वेळी भारतियांना शत्रू घोषित करून ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’ लागू करून भारतियांची (मुख्यत्वेकरून हिंदु आणि बौद्ध यांची) पूर्व अन् पश्चिम पाकिस्तानात असलेली संपत्ती कह्यात घेतली होती. बांगलादेशाने स्वातंत्र्यानंतर ‘Vesting of Property and Assets Order 1972’ (शत्रू संपत्ती निर्बंध १९७२) लागू करून यानुसार कुठल्याही निर्बंधाखालील पाकिस्तान सरकारच्या किंवा मंडळाच्या आणि भूतपूर्व पाकिस्तानच्या कह्यातील अन् अधिपत्याखालील सर्व संपत्ती, तसेच मालमत्ता बांगलादेश सरकारकडे हस्तांतरित केली. पश्चिम पाकिस्तानातील लोकांच्या ज्या संपत्ती पूर्व पाकिस्तानात होत्या, त्या या निर्बंधान्वये बांगलादेशाने कह्यात घेतल्याच; पण पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानने ‘शत्रू संपत्ती निर्बंध १९६५’नुसार भारतियांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची जी संपत्ती कह्यात घेतली होती, तीसुद्धा बांगलादेश सरकारच्या कह्यात गेली. बांगलादेशाच्या राज्यघटनेप्रमाणे भारत शत्रूराष्ट्र नाही, तरीही भारतियांची किंवा भारतात स्थलांतरित झालेल्यांची संपत्ती बांगलादेश सरकारने कह्यात घेतली.

पाकिस्तान सरकारने कह्यात घेतलेली संपत्ती बांगलादेशाने त्यांच्या मूळ मालकाला परत केली नाहीच, उलट दिवसेंदिवस त्या संपत्तीच्या सूचीमध्ये वाढ करत राहिले, तसेच राज्य अधिग्रहण कार्यालयातील तहसीलदार आणि इतर कर्मचार्‍यांना ‘त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रामध्ये कोणतीही लपवलेली निहित (Vested) संपत्ती शोधून काढली किंवा सादर केली, तर त्यास योग्य ते पारितोषिक दिले जाईल’, असे घोषित करून एक प्रकारे निहित संपत्तीच्या सूचीत नवीन भर घालण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले.

५. बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारताने त्याला जाणीव करून देणे महत्त्वाचे !

बांगलादेशातील पालटलेल्या परिस्थितीत भारताने तेथील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. भारताने त्या देशाला साहाय्य करतांना सावध राहून अल्पसंख्यांक हिंदूंचे संरक्षण होते का ? हे पहायला हवे. बांगलादेशात हिंदूंचा छळ झाला, तर त्याचे परिणाम भारतासमवेतच्या संबंधांवर होतील आणि ते परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे, याची जाणीव बांगलादेशाला करून द्यायला हवी. तेथील हिंदूंच्या संरक्षणासाठी भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरून दडपण आणले पाहिजे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

संपादकीय भूमिका

भारतातील तथाकथित पुरोगामी, निधर्मीवादी, मानवतावादी, बांगलादेशात होणार्‍या हिंदु-बौद्ध हत्याकांडाविषयी गप्प का ?