दुसर्या महायुद्धात रशियाने पोलंडवर केलेल्या आक्रमणानंतर पोलंडमधून सहस्रो नागरिक बाहेर पडले. पोलंडने जगभरातील देशांना पोलीश निर्वासितांना आश्रय देण्याचे आवाहन केले; परंतु अनेकांनी त्यांचे दरवाजे बंद केले होते. त्या वेळी भारतात ब्रिटिशांचे राज्य असल्याने गुजरातमधील जामनगरच्या नवानगर संस्थानच्या महाराजांनी १ सहस्र, तर कोल्हापूरच्या करवीर संस्थानच्या राजाराम महाराजांनी वडीवळे गावात ६ सहस्र पोलीश नागरिकांना आश्रय दिला. त्यांनी केवळ आश्रय दिला नाही, तर अक्षरशः शेकडो घरे बांधून सर्व सुखसोयींनी युक्त असे गावच तिथे उभारून त्यांच्या सर्व गरजा भागवल्या. ६ वर्षे त्यांना संरक्षण दिले. या उपकारांची जाणीव पोलंडवासियांनी वेळोवेळी ठेवली. आजही पोलंडमधील पर्यटक कोल्हापूरला भेट देतात. कोल्हापूरला आलेल्या पूरपरिस्थितीत, तसेच युद्धकाळात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर पडण्यासाठी विमानतळ उपलब्ध करून देऊन पोलंडवासियांनी भारताला साहाय्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोलंड दौर्याच्या निमित्ताने भारताच्या सौहार्दाचा, सर्वांना सामावून घेण्याच्या वृत्तीचा हा इतिहास पुन्हा एकदा पुढे आला.
युद्ध‘विधान’ !
भारत त्याच्या सहिष्णुतेसाठी जगप्रसिद्ध आहे. सर्व देशांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे भारताचे धोरण आहे. मोदी शासनाच्या काळात भारताने अनेक देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. भले काही देश एकमेकांचे शत्रू असले, तरी भारत त्या सर्वांशी संबंध ठेवून आहे. एकमेकांचे शत्रू असलेल्या इस्लामी देशांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून मोदी शासनाने एका कणखर आंतरराष्ट्रीय नीतीचा प्रत्यय दिला. आज जगभरात युद्धाचे सावट आहे; परंतु आंतरराष्ट्रीय दौर्यांमध्ये अनेकदा पंतप्रधान मोदी ‘हे युद्धाचे युग नाही, तर बुद्धाचे युग आहे’, असा संदेश देत असतात. असे बोलण्यामागे त्या त्या प्रसंगानुसार त्यांचे अनेक हेतू असू शकतात, हे तर उघडच आहे. त्यात काही खरोखरच चांगले, तर काही राजकीय हेतूही असू शकतात, उदा. भारताची प्रतिमा उंचावणे, स्वतःची प्रतिमा उंचावणे, संबंधित देशाच्या शत्रूराष्ट्रांना संदेश देणे, त्या देशाला संदेश देणे आदी. ‘पंतप्रधान मोदी यांना नोबेल पारितोषिक हवे आहे, म्हणून ते हे सर्व करत आहेत’, अशी टीकाही त्यांच्यावर होत असते. पोलंडमध्येही त्यांनी अशाच आशयाचे वक्तव्य केले. पोलंड युक्रेनचा शेजारी देश आहे. युक्रेनने नुकतेच रशियामध्ये १० कि.मी.च्या पुढे सैन्य घुसवून परत युद्ध चालू केले आहे. २ दिवसांपूर्वी युक्रेनने रशियावर आतापर्यंतचे सर्वांत मोठे ड्रोन आक्रमण केले. पोलंडनंतर २३ ऑगस्टला पंतप्रधान युक्रेनमध्ये गेले आहेत. त्यामुळे सध्याचे प्रतिपादन हे या देशांना उद्देशूनही असू शकते. रशिया आणि भारत यांची मैत्री शस्त्रखरेदीमुळे वाढलेली आहेच. त्यामुळे हे विधान या संबंधांनाही पूरक आहे. सध्या युद्धात होरपळलेल्या युक्रेनमध्ये एका भारतीय पंतप्रधानाची ही ३० वर्षांनंतरची भेट आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर हे विधान पुनःपुन्हा अधोरेखित करावे, असे आहे.
शांतीसंदेशाचे प्रणेते !
मोदी नेहमीच एका दगडात अनेक पक्षी मारत असतात, त्याप्रमाणे युक्रेन दौर्यातही अनेक द्विपक्षीय करार होतील, जे भारताच्या भविष्यासाठी लाभदायक ठरतील. मागच्याच महिन्यात, म्हणजे जुलैमध्ये मोदी यांनी रशिया दौरा केल्याने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पुष्कळ अस्वस्थ झाले आणि त्यांनी ती अस्वस्थता प्रकटही केली होती. रशिया दौर्यातही पंतप्रधानांनी युक्रेनसमवेत युद्धविरामाचा संदेश दिला होता. तरीही झेलेन्स्की अप्रसन्न झाले किंवा त्यांनी तसे दाखवले. त्यानंतर आता लगेचच झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांना स्वतःहून आमंत्रित केले आहे. रशिया-भारत मैत्री ठाऊक असूनही भारताची तटस्थ रहाण्याची भूमिका आणि कुणाशीही ‘दगाबाजी’ न करण्याची वृत्ती यांमुळेच त्यांनी भारतावर हा विश्वास टाकला आहे. भारताच्या या प्रामाणिक भूमिकेमुळे एकीकडे भारताची शक्ती वाढत आहे आणि दुसरीकडे भारताची शक्ती वाढत असल्याने अन्य देशही त्याच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘भारताची शक्ती वाढणे’ किंवा ‘पंतप्रधान मोदी यांना ‘सर्वांना शांतीचा संदेश’ देण्याचा अधिकार प्राप्त होणे’, या दोन्हींमागे भारताची पृथ्वीव्याप्त करण्याची क्षमता ठेवणारी सनातन संस्कृती कारणीभूत आहे. एकीकडे ‘युद्धविरामासाठी साहाय्य करू’, असे रशियाला आश्वासन देणार्या पंतप्रधान मोदींना आमंत्रित करणे आणि दुसरीकडे रशियावरील आक्रमणे वाढवणे हे एकाच वेळी करणार्या युक्रेनचे गणित नेमके काय आहे ?, ते तेच जाणोत. पंतप्रधान मोदी यांनी रशिया, पोलंड (आणि आता कदाचित् युक्रेन) येथे जाऊन ‘शांतीसंदेश’ देणे आणि त्यांना युद्धापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे, हे वरवर पहाता सर्वच चांगले आहे. त्याच्या आतील सुप्त आंतरराष्ट्रीय धागेदोरे कदाचित् काही वर्षांनी उलगडतील किंवा उलगडणारही नाहीत. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मात्र ‘युद्धविरामाचा शांतीसंदेश देणारे’ म्हणून उजळून निघत आहे आणि निघेल, हे मात्र निश्चित !
भारतातही अंतर्गत युद्धविराम हवा !
राष्ट्रनिष्ठ भारतियांना त्यांच्या पंतप्रधानांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत असतांना त्यांचा अभिमान वाटतोच; मात्र त्याचसमवेत ‘पंतप्रधानांनी भारतात चाललेला प्रचंड गृहकलहही त्याच जोशाने मिटवावा’, अशी त्यांची अपेक्षा आहे; किंबहुना ‘सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही तो का मिटवला जात नाही ?’, असा प्रश्न त्यांना पडला आहे. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का नाही ? काश्मीर परत का धुमसले आहे ? नक्षलवादाचा पूर्ण बीमोड कधी ? पूर्वांचलातील आगडोंब कधी निवळणार ? आंदोलनाच्या माध्यमातून थेट जिवावर उठलेला खलिस्तानवाद कधी बंद होणार ? प्रतिदिन होणारी गोहत्या कधी थांबणार ? अनेक प्रकारचे जिहाद करणार्या धर्मांध जिहाद्यांना तत्परतेने कठोरात कठोर शासन का नाही ? हिंदूंवर आक्रमण करणार्यांवर नियंत्रण का नाही ? असे असंख्य प्रश्न त्यांना पडले आहेत. ‘जग शिक्षेवर चालते’, असे असतांना गुन्हेगारांना कठोर शिक्षा नाही; म्हणूनच गुन्हे घडत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला भेडसावणारा हा युद्धविराम कधी होणार ? येथे शांतता कधी प्रस्थापित होणार ? किती दिवस हिंदू जीव मुठीत धरून जगणार ? कठोर कायदा आणि सुव्यवस्था राबवणारे प्रशासन भारतात सर्वत्र निर्माण होण्यासाठी कठोर प्रयत्न केले गेले, तरी ५० टक्के स्थिती सुधारू शकते. भारतातील गृहयुद्ध थांबवण्यात मोदी यशस्वी झाले, तर खर्या अर्थाने ‘शांतीदूत’ म्हणून भारतीयच त्यांना पुढे आणतील !
‘युद्धाचे युग भारतियांनाही नको आहे’, हे जाणून भारतातील युद्धापूर्वीचे काळे ढग पंतप्रधान दूर करतील का ? |