विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, तक्रार पेटी, सुरक्षा समिती आदींची उपाययोजना !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई, २१ ऑगस्ट (वार्ता.) – बदलापूर येथील आदर्श शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, तक्रार पेटी लावणे, शाळेत सुरक्षा समिती गठीत करणे आदी विविध उपाययोजना सरकारने काढल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाने २१ ऑगस्टला याचा शासन आदेश काढला आहे.

यामध्ये शाळा आणि शाळेच्या परिसरात मोक्याच्या ठिकाणी १ महिन्याच्या आत ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्याचा आदेश सरकारने खासगी आणि शासकीय सर्व शाळांना दिला आहे. शाळेत सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी, साहाय्यक यांची नियुक्ती करतांना त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करावी, तसेच ६ वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी, असे आदेश सरकारने शाळांना दिले आहेत.

राज्यातील सर्व शाळांमध्ये तात्काळ तक्रार पेटी बसवण्याची सूचना सरकारने दिली असून यामध्ये दिरंगाई झाल्यास मुख्याध्यापकांना उत्तरदायी धरण्यात येणार आहे. विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी शाळा, केंद्र आणि तालुका स्तरावर ‘सखी सावित्री समिती’ची स्थापना झाली आहे ना ? याचा आढावा घेण्याची सूचनाही सरकारने केली आहे. यासह विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी शाळांमध्ये एका आठवड्यामध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करावी, असा आदेश सरकारने दिला आहे.

संपादकीय भूमिका :

लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मुळात समाजाची नैतिकता सुधारणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी दशेपासून नैतिकतेचे शिक्षण मिळावे, यासाठी शाळांमध्ये ते शिक्षण सरकारने चालू करावे !