ढाका – बांगलादेशात शेख हसीना सरकार उलथवून अंतरिम सरकार स्थापन केल्यानंतर नव्या मागण्यांसह निदर्शने आणि हिंसाचार चालू झाला आहे. बांगलादेशात १५ ऑगस्ट या दिवशी ‘शोक दिना’निमित्त सहस्रो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बांगलादेशची राजधानी ढाका येथील शहीद मिनार येथे विविध विद्यार्थी गटांच्या सहस्रो विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. या वेळी ‘माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देशात परत आणून त्यांच्यावर खटला चालवावा’, अशी मागणी त्यांनी केली.
बांगलादेशाचा इतिहास इस्लामी आधारावर लिहिला जाईल ! – जमात-ए-इस्लामी
बांगलादेशाच्या ‘शोक दिना’वर बहिष्कार घालतांना आंदोलन करणार्या जमात-ए-इस्लामी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आता बांगलादेशचा नवा इतिहास लिहिला जाईल, ज्यामध्ये त्याची ओळख बंगबंधूंशी नाही, तर इस्लामी आधारावर केली जाईल. आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरालाही घेराव घातला. अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. अवामी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.