विशाळगडावरील अतिक्रमणकर्त्यांवर प्रशासनाने गुन्हे नोंद का केले नाहीत ?

सकल हिंदु समाजाचा प्रशासनास संतप्त प्रश्न

कोल्हापूर, १२ ऑगस्ट (वार्ता.) – विशाळगडावर जो उद्रेक झाला, त्याला विशाळगडावर असलेले अतिक्रमणच कारणीभूत आहे. असे असतांना प्रशासनाने ९४ अतिक्रमणकर्त्यांचे गडावरील अतिक्रमण काढले; मात्र अतिक्रमणकर्त्यांवर गुन्हे का नोंद केले नाहीत ? गजापूर येथील ज्या लोकांना त्यांच्या घरांची हानी झाली, त्यांना प्रशासनाकडून साहाय्य करण्यात आले; मात्र त्यातील काही लोकांचेही विशाळगडावर अतिक्रमण आहे ! त्यामुळे हे एकप्रकारे अतिक्रमण करणार्‍यांनाच साहाय्य आहे ! त्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमणकर्त्यांवर प्रशासन कधी गुन्हे नोंद करणार आहे ? असा संतप्त प्रश्न सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर उपस्थित केला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

प्रशासनाने यापुढील काळात गुन्हे नोंद न केल्यास हिंदुत्विनष्ठ तीव्र आंदोलन करतील, अशी चेतावणीही या प्रसंगी देण्यात आली. सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना विशाळगड प्रकरणी निवेदन देण्यात आले. त्या वेळी हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

१. या प्रकरणी सर्व हिंदुत्वनिष्ठ जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाल्यावर प्रारंभी जिल्हाधिकार्‍यांनी अन्य कार्यालयीन व्यस्तता असल्याने निवेदन स्वीकारण्यास नकार दिला आणि निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन द्यावे, असे सुचवले; मात्र हिंदुत्वनिष्ठ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यावर ठाम होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

२. यानंतर काही थोड्या हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाधिकारी यांच्या कक्षात बोलावले, तर थोड्यांना आत सोडले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी काही काळ ठिय्या आंदोलन करून  सगळ्यांनाच आत बोलावण्याची आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे अखेर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्वच हिंदुत्वनिष्ठांना आत बोलावून सगळ्यांशी चर्चा केली.

३. अतिक्रमण, तसेच अन्य विषयांशी चर्चा झाल्यावर हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘विशाळगडावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाच्या फेसबुकवरच्या गटातील लोक तेथे नोटांची बंडले वाटतांना दिसली होती. या वाटपाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला असून हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला ? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.’’

या प्रसंगी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. कुंदन पाटील, बजरंग दलाचे शहर संयोजक श्री. अक्षय ओतारी, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महिला आघाडीच्या शोभाताई शेलार, हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. निरंजन शिंदे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, अर्जुन आंबी, किरण कुलकर्णी, अभिजित पाटील, अनिल चोरगे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू असून मंदिरांची तोडफोड चालू आहे आणि हिंदूंची दुकाने लुटली जात आहेत, तरी भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदनही सकल हिंदु समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन देण्यात आले.