श्रावण मासाच्या निमित्ताने…
लेखक : श्री. सर्जेराव आरबुने, श्री सागरेश्वर उत्कर्ष मंडळ,देवराष्ट्रे.
सह्याद्री पर्वताच्या रांगेचे शेवटचे टोक म्हणजे सांगली जिल्ह्यातील दक्षिण मध्य रेल्वेवरील ताकारी रेल्वे स्थानकापासून ४ किलोमीटर अंतरावर देवराष्ट्रे गावाजवळ सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ‘महाराष्ट्राची दक्षिण काशी’ संबोधले जाणारे तीर्थक्षेत्र सागरेश्वर आहे.
देवराष्ट्रे म्हणजे देवांचे राष्ट्र. हे राष्ट्र सागरेश्वराच्या परिसरातील १०८ लिंगे, १२ ओवया, ४७ राऊळे आणि ५ ऋषीमुनींची जिवंत समाधी या पवित्र साक्षीने चालले होते. येथील मुख्य स्थान समुद्रेश्वर आहे. आजही तेथे १०८ लिंगे आणि ४७ राऊळे आहेत. एक राऊळ दुसर्या राऊळाहून वेगळे. गणपति, त्र्यंबकेश्वर, नागेश्वर, देवी भवानी, भीमाशंकर, नागनरसिंह, ज्ञानेश्वर, कुसुमेश्वर, कामेश्वर, अरुणासहित, बारी आदित्य, दक्षेश्वर, भलीनाथ, वीरेश, विमलेश्वर, पार्वतीश्वर, वरूणेश्वर, कुबर, विश्वेश्वर, वीरभद्र, वृषेश्वर, चंद्रेश्वर आदी. चतुर्वक्रेश्वर, बिकेश्वर, चंद्रिकेश्वर देवतासहित कलमेष आणि विकल तीर्थांचा वास आहेच. शिवाय समुद्रेश्वराच्या अभिषेका प्रित्यर्थ पुष्करादी तीर्थ आहे. पूर्वी समुद्रेश्वराच्या अभिषेक प्रित्यर्थ पलूस (जिल्हा सांगली) येथून पान, दुधारी आणि दुधोंडीहून दूध, ताकारीहून ताक, दह्यारीहून दही, तुपारीहून तूप, लोणारीहून लोणी प्रतिदिन आणले जात असे, तसेच या सर्व पंचामृताने अभिषेक केला जात असे. विनोदाचा भाग म्हणजे असे म्हटले जाते की, या अभिषेकाचा ओघळ दरीतून खाली वहात आल्यानंतर त्यावर माशा ‘घाँ-घाँ’ करू लागल्या. त्यावरून त्या गावाला घोगांव, असे नाव पडले. सागरेश्वराच्या परिसरात आपदेबुवा, कर्कोरक, शौडन्य, सुमित्रा आणि गुरवबुवा या ऋषीमुनींची समाधी स्थाने आजही दाखवली जातात.
शंकराचे आवडते आणि गुप्त स्थान म्हणजे सागरेश्वर !
महादेवी पार्वतीने एकदा श्री शंकरास विचारले की, हे प्रभु पृथ्वीतलावर असे एखादे शुचिर्भूत तीर्थस्थान आहे का ? जेथे स्नान केले असता काया, वाचा आणि मन निर्मळ होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतील. स्वामी शंकराच्या मनात असे एक तीर्थस्थान होतेच; पण ते त्यांनी गुप्त ठेवले होते. पार्वतीकडून विचारणा होताच शंकरांनी या गुप्त तीर्थस्थानाच्या संदर्भात पार्वतीस सांगितलेली कथा पुढीलप्रमाणे आहे.
पृथ्वीतलावर कुडिनपूर नावाच्या राजधानीत सत्येश्वर नावाचा राजा राज्य करत होता. तो नावाप्रमाणे सत्यवचनी होता. एकदा राजा अंबिका वनात शिकारीसाठी गेला असता त्यांना एक सुवर्णमृग दृष्टीस पडले. त्याचा पाठलाग करत राजा घनदाट अरण्यात पोचला. त्याच्यासमवेतचे सैनिक एका रस्त्याने गेले आणि राजाही परतीची वाट चुकला. सुवर्णमृगाचा पाठलाग केल्यामुळे राजा दमला होता. तो तहान आणि भुकेने व्याकुळ झाला होता. अचानक राजाला एक महायोगी तपश्चर्या करत असलेले दृष्टीस पडले. राजाने त्यांना मनोभावे नमस्कार करून आशीर्वाद मागितला आणि सुवर्णमृग कोणत्या मार्गाने गेला ? याची विचारणा केली; परंतु ध्यानमग्न मुनींनी तिकडे लक्ष दिले नाही. याचा राजाला राग आला. राजाने रागाने तिथलाच किड्यांचा पुंजका मुनींच्या अंगावर टाकला, त्यामुळे सुमित्र मुनींचा तपोभंग झाला. सुमित्र मुनींनी राजाला शाप दिला, ‘हे राजा तू जे मला केलेस तेच तुलाही होईल. तुझ्या शरीरावर किड्यांचे पुंजकेच दिसतील.’ ही शापवाणी ऐकून सत्येश्वर राजा भयभीत झाला. त्याने मुनींचे पाय धरले आणि क्षमा मागितली. मुनी किंचित शांत झाले आणि त्यांनी उ:शाप दिला. मुनी म्हणाले, ‘‘राजा दिवसभर तुझे शरीर निर्मळ राहील, जेणेकरून लोकांना काहीच कळणार नाही; परंतु रात्री मात्र ते किड्यांनी व्यापलेले असेल त्यावर उपायही सांगतो. तू श्री शंकराला शरण जा. नेहमी त्याचे पूजन कर. जेणेकरून तुझी काया सोन्यासारखी होईल.’’
सुमित्र मुनींच्या शापानुसार सत्येश्वर राजाचे शरीर प्रतिदिन रात्री किड्यांनी भरून जात असे. पतीव्रता राणी रमणी रात्रभर आपल्या पतीच्या शरिरातील किडे अलग करून त्यावर मलमपट्टी करत असे. अशी १२ वर्षे निघून गेली. राजा सत्येश्वर प्रतिदिनी शंकराचे पूजन करत होताच. काही वर्षानंतर सत्येश्वर राजा शिकारीला गेला असता भर दुपारी राजाला पुष्कळ तहान लागली. त्याला डोंगराच्या कड्यावरून पाणी वहात असलेले दिसले. राजा तेथे पोचला आणि पोटभर पाणी प्यायला. त्या पाण्यानी तोंड धुतले आणि त्या रात्री एक आश्चर्य घडले. राजाच्या चेहर्यावर आणि हातावर एकही कीडा नव्हता. राणीला आश्चर्य वाटले. राणीने राजाकडे चौकशी केली. राजाने आदल्या दिवशीची घटना कथन केली. राणीने त्या ठिकाणी ब्राह्मणांना पाचारण करून उत्सव केला आणि राजाला तेथे स्नान घातले. सत्येश्वर राजाचे संपूर्ण शरीर निर्मळ झाले. राजा मुनींच्या शापातून मुक्त झाला. शंकरांनी पार्वतीस सांगितले की, माझा वास जरी काशीमध्ये असला, तरी मला दक्षिणेकडील सह्याद्री पर्वताच्या एका भागात असलेल्या पवित्र तीर्थस्थानाची पुष्कळ आवड आहे. यासाठीच हे स्थान शंकरांनी गुप्त ठेवले आहे. अशी ही कथा आहे.
सागराने तपश्चर्या करण्यास प्रारंभ केल्यावर ‘सागरेश्वर’ नाव पडले !
त्या स्थानाची उत्पत्ती कशी झाली याची एक कथा सांगितली जाते. सागराचा पुत्र जालंदर पार्वतीच्या रूपावर मोहित झाला, तेव्हा पार्वती शंकराच्या मागे लपल्यामुळे शंकराचे त्याच्यासमवेत युद्ध झाले. त्यात जालंदर ठार झाला. पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकून सागराला अतीशय दुःख झाले. तेव्हा त्याने सह्याद्री भागात एकांत स्थान शोधून तिथे शिवलिंग स्थापले आणि तिथेच कडक तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. हेच शिवलिंग ‘सागरेश्वर’ नावाने ओळखले जाते. श्रावण असो किंवा कोणताही मास असो या सागरेश्वर समोर देवराष्ट्रचे हनुमान भजनी मंडळ आणि बिरुदेव ओविकार मंडळ या स्वत:ची सेवा नित्य नियमात रुजू करत असतात. आजही या पिंडीतील शाळुंका बाजूस केली की पाणी लागते. त्यासमयी भूमीवर पडलेली गंगा निरंतर वासकर्ती झाली. येथील पाण्याचा अंत लागत नाही आणि वर्ष १९७२ च्या दुष्काळात कितीही उपसा केले, तरी येथील पाणी संपले नाही. गंगेच्या पाण्यात कृमीनाश करण्याचा अलौकीक गुण आहे. त्याचा अनुभव येथे येतो. ही पुराणकथा घेऊन येथील ‘सागरेश्वर’ आजही उभे आहे.