मल्ल्याळी ब्राह्मण पुजारी असावा, या नियमाला होत आहे विरोध !
नवी देहली – केरळच्या शबरीमला अय्यप्पा मंदिराच्या मेलशांती (मुख्य पुजारी) पदासाठी केवळ मल्ल्याळी ब्राह्मणांच्या नियुक्तीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे. त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने एक अधिसूचना जारी केली होती. यामध्ये पात्रता निकष म्हणून मल्ल्याळी ब्राह्मण असणे बंधनकारक होते. याविरोधात केरळ उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ते फेटाळण्यात आले होते. त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर या दिवशी होणार आहे.
या प्रकरणी त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने मेलशांतीसाठी केलेल्या भरतीविरुद्ध २ ब्राह्मणेतर पुजार्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. केरळ उच्च न्यायालयाने त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने प्रसारित केलेल्या अधिसूचनेने अस्पृश्यता निर्माण केल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तीवाद फेटाळला होता.