आज वडाळा महादेव(जिल्हा अहिल्यानगर) गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
‘अखंड आत्मनिरीक्षण करणारा, स्वतःचे दोष पहाणारा, असा अंतर्मुख माणूस क्षमावान असतो. स्वतःतील दोष आणि अज्ञान दिसू लागले की, तो माणूस क्षमाशील होतो. क्षमा हा त्याचा सहज स्वभाव बनतो. क्षमा त्याला करावी लागत नाही, तर ती क्षमा घडतेच. स्वतःची श्रेष्ठताही तो जाणू शकतो. लोक मान देतात, श्रेष्ठ आणि ज्ञानी मानतात. त्याला आपण योग्य आणि पात्र नाही; याची त्याला जाणीव असते. जे गुण आपल्यात आहेत, तेच इतरांतही असल्याचे त्याला दिसते. दुसर्यातही देवत्व दिसते. असा अंतर्मुख,
आत्मनिरीक्षण करणारा माणूसच क्षमावान असू शकतो. ‘आपण ज्या पायरीवर उभे आहोत, तिथे दुसरेही आहेत अथवा येऊ शकतात’, हे कळले की, माणूस क्षमावान होतो. ही सहज आणि निरहंकारी क्षमा आहे. क्षमा करतो, असा भावही तिथे नाही. ‘मी क्षमावान आहे, असा भाव आला की, तो अहंकार होतो. ती क्षमा सहज नाही, ती क्षमाच नाही. तो अहंकाराचाच एक अंश आहे.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, नोव्हेंबर २०२३)