भारत-पाकिस्‍तान यांच्‍यात पुन्‍हा युद्ध भडकण्‍याची शक्‍यता ! – POK Activist On IndiaPak War

  • पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला दावा

  • जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये घुसले ६०० पाकिस्‍तानी कमांडो प्रशिक्षण घेतलेले सैनिक !

भारत पाकिस्तान युद्ध (संग्रहित छायाचित्र)

नवी देहली – पाकिस्‍तानच्‍या साधारण ६०० कमांडो प्रशिक्षण घेतलेल्‍या सैनिकांनी जम्‍मू-काश्‍मीरच्‍या कुपवाडा भागात घुसघोरी केली आहे. यामुळे भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात पुन्‍हा एकदा कारगिलप्रमाणे युद्ध भडकण्‍याची शक्‍यता आहे, असा दावा पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केला आहे.

पाकव्‍याप्‍त काश्‍मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा

अमजद मिर्झा यांनी म्‍हटले आहे की,

१. पाकिस्‍तानी सैन्‍याच्‍या एस्.एस्.जी.चे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल अदिल रेहमानी भारताच्‍या जम्‍मू भागावर आक्रमण करण्‍याच्‍या सिद्धतेत आहेत. ६०० सैनिकांसह कुपवाडा, तसेच इतर भागांत स्‍थानिक जिहादी सक्रीय झाले आहेत. त्‍यांच्‍याकडून एस्.एस्.जी.च्‍या सैनिकांना भारतीय भूभागात घुसण्‍यासाठी साहाय्‍य केले जात आहे. पाकिस्‍तानचा लेफ्‍टनंट कर्नल शाहीद सलीम जिंजूआ सध्‍या भारतीय हद्दीत असून पाकिस्‍तानी सैनिकांचे नेतृत्‍व करत आहेत. कर्नल शाहीद भारतीय सैन्‍याच्‍या ‘१५ कॉर्प्‍स’चे लक्ष विचलित करण्‍याचा प्रयत्न करत आहेत.

२. एस्.एस्.जी.च्‍या २ तुकड्या (१ सहस्र २०० सैनिक) पाकव्‍याप्‍त काश्‍मीरच्‍या मुझफराबादमध्‍ये सज्‍ज आहेत. या २ तुकड्या जम्‍मू-काश्‍मीरच्‍या माध्‍यमातून भारतात घुसखोरी करण्‍यास सज्‍ज आहेत.

३. याआधी ४० ते ६० आतंकवादी घनदाट जंगल आणि डोंगरी भाग येथून जम्‍मूत घुसले, असे आम्‍हाला वाटले होते; पण आता लेफ्‍टनंट जनरल शाहीद जिंजुआ यांच्‍या नेतृत्त्वाखाली ५०० ते ६०० सैनिकांची एक तुकडी याआधीच जम्‍मू आणि काश्‍मीरमध्‍ये घुसल्‍याचे आम्‍हाला समजले आहे. या सैनिकांकडून भारतीय सैन्‍यावर आक्रमण केले जात आहे.

संपादकीय भूमिका

भारत जोपर्यंत इस्रायलप्रमाणे आक्रमक पवित्रा घेऊन पाकमध्‍ये जाऊन कारवाई करत नाही, तोपर्यंत काश्‍मीरमध्‍ये असेच घडत रहाणार !