|
गडचिरोली – नगरपरिषद परिसरात, तसेच शहरात पाणी साचले होते. नागरिकांनी पाण्यातून मार्ग काढला. नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याची चर्चा नागरिकांत होती. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथे गावालगतच्या तलावावर मित्रांसमवेत मासे पकडण्यासाठी गेला. ८ वर्षीय मुलगा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
चंद्रपूर – येथे सलग २ दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात जवळपास ६०० घरांची पडझड झाली. शेकडो हेक्टर शेतीची हानी झाली आहे. घरे आणि शेती यांच्या हानीचे पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील मुख्य मार्ग नागभीड-नागपूर महामार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद पडला होता. पाण्याचा प्रवाह अल्प झाल्यावर तो पूर्ववत् झाला. पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला. जिल्ह्यातील नदी, नाले २ दिवस ओसंडून वाहत आहेत. नागभीड तालुक्यातील विलम या गावातील रुणाल बावणे हा १३ वर्षीय मुलगा वाहून गेला. रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने रस्ता आणि नाला वेगळा दिसत नव्हता. त्या मुलाचा पाय घसरून तो नदीत पडला. काही जण त्याला वाचवण्यासाठी धावले; पण तो हाती लागला नाही.