सूक्ष्म अभ्यास चांगला करण्यासाठी साधनेचे बळ पाठीशी असणे आवश्यक !
‘साधनेच्या आरंभीच्या काळात सूक्ष्मातील भाग लगेच अनुभवता येईल, असे नसते. साधनेत प्रगती होत गेल्यावर सूक्ष्म स्पंदने जाणवणे आणि अनुभवणे जमायला लागते. त्यामुळे सूक्ष्म अभ्यास अधिक चांगला करण्यासाठी साधनेचे बळ पाठीशी असणे पुष्कळ आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणार्यांसाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आहे !
‘ज्यांना कलेच्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी हवी आहे, त्यांच्यासाठी आम्ही नाही, तर ज्यांना कलेच्या माध्यमातून ईश्वर हवा आहे, त्यांच्यासाठी आम्ही आहोत.’ (म्हणजे कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करणार्यांसाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आहे !)
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘सध्या आपल्याला ‘संगीत’, म्हणजे केवळ ‘गायन, वादन आणि नृत्य यांचे प्रस्तुतीकरण’, असे समीकरण सर्वत्र दिसून येते. जेव्हा अनेक विद्यार्थी कला शिकतात, तेव्हा त्यांचे गुरु ‘त्या कलांचे सादरीकरण चांगले कसे करता येईल ?’,
याविषयी विद्यार्थ्यांना शिकवतात. या कलांचा तात्त्विक अभ्यास हा केवळ लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीच शिकवला जातो. सध्याच्या विद्यार्थ्यांना ‘संगीताचे व्यापक स्वरूप’ आणि ‘संगीताचा आध्यात्मिक पाया’, यांविषयी ठाऊक नाही.
कलेची समाजातील सध्याची स्थिती लक्षात घेऊन ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना कशा प्रकारे करता येऊ शकते ?’, याचे मार्गदर्शन परात्पर गुरु डॉ. आठवले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करत आहेत. ‘संगीताचा केवळ प्रायोगिक स्तरावर नाही, तर त्याचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास करून तो अनुभवणे’, याविषयीची दिशा परात्पर गुरु डॉक्टर समाजाला देत आहेत.
‘कलेतून ईश्वरप्राप्ती’, याविषयी अभ्यास चालू करतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले, ‘‘आपल्याला ठाऊक असलेल्या (Known) संगीतातून ठाऊक नसलेल्या (Unknown) संगीताकडे जायचे आहे.’’ संगीताच्या भाषेत सांगायचे, तर आहत नादाकडून (ऐकू येणार्या, आघाताने उत्पन्न होणार्या नादाकडून) अनाहत नादाची (सूक्ष्म नादाची) अनुभूती घेण्यापर्यंतचा प्रवास संगीतातून साधनेद्वारे करण्याची दिशा परात्पर गुरु डॉक्टरांनी दिली आहे. ‘साधना’ हा या प्रवासाचा पाया आहे. त्यामुळे केवळ स्थुलातील संगीत नव्हे, तर संगीताच्या सूक्ष्म अभ्यासामुळे या शिकण्याला परिपूर्णता येणार आहे.
आपले पूर्वज आणि ऋषिमुनी यांनी सर्व कलांचा शास्त्रोक्त अभ्यास केला आहे. त्यामुळेच ‘आपतत्त्वाशी संबंधित स्वराविष्काराने ‘मल्हार’ रागाच्या गायनाने पाऊस पडणे, ‘दीपक’ रागाच्या गायनाने दिवे प्रज्वलित होणे’, हे कलाकाराने संगीताला साधनेची जोड दिल्यामुळे होत असे. हा केवळ इतिहास नाही, तर भारतातील ऋषिमुनींचे श्रेष्ठत्व आणि भारतीय संस्कृतीला आध्यात्मिकतेचा पाया असल्याचे द्योतक आहे.
काळानुसार लोप पावत असलेल्या कलेतील आध्यात्मिकता पुन्हा जागृत करून भारतीय कलांमधील सत्त्वगुणाचे अधिष्ठान समाजासमोर आणण्याचे दैवी कार्य परात्पर गुरु डॉक्टर करत आहेत. ‘या अनुषंगाने ते सूक्ष्म संगीत आणि नृत्य यांचा अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे मार्गदर्शन करत आहेत ?’,
याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. संगीतातील उच्चारशास्त्राचे महत्त्व सांगून त्याविषयी सूक्ष्म अभ्यास करण्याची दिशा देणे
‘संगीत’ हे उच्चारशास्त्र आहे. ‘संगीतात वापरण्यात येणार्या शब्दांचा उच्चार योग्य प्रकारे कसा करावा, ज्यामुळे त्या अक्षरांतील स्पंदने त्या अर्थाशी जुळतील ?’, हा सूक्ष्म अभ्यास करण्याची दिशा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला दिली. एकदा ते म्हणाले, ‘‘सध्या संगीत शिकवणारे मुळापर्यंत जाऊन संगीत शिकवत नाहीत. आध्यात्मिक संगीतापर्यंत तर कुणी शिकवणारे पोचत नाहीत. आता आपल्यालाच ती जागृती करायची आहे.’’
२. ‘संगीतातील ‘रागा’च्या नावाचे अक्षर’ आणि ‘त्या ‘रागा’चे गायन’, यांतील स्पंदने सारखीच असतात’, याचा अभ्यास करायला शिकवणे
‘संगीतातील ‘रागा’च्या नावाचे अक्षर (उदा. राग मालकंस)’ आणि ‘तो राग प्रत्यक्ष स्वरांच्या माध्यमातून गाणे किंवा वाजवणे’, या दोन्हींमधील स्पंदने ही सूक्ष्म स्तरावर सारखीच असतात. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्माच्या सिद्धांतानुसार ही स्पंदने एकसारखी असतात. हा अभ्यास करायलाही परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला शिकवले.
३. विविध कलांमधील अद्वैताचा अभ्यास करण्याविषयी मार्गदर्शन करणे
सगळ्या कलांची निर्मिती ईश्वरापासूनच झाली आहे. त्यामुळे साधनेच्या दृष्टीने कलांचा अभ्यास केल्यास एका टप्प्यानंतर आपल्याला सगळ्या कलांचे अद्वैतच अनुभवता येते, उदा. देवीचे काढलेले चित्र, देवीची मूर्ती, देवीतत्त्वाची रांगोळी, देवीचे यंत्र, देवीचे स्तोत्र, मंत्र, नामजप आणि देवीचे भक्तीगीत अन् देवीतत्त्वाशी संबंधित राग, देवीतत्त्वाशी संबंधित नृत्य, वाद्य, अभिनय इत्यादींच्या सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास केल्यावर या कला वेगवेगळ्या असल्या, तरी त्यांतील सूक्ष्म स्पंदने ही एकसारखीच असल्याचे आपल्याला अनुभवता येते. साधनेमुळे ही सूक्ष्म स्पंदने आपल्याला सहजतेने अनुभवता येतात. हा अभ्यास करण्याची दिशा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला दिली.
४. नामजपाप्रमाणे संगीतातही ‘वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा’, या ४ वाणींतून साधनेचा प्रवास होणे
एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांना म्हणाले, ‘‘गाणे बाह्यांगाने मोठ्याने म्हणण्यापेक्षा ते गुणगुणण्यात आनंद अधिक मिळतो.’’ याविषयी ते म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे नामजपात ‘वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा’, या वाणींतून प्रवास होतो, त्याप्रमाणे संगीतातही ‘वैखरी, मध्यमा, पश्यंती अन् परा’, असा प्रवास होतो, हेही आता आमच्या लक्षात यायला लागले. मध्यमा वाणीपर्यंत लोकांवर शब्दांचा प्रभाव जाणवू शकतो. पुढचे सगळे संगीत हे शब्दातीत असते. परा वाणीत शब्दच नसतात.’’
५. परात्पर गुरु डॉक्टरांनी नृत्यातील विविध मुद्रा आणि शारीरिक स्थिती यांचा शरीर अन् मन यांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यास सांगणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘नृत्यातील विविध मुद्रा, तसेच शरिराच्या विविध स्थिती (विविध शारीरिक आकृतीबंध) यांचा आपले शरीर आणि मन यांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती’, यांची स्पंदने प्रक्षेपित करणार्या मुद्रांचा अभ्यास करण्याची दिशा दिली. ‘नृत्यातील एका मुद्रेची स्पंदने’ आणि ‘विविध मुद्रा एकत्र करून निर्माण होणारी स्पंदने’, यांचाही अभ्यास करता आला. ‘यातून एखाद्या साधकाला ‘साधनेत प्रगती करणे, भावजागृती, आनंदवर्धन, मनाची निर्विचार स्थिती’, अशा विविध कारणांसाठी उपयुक्त मुद्रा किंवा नृत्यप्रकार कोणता ?’, हेही पुढे आपण सांगू शकू’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले.
एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा असते. भाषेतून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. त्याप्रमाणे नृत्यातील देहबोली ही नृत्याची भाषा असते. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘मुद्रा किंवा देहबोली (विविध शारीरिक आकृतीबंध) यांतून काय व्यक्त होते ?’, याचाही अभ्यास करण्यास सांगितला.
६. आध्यात्मिक त्रासांवर उपचार म्हणून संगीत आणि नृत्य यांविषयी संशोधन करणे
समाजात शारीरिक आणि मानसिक रोगांवर औषधे आहेत; परंतु आध्यात्मिक त्रासांवर औषधोपचार नाहीत. त्यामुळे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागतो. ‘त्यांना उपचार मिळावेत’, या तळमळीने परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘संगीतातील विविध राग’ आणि ‘नृत्यातील विविध प्रकार’, यांच्या माध्यमांतून आध्यात्मिक त्रासांवर उपचार म्हणून विविध संशोधनात्मक प्रयोगांना प्राधान्य देण्यास सांगितले.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘संगीत’ या कलेची सांगितलेली वैशिष्ट्ये
अ. इतर योगमार्गांत क्लिष्टता अधिक आहे; परंतु गायन, वादन आणि नृत्य या माध्यमांतून साधना करणे सोपे आहे. ‘कला शिकणे, त्या कलेचा सराव करणे आणि त्यातील अनुभव घेणे’, हा साधनाप्रवास सोपा आहे. त्यामुळे ही साधना करतांना सहजता असते.
आ. इतर कला, उदा. चित्रकला, मूर्तीकला इत्यादींमध्ये थोडी तरी बुद्धी वापरावी लागते; परंतु ‘संगीत’ ही कला आकाशतत्त्वाशी संबंधित असल्याने ती आपल्याला सहजतेने मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे घेऊन जाते.
‘गुरु-शिष्य परंपरा’, हे भारताचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ‘आमच्या अनेक जन्मांचे पुण्य फळाला आल्याने कलियुगात संगीत, नृत्य यांसारख्या कलांतील सूक्ष्म आणि दिव्य अभ्यासाविषयी आम्हाला उच्च कोटीतील अवतारी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे मार्गदर्शन मिळत आहे’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहेत. ‘आम्हा साधकांकडून शेवटच्या श्वासापर्यंत हे गुरुकार्य ‘साधना’ म्हणून करून घ्यावे’, हीच आपल्या सुकोमल चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संगीत समन्वयक, संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.७.२०२४)
‘अनेक विद्या आणि कला यांच्या माध्यमातून साधना करण्याविषयी मार्गदर्शन करणे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याचे वैशिष्ट्य असणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘सात्त्विक चित्रकला, मूर्तीकला, रांगोळी, मेंदी, शिवणकला, पाककला, संगीत, नृत्य, नाट्य’, अशा विविध कला, तसेच विविध विद्या यांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी साधकांना अविरत मार्गदर्शन करत आहेत. आपण समाजात पहातो की, एखादी व्यक्ती एखाद-दुसर्या कलेत प्रावीण्य मिळवून त्याविषयी मार्गदर्शन करू शकते; परंतु अनेक विद्या आणि कला यांच्या माध्यमातून साधना करण्याविषयी एकटे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले मार्गदर्शन करत आहेत. हेच त्यांच्या अवतारी कार्याचे वैशिष्ट्य आहे !’
– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, संगीत विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (५.७.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |