Guru Poornima In M.P. Schools : गुरुपौर्णिमेला मध्यप्रदेशमधील सर्व शाळांमध्ये २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील भाजप सरकारने सर्व सरकारी आणि खासगी शाळांना गुरुपौर्णिमेला २० आणि २१ जुलै या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यास सांगितले आहे. काँग्रेसने याला विरोध केला आहे.

१. मध्यप्रदेशाच्या शिक्षण विभागाने प्रसारित केलेल्या आदेशात म्हटले आहे की, २० जुलै या दिवशी प्रार्थनेनंतर शिक्षक गुरुपौर्णिमा आणि गुरु-शिष्य परंपरा यांच्या महत्त्वावर भर देतील. यानंतर प्राचीन काळी प्रचलित असलेली गुरुकुल पद्धत आणि त्याचा भारतीय संस्कृतीवर होणारा परिणाम, याविषयी निबंधलेखन होणार आहे.

२. दुसर्‍या दिवशी, म्हणजेच २१ जुलै या दिवशी शाळांमध्ये सरस्वती वंदन, गुरु वंदन, दीपप्रज्वलन आणि पुष्प अर्पण करण्यात येणार आहे. या वेळी गुरु आणि शिक्षक यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर शिक्षक आणि गुरु यांच्याविषयी भाषण होणार आहे.

३. शालेय शिक्षण विभागाने १६ जुलै या दिवशी प्रसारित केलेल्या आदेशात गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी संत, शिक्षक आणि विद्यार्थी यांना कार्यक्रमाला आमंत्रित करण्यास सांगितले होते. यासह संबंधित शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक आणि शाळेतील माजी विद्यार्थी यांनाही या कालावधीत बोलावण्यास सांगण्यात आले आहे.

(म्हणे) ‘शाळांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करणे धर्मनिरपेक्षतेच्या भावनेच्या विरुद्ध !’ – काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हाफीज

राज्यघटनेचा अविभाज्य भाग असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या भावनेच्या विरुद्ध असल्याचे सांगत विरोधी पक्ष काँग्रेसने शालेय शिक्षण विभागाच्या या निर्देशाला विरोध केला. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अब्बास हाफीज म्हणाले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, जिथे सर्व धार्मिक समुदायातील विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालये यांंमध्ये शिकतात; म्हणून शाळांमध्ये कोणत्याही एका धर्माशी संबंधित कोणतीही नवीन परंपरा चालू केल्याने वाद निर्माण होऊ शकतो. जर एका धर्माशी संबंधित परंपरा सर्वांसाठी अनिवार्य केल्या गेल्या, तर इतर समाजातील विद्यार्थी त्यांच्या परंपरांशी संबंधित कार्यक्रम चालू करण्याची मागणी करू शकतात.

संपादकीय भूमिका

  • गुरु कोणत्या धर्माचे नसतात, तर ते शिष्य, विद्यार्थी याच्याशी संबंधित असतात. हेही न कळणारी काँग्रेस हिंदुद्वेषीच होय !
  • काँग्रेसमधील हिंदु नेत्यांचाही हा विचार आहे का ?, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !