…जेथे अभिनेत्रींचेच चुकते !

सर्वसामान्य महिलांप्रमाणे चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीही विवाहानंतर गर्भवती होतात. खरेतर ही आनंदाची गोष्ट असते; पण बर्‍याचदा असे लक्षात येते की, बाळ होणार असल्याची वार्ता त्यांनी घोषित केल्यावर काही मासांनी लोक त्यांच्यावर टीका करू लागतात, उदा. ‘तुमचे पोट अजून दिसत नाही’, ‘तुम्ही बाळ होणार असल्याची खोटी माहिती दिली’, ‘अजून पोट आतच कसे ?’ इत्यादी. जणू काही ‘भारतातील सर्व समस्या संपल्या आणि हिचे पोट दिसले की झाले’, अशीच स्थिती निर्माण झालेली असते ! ‘कधी तिचे पोट दिसते आणि आपण ते दृश्य टिपून सर्वत्र प्रसारित करून प्रसिद्धी मिळवतो’, यासाठी प्रसिद्धीमाध्यमांची चढाओढ चालू असते. खरेतर एखाद्या गर्भवती महिलेच्या संदर्भात अशी वक्तव्ये करणे अयोग्यच आहे; पण असे प्रकार केवळ अभिनेत्रींच्या संदर्भात होतात. स्वतःचे घर, संसार सांभाळून नोकरदार असणार्‍या सर्वसामान्य महिलांच्या संदर्भात असे कधी होत नाही. मग याला उत्तरदायी कोण ? अर्थात्च गर्भवती होण्याअगोदर उत्तानपणे अंगप्रदर्शन करणार्‍या या अभिनेत्री ! आधी अंगप्रदर्शन करायचे, मग टीकेला आमंत्रण द्यायचे आणि गर्भावस्थेत पोट दिसू लागल्यावर ते दाखवत अतिशय तोकड्या कपड्यांत पुन्हा अंगप्रदर्शन करून छायाचित्रांद्वारे प्रसिद्धी मिळवायची. हे चक्र चालूच रहाते. एका अभिनेत्रीने तिच्या एका चित्रपटात केवळ अंतर्वस्त्रे घालून एक गाणे चित्रित केले होते. आज तीच अभिनेत्री गर्भवती झाल्यावर मध्यंतरी तिच्यावर अतिशय हीन दर्जाची टीका झाली. ‘करावे तसे भरावे’, ही म्हणच येथे सार्थ ठरते, असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. ‘आज अमुक अभिनेत्रीने ‘बेबी बंप’ (गर्भ असलेले पोट) दाखवले, तर उद्या तमुक अभिनेत्रीने !’ असे प्रकार चित्रपटसृष्टीत आणि माध्यमांमध्ये चालूच असतात. या अभिनेत्रींचे अनुकरण करत काही महिलाही अशी छायाचित्रे काढतात. हे कुठेतरी थांबायला हवे.

गर्भवती अभिनेत्रींवर टीका होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बर्‍याचदा चित्रपट किंवा मालिका यांतील कथानकात अभिनेत्री गर्भवती असल्याचे खोटे नाटक करते. ‘पोटाच्या ठिकाणी उशी इत्यादी खोचते’ किंवा ‘काही वेळा गर्भवती नसतांनाही डोहाळेजेवणासारख्या कार्यक्रमात सहभागी होते’, असे दाखवले जाते. हे पाहून ‘एखादी अभिनेत्री खरोखर गर्भवती आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: दृश्याभावात् विमुच्यते ।’ (योगवासिष्ठ) (अर्थ : द्रष्टा दृश्य पाहिल्याने त्यात बद्ध होऊन जातो. दृश्याचा अभाव असेल, तर तो त्यापासून मुक्त होतो.) यानुसारच मानवाच्या मनाची प्रक्रिया होते. त्यामुळे चित्रपट किंवा मालिका निर्माते यांनीही गांभीर्याने विचार करायला हवा. गर्भवती असो अथवा नसो, अभिनेत्रींनीही समाजभान जोपासायला हवे.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.