पनवेल – तालुक्यात अनेक दिवसांपासून एकाच वेळी अनेक घरांत चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच खारघर वसाहतीलगत असणार्या पेठ गावात १० जुलै या दिवशी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियनधारी टोळीतील चौघे जण फिरतांना सीसीटीव्हीमध्ये दिसले. या दिवशी त्यांनी अनेक घरांत चोर्या केल्या.
हे चोरटे मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेपर्यंत सक्रीय असतात. पायात चप्पल न घालता, अंगावर सदरा न घालता चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोस फिरत आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तळोजामध्ये, तसेच खारघरमध्ये मोठ्या घरफोड्या या चोरट्यांनी केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पनवेल महापालिकेकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे. महिला आणि बालकल्याण लेखाशीर्षकाखाली पालिका प्रशासनाने १२० कोटी रुपये खर्च करून सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र या प्रस्तावाला गती मिळाली नाही, असे समजते.