गुरुकृपा आणि नामजपादी उपाय यांद्वारे स्वतःच्या शारीरिक त्रासांवर मात करणार्‍या सनातन आश्रम, देवद (पनवेल) येथील ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. जयश्री साळोखे (वय ४२ वर्षे) !

सौ. जयश्री साळोखे यांना झालेले त्रास, त्यावर केलेले औषधोपचार आणि नामजपादी उपाय खाली दिले आहेत.

सौ. जया साळोखे

१. विविध चाचण्या केल्यानंतर ‘साधिकेच्या हृदयाचा ‘व्हाल्व’ खराब झाला आहे आणि मानेला दोन्ही बाजूंना असणार्‍या अडथळ्यांमुळे रक्तपुरवठा होत नसल्याने चक्कर येत आहे’, असे निदान होणे

‘मला चालता चालता चक्कर येऊन मी रस्त्यात कुठेही बसायचे. औषध घेऊन तात्पुरते बरे वाटायचे; परंतु चक्कर आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे चालूच होते.

१६.४.२०२४ या दिवशी मला अर्धांगवायूचा झटका येऊन माझा उजवा भाग लुळा पडल्यासारखे झाले. त्या वेळी मला आधुनिक वैद्यांच्या समुपदेशाने तातडीने रुग्णालयात भरती करून चाचण्या करायचे ठरवले. त्यात ‘ब्रेनचा एम्.आर्.आय्.’ (Magnetic Resonance Imaging – हे रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान आहे.), ‘टु डी इको’ (2D echo – या चाचणीमध्ये ध्वनीलहरींच्या साहाय्याने हृदयाचे कार्य प्रत्यक्ष पाहिले जाते. त्यायोगे हृदयातील झडपा, हृदयाशी जोडलेल्या रक्तवाहिन्या आणि हृदयातून होणारे रक्ताभिसरण तपासले जाते.), ‘इसीजी’ (हृदयाचा स्पंदन आलेख) या चाचण्यांमधून ‘माझ्या हृदयाचा ‘व्हाल्व’ खराब झाला आहे आणि मानेला दोन्ही बाजूंना असलेल्या अडथळ्यांमुळे रक्तपुरवठा होत नसल्यामुळे चक्कर येत आहे’, असे निदान झाले. MGM या रुग्णालयामधे एक ‘अँजिओग्राफी’ (ही मानवाच्या वैद्यकीय तपासण्यांमधील एक आहे. रक्तवाहिन्यांमध्ये क्ष-किरणांद्वारे दिसणारे रंग सोडून रक्तवाहिन्यांची भरण क्षमता तपासली जाते. याद्वारे रक्तवाहिन्यांतील अडथळे दिसून येतात.) केली; परंतु मानेच्या दोन्ही शिरांना सूज असल्यामुळे अँजिओग्राफी पूर्ण होऊ शकली नाही.

मेंदूला रक्तपुरवठा न्यून होत असल्यामुळे दिवसभरात अनेकदा चक्कर येणे, हात थरथरणे, अंधारी येणे आणि तोल जाणे या त्रासांचे प्रमाण पुष्कळ वाढले होते.

श्री. तुकाराम लोंढे

२. शारीरिक त्रासांवर केलेले विविध उपचार आणि उपाय

२ अ. होमिओपॅथी औषधोपचार घेण्याचे ठरवणे : त्या वेळी होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांच्या सांगण्यानुसार आम्ही पुण्यामध्ये होमिओपॅथी औषधोपचार घेण्याचे ठरवले. त्यामुळे मी पुण्यात जाऊन रुग्णालयात भरती झाले. या उपचारांच्या जोडीला सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) सतत उपाय देत होते. मला उपाय करणे शक्य नसल्याने ते उपाय माझे वडील (श्री. तुकाराम (बापू) लोंढे, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) करायचे.

१४ दिवस आम्ही पुण्यामधील होमिओपॅथी रुग्णालयात होतो. होमिओपॅथी औषधाने मला पुष्कळ फरकही पडला. त्रास व्हायला लागल्यावर औषध घेतले की, १० मिनिटांत बरे वाटायचे.

मला दीड मास होमिओपॅथीच्या गोळ्या आणि रक्त पातळ होण्यासाठी एक गोळी चालू होती. त्याच्या जोडीला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ काकांचे उपाय चालू असल्यामुळे ‘माझ्या आजाराची तीव्रता लवकर अल्प होत आहे’, हे माझ्या लक्षात आले.

२ आ. मुंबईत के.ई.एम्. रुग्णालयात तपासण्या करण्याचे ठरवणे : पनवेलला आल्यानंतर आम्ही के.ई.एम्. रुग्णालयामध्ये अहवाल दाखवून तपासण्या करायचे ठरवले. MGM या रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘टकायजु आर्टरिज’ (शरिरातील शिरांना सूज असणे) नावाचा आजार असल्यामुळे सध्या कोणतेच शस्त्रकर्म करू शकत नाही.’’

उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यात मला हृदयाच्या त्रासामुळे श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होत असे. मला सतत वातानुकूलित (एसी) खोलीतच रहावे लागायचे.

मला सकाळी उठतांना ‘चक्कर येणे आणि उभे रहाता न येणे’, असे त्रास व्हायचे. मला सतत कुणीतरी सोबत लागायचे. ‘मी कधीही चक्कर येऊन पडीन’, अशी माझी स्थिती होती. उपाय चालू झाल्यापासून बापू मी उठण्यापूर्वीच माझ्यासाठीचे उपाय पूर्ण करायचे. त्यामुळे उठल्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटायचे. दिवसभरात मधे मधे जेव्हा त्रास व्हायचा, तेव्हाही बापू माझ्यासाठी नामजप करायचे.

३. आध्यात्मिक स्तरावरील उपायांमुळेच साधिकेचे त्रास अल्पकालावधीत न्यून होणे

‘के.ई.एम्.’मधील आधुनिक वैद्यांनी ‘टकाईजु आर्टरीज’ या आजारावर औषधे चालू करण्यासाठी काही चाचण्या करण्यास सांगितले. सद्गुरु दादांनी (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी) दिलेले उपाय आणि सद्गुरु गाडगीळकाका यांनी दिलेला मंत्रजप बापूंनी माझ्यासाठी भावपूर्ण, तळमळीने आणि पहाटे लवकर उठून केल्यामुळे त्रास अल्प होऊन माझे त्रास अल्प कालावधीत न्यून झाले.

आध्यात्मिक उपायांमुळे त्रासांचे योग्य निदानही झाले. आधुनिक वैद्य सांगत असलेले वेगवेगळे आजार ऐकून आम्ही सगळेच घाबरलो होतो. त्या वेळी परम पूज्य गुरुमाऊलीची कृपा त्याच समवेत सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि सद्गुरु गाडगीळ काका यांचे नामजपादी उपाय यांमुळे आम्हाला स्थिर रहाता आले. या दिवसांत ‘देवाची कृपा आणि मी जिवंत आहे’, हे मला अनुभवता आले. त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. जयश्री नितीन साळोखे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.६.२०२४)