सावंतवाडी पोलीस ठाण्यातून ३ बंदुका गायब

२३ वर्षांनंतर बंदुका चोरीस गेल्याचा गुन्हा नोंद

सावंतवाडी – पोलिसांनी जप्त केलेल्या ३ ठासणीच्या बंदुका सापडत नसल्याने प्रकरणी तब्बल २३ वर्षांनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञातांच्या विरोधात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना वर्ष २००१ मध्ये घडली होती.

बेकायदेशीररित्या शिकार करतांना आढळून आल्याच्या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांकडून ३ ठासणीच्या बंदुका अन्वेषणाच्या वेळी कह्यात घेतल्या होत्या आणि त्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. फिर्यादी रवींद्रनाथ गावकर यांना या ३ बंदुका शेतीच्या संरक्षणासाठी म्हणून देण्यात आल्या होत्या. सर्व कार्यवाही संपल्यावर गावकर यांनी त्यांच्या बंदुका परत मिळाव्यात, यासाठी अर्ज केला असता त्या देण्यास सावंतवाडी पोलिसांनी असमर्थता दर्शवली. त्यानंतर गावकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेत या बंदुका मिळाव्यात, यासाठी याचिका प्रविष्ट (दाखल) केली. यावर सावंतवाडी पोलिसांनी लेखी जबाब सादर करत त्या बंदुका पोलीस ठाण्यातून गायब झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी नुकतीच सावंतवाडी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २३ वर्षांनंतर ३ बंदुका चोरीस गेल्याची फिर्याद प्र्रविष्ट करण्यात आली आहे. या गुन्ह्यात पोलीसच फिर्यादी झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

पोलिसांचा अनागोंदी कारभार !