पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण असे संबोधल्याने हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तरी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व (खासदारकी) तात्काळ रहित करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेठवडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आले. राष्ट्रपतींच्या नावे असलेले हे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी स्वीकारले.
राष्ट्रपतींच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी लोकसभेत घेतलेल्या समभावाने वागण्याच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निवडणुकीसाठी कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी. या प्रसंगी सर्वश्री धनंजय गोंदकर, सुहार झगडे, राजेंद्र जाधव, विकास कांबळे, अमर पाटील, प्रथमेश शिंदे, संतोष माळी, शिवम माळी, सौरभ बुढ्ढे, राजेंद्र बुरुड, प्रमोद जगताप यांसह अन्य उपस्थित होते.