कोल्हापूर – गेल्या ४ वर्षांपासून कोल्हापूर महापालिका क्षेत्रात नागरिकांना पाणी, रस्ते, वीज अशा सुविधाही योग्य प्रकारे मिळत नाहीत. या संदर्भात विविध पक्ष, संघटना, नागरिक यांनी निवेदने देऊन, आंदोलने करून प्रशासन कृती करण्यास सिद्ध नाही. त्यामुळे विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांनी, तसेच सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन महापालिकेच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात निदर्शने केली. हातात विविध समस्यांचे फलक घेऊन नागरिक यात सहभागी झाले होते. या प्रसंगी डॉ. अश्विनी माळकर, प्रा. नीलिमा व्हटकर, प्रताप देसाई यांसह अन्य नागरिकांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन झाल्यावर अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि विविध समस्यांवर मार्ग काढू, असे आश्वासन दिले. (नागरिकांना रस्ते, वीज यांसारख्या प्रश्नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे ! नागरिकांच्या करातूनच वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात ? – संपादक)