पुणे, ३० जून (वार्ता.) – देहू-आळंदी येथून निघालेल्या वारीचे ३० जून या दिवशी येथील जंगली महाराज रस्ता (शिवाजीनगर) येथे सहस्रो धारकर्यांनी स्वागत केले. प्रतिवर्षीप्रमाणे हा ‘भक्तीगंगा शक्तीगंगा संगम’ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. भगवे फेटे धारण केलेले सर्व धारकरी आणि श्वेत वस्त्रे धारण केलेले वारकरी यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे ‘भक्ती आणि शक्ती यांचे मिलन’ असे स्वरूप या सोहळ्याला प्राप्त झाले होते. प्रारंभी येथील जंगली महाराज मंदिरात सर्व धारकर्यांनी दर्शन घेऊन येथे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी धारकर्यांना मार्गदर्शन केले. ‘देशाला जिवंत ठेवण्याची क्षमता छत्रपती शिवाजी-संभाजी या बीजमंत्रात आहे’, असे उद्बोधन त्यांनी केले. वारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या वीरश्री निर्माण करणार्या घोषणा देण्यात आल्या. या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत केल्यानंतर ते काही वेळ पालखी रथात बसले.