इंद्रायणी नदीत सांडपाणी कुठून मिसळते, हे सांगूनही त्यावर उपाययोजना नाही ! – ह.भ.प. निरंजननाथ महाराज

पिंपरी (पुणे) – कार्तिक यात्रा उत्सवाच्या काळात झालेल्या बैठकीमध्ये कोणत्या भागातून सांडपाणी इंद्रायणी नदीत मिसळते  ? याची प्रशासनाला माहिती दिली होती; मात्र त्यावर कोणतीही उपाययोजना झाली नाही. वारीच्या अनुषंगाने इंद्रायणी नदीच्या प्रदूषणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार या नेत्यांना सांगूनही उपयोग होत नसेल, तर दुर्दैव आहे, अशी खंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह.भ.प. निरंजननाथ महाराज यांनी व्यक्त केली. तीर्थक्षेत्र विकासाच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात कारवाई अल्प होत आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

आषाढी कार्तिकी वारीमध्ये वारकर्‍यांना दूषित पाण्यात अंघोळ करावी लागते. हेच प्रदूषणयुक्त पाणी पुढे चंद्रभागेला जाऊन मिळते. वारकर्‍यांचे आरोग्य धोक्यात येत असून याविषयी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. नदी प्रदूषणावर उपाययोजना काढण्यासाठी तातडीने समिती नियुक्त करायला हवी. नदी प्रदूषण का ? कुठे आणि कसे होते ? हे लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना काढायला हवी. इंद्रायणी नदीच्या पाण्याला दुर्गंधी येते, यावरही प्रशासनाने गांभीर्याने विचार करायला हवा, असे ह.भ.प. निरंजननाथ महाराजांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • वारकर्‍यांनी सांगूनही संवेदनशून्य प्रशासन यावर काहीच करत नाही, हे संतापजनक !
  • तथाकथित पुरोगामी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? कि त्यांचे कारखानदारांशी लागेबांधे आहेत ?
  • इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण होईपर्यंत सर्वांनीच प्रशासनाला जाब विचारणे आवश्यक !