DK Shivakumar : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यागपत्र देऊन उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी !

‘विश्‍व वोक्कलिगा महासमस्तान मठा’चे संत कुमार चंद्रशेखरनाथ स्वामी यांचे आवाहन

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार व मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यागपत्र द्यावे आणि त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांची नियुक्ती करावी, असे जाहीर विधान ‘विश्‍व वोक्कलिगा महासमस्तान मठा’चे संत कुमार चंद्रशेखरनाथ स्वामी यांनी केले. ते केम्पेगौडा जयंतीनिमित्त बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे दोघेही उपस्थित होते.

सध्या राज्यामध्ये वीरशैव-लिंगायत, अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्यांक यांच्यातून प्रत्येकी १ उपमुख्यमंत्री नेमण्याची मागणी होत आहे. राज्यात डी.के. शिवकुमार हे एकमेव उपमुख्यमंत्री आहेत. ते दक्षिण कर्नाटकातील वोक्कलिगा या प्रबळ समुदायातून आले आहेत.

कुमार चंद्रशेखरनाथ स्वामीजी पुढे म्हणाले की, सर्वांनी सत्ता उपभोगली आणि मुख्यमंत्री झाले; पण आमचे डी.के. शिवकुमार आजवर मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. त्यामुळे सिद्धरामय्या यांना विनंती आहे की, त्यांनी या पदाचा अनुभव घेतला आहे, त्यामुळे आता त्यांनी शिवकुमार यांच्याकडे सत्ता सोपवून त्यांना आशीर्वाद द्यावा. सिद्धरामय्या यांची इच्छा असेल, तरच हे होऊ शकते, अन्यथा हे शक्य होणार नाही. त्यामुळे शुभेच्छांसह मी सिद्धरामय्या यांना डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याची विनंती करू इच्छितो.

पक्षप्रमुख जे सांगतील, ते मी करीन ! – मुख्यमंत्री सिद्धरामय्या

संताच्या या आवाहनाविषयी सिद्धरामय्या यांना विचारले असता ते म्हणाले की, ही लोकशाही आहे. पक्षप्रमुख जे सांगतील, ते मी करीन.

डी.के. शिवकुमार म्हणाले की, काही गोष्टी सांगितल्या आहेत. सिद्धरामय्या आणि मी दोघेही राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांविषयी राज्याच्या खासदारांशी चर्चा करण्यासाठी नवी देहलीला जात आहोत.