हिंदु राष्‍ट्र बनवण्‍यासाठी मोठे जनआंदोलन उभारणे आवश्‍यक ! – प्रवीण चतुर्वेदी, संस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, ‘प्राच्‍यम’

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा चौथा दिवस (२७ जून) उद़्‍बोधन सत्र – ओटीटी आणि हिंदी चित्रपटसृष्‍टी

श्री. प्रवीण चतुर्वेदी

विद्याधिराज सभागृह – आज संपूर्ण जग हिंदु धर्म आणि संस्‍कृती यांना नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करत आहे. त्‍यामुळे आपल्‍याला संघटित होऊन त्‍याचा सामना करावा लागेल. हिंदु राष्‍ट्र बनण्‍यासाठी धार्मिकता आणि आध्‍यात्मिकता यांचे मिश्रण असलेले एक मोठे जनआंदोलन उभे करणे आवश्‍यक आहे. तेच हिंदु जनजागृती समिती या ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या माध्‍यमातून करत आहे, असे प्रतिपादन ‘प्राच्‍यम्’चे संस्‍थापक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण चतुर्वेदी यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या चौथ्‍या दिवशी केले. ‘हिंदु ओटीटी प्‍लॅटफॉर्म ‘प्राच्‍यम्’च्‍या माध्‍यमातून वैचारिक आतंकवाद रोखण्‍यापासून केलेले कार्य’ या विषयावर ते बोलत होते.

‘प्राच्‍यम्’च्‍या स्‍थापनेमागील उद्देश !

ते म्‍हणाले, ‘‘हिंदू त्‍यांचा धर्म आणि संस्‍कृती यांपासून लांब जावेत, यासाठी हिंदुविरोधी शक्‍ती चित्रपट, वाहिन्‍या, यू ट्यूब वाहिनी आणि सामाजिक माध्‍यमे यांचा अतिशय चातुर्याने वापर करून खोटे कथानक (नॅरेटिव्‍ह) पसरवत आहेत. हे नियोजित षड्‍यंत्र देश आणि विदेशांतून चालवण्‍यात येत आहे. ‘भारताच्‍या नवीन पिढीला हिंदु संस्‍कृतीविषयी आत्‍मगौरव वाटू नये’, हा यामागील उद्देश आहे. या खोट्या कथानकाचा प्रतिवाद करून भारताचा खरा इतिहास, हिंदु धर्म आणि महान संस्‍कृती यांचे खरे कथानक लोकांसमोर ठेवावे लागणार आहे. या संकल्‍पनेतून ‘प्राच्‍यम्’ या यु ट्यूब वाहिनीचा प्रारंभ झाला आहे.’’

ओटीटी प्‍लॅटफॉर्मवर ‘प्राच्‍यम्’चा उदय !

ते म्‍हणाले, ‘‘श्रीराममंदिराची प्रतिष्‍ठापना होणार होती. त्‍यामुळे श्रीरामजन्‍मभूमीसाठी रामभक्‍तांना कराव्‍या लागलेल्‍या संघर्षावर एक ‘व्‍हिडिओ’ बनवला होता. तो ‘यू ट्यूब’ वाहिनीवर प्रसारित केल्‍यानंतर १ घंट्याच्‍या आत वाहिनीने काढून टाकला. माझे यू ट्यूब बंद करण्‍याचीही धमकी देण्‍यात आली. त्‍यानंतर हा ‘व्‍हिडिओ’ अन्‍य सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित करण्‍यात आला. त्‍याला कोट्यवधी दर्शकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. त्‍यानंतर ‘यू ट्यूब’ने हा व्‍हिडिओ परत प्रसारित केला. या बंदीप्रकरणानंतर हिंदूंच्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म’ ‘प्राच्‍यम्’चा प्रारंभ झाला.’ या प्‍लॅटफॉर्मवरून महान भारतीय संस्‍कृतीविषयी व्‍हिडिओ बनवण्‍यात येत असतात. त्‍यामुळे भारतीय युवकांना चांगला संदेश मिळतो.’’

क्षणचित्र :

‘प्राच्‍यम’ ने निर्मित केलेले ‘आपण काय होतो आणि काय बनलो ?, स्‍वातंत्र्यापूर्वी आणि स्‍वातंत्र्यनंतरची स्‍थिती याविषयी सद्यस्‍थिती दर्शवणारा ‘साहेब’, तसेच ‘श्रीरामजन्‍मभूमी संघर्ष’ याविषयावर बनवलेला ‘व्‍हिडिओ’ या वेळी दाखवण्‍यात आला.