संपादकीय : हिंदु राष्ट्राकडे वाटचाल !

रामनाथी, गोवा येथे २४ जूनपासून चालू झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा आजचा शेवटचा दिवस आहे. गेले ६ दिवस या अधिवेशनात जगभरातून आलेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख यांनी विचारमंथन केले, स्वत:चे अनुभव सांगितले. विविध संप्रदाय, आध्यात्मिक संस्थेच्या संतांनी मौलिक मार्गदर्शन करून हिंदूंना दिशा दिली. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी काही कृती करण्याचे संकल्पही केले. महोत्सवामुळे हिंदु धर्मावरील भयावह संकटे आणि आक्रमणे यांची व्याप्ती सर्वांना लक्षात आली.

हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांवर आघात करण्याचे, आक्रमण करण्याचे प्रयत्न गत १ सहस्र वर्षांहून अधिक काळ चालू आहेत. त्या त्या काळात या आघातांना थोडाबहुत, तात्कालिक विरोध झाला; मात्र हिंदूंमध्ये म्हणाव्या तेवढ्या एकीचा अभाव, समोरील समस्यांच्या जाणिवेचा अभाव, आपापसांतील मतभेद, संकुचितपणा, शत्रूची मानसिकता समजून घेण्याची तसदी न घेणे, स्वार्थीपणा, दूरदृष्टीचा अभाव या काही दुर्गुणांमुळे हिंदु समाज आक्रमकांच्या प्रहारात पराभूत झाला. या आक्रमकांनी केवळ हिंदूंनाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर हिंदूंची संस्कृती, सभ्यता, प्रथा-परंपरा, हिंदूंची श्रद्धास्थाने संपवण्याचा प्रयत्न केला. हिंदु धर्म हा चैतन्यमय, ईश्वरनिर्मित, सनातन आणि स्वयंपूर्ण असल्याने तो परकीय आक्रमणांमुळे नष्ट झाला नाही, तरी मोठ्या प्रमाणात झाकोळला गेला. हिंदु धर्मियांमध्ये स्वधर्माविषयीचा अभिमान नष्ट होऊन उलट तिरस्कारच वाटेल, अशी स्थिती परकियांनी करून ठेवली. परिणामी हिंदूंची धर्मापासूनची नाळ तुटली आणि ते सामर्थ्यहीन, बलहीन झाले.

भारताचा विचार करतांना देशावर गत १ सहस्र वर्षांत एवढी आक्रमणे, एवढ्या मोठ्या प्रमाणात लुटालूट, इस्लामी आक्रमकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या सामूहिक कत्तली केल्या; एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदु स्त्रिया, मुली यांच्यावर अनन्वित अत्याचार केले की, हिंदु धर्माच्या जागी अन्य धर्म असता, तर तो एव्हाना नामशेष झाला असता; मात्र तरीही हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय टिकले. इस्लामी आणि ख्रिस्ती आक्रमकांनी हिंदूंची संख्या न्यून करण्याचा प्रयत्न केला, तरीही भारतात हिंदू बहुसंख्य राहिले. याचेच जगभरातील इस्लामी, ख्रिस्ती, साम्यवादी आणि भारतविरोधी यांना शल्य आहे अन् उघड उघड प्रयत्न अनेक शतके करून झाले; पण त्याचा परिणाम झाला नाही. आता शांतपणे, खोटेपणाचा आधार घेत, पद्धतशीरपणे हिंदूंना संपवण्याचा प्रयत्न ते अनेक माध्यमे, हिंदुविरोधी संघटना, पक्ष यांद्वारे करत आहेत. यांतील बर्‍यापैकी प्रयत्न वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनातील उद्बोधन सत्रांमुळे हिंदु समाजाला अवगत झाले आहेत.

हिंदूंची निष्क्रीयता आणि गाफीलपणा यांना अनेक शतकांची परंपरा आहे. आताही हिंदू त्याच मानसिकतेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिंदुत्वनिष्ठ म्हणवल्या जाणार्‍या पक्षांना मोठा धक्का बसला आणि त्यांच्या जागा पुष्कळ घटल्या. येथे हिंदु समाजाची निष्क्रीयता अधोरेखित होते. हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदु समाज यांना कुणीतरी हिंदुत्वाची थोडीफार तरी जाण असणारा राजकीय नेता असला, तरी स्वत:चे राष्ट्र-धर्म कार्याचे दायित्व न्यून झाले, असे वाटून त्याही निष्क्रीय होतात अन् येथेच हिंदुविरोधक उठाव करतात, तसेच ते हिंदुविरोधी कारवाया आणखी जोमाने चालू करतात. हिंदूंच्या या मानसिकतेमुळेच एम्.आय.एम्.सारख्या हिंदुविरोधी पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी भारताच्या भर संसदेत ‘जय पॅलेस्टाईन’, ‘अल्लाहू अकबर’ अशा घोषणा देऊ शकतात. ओवैसी यांच्या या घोषणा प्रशासनाला आक्षेपार्ह वाटल्या नाहीत, उलट हिंदुत्वनिष्ठांनाच सरकारकडे कारवाईची मागणी करावी लागत आहे. जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन हे ‘भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याची कल्पना योग्य नाही’, असे सांगतात; मात्र ‘जिहादींना वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे’, या नियोजनाचा ते निषेध करत नाहीत. ख्रिस्त्यांनी हिंदूंना फसवून आणि प्रलोभने दाखवून केलेल्या धर्मांतराला त्यांनी विरोध केला नाही. भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा टक्का घसरला आणि मुसलमान लोकसंख्या वाढली, याविषयीही त्यांना चिंता वाटत नाही. अशी हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांची मानसिकता आहे. हिंदु राष्ट्राला विरोध करणार्‍यांमध्ये बहुतांश जन्महिंदूच आहे, हेसुद्धा खरे आहे.

‘नॅरेटिव्ह’चे (खोटे कथानकाचे) युद्ध !

‘नॅरेटिव्ह’च्या युद्धाचे हिंदूंपुढे आव्हान आहे. ‘खरे ते झाकायचे आणि खोटे ते ओरडून सांगायचे’, अशी या खोट्या कथानकाच्या युद्धाची रणनीती आहे. खोटे खरे म्हणून सांगण्यासाठी हिंदुविरोधकांना अनेक माध्यमे आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बलाढ्य आणि श्रीमंत व्यक्ती यांसाठी अर्थपुरवठा करत आहेत. भारतातील काही माध्यमे, विकृत मानसिकतेच्या व्यक्ती आणि काही पक्ष यांना हाताशी धरले आहे अन् बिनबोभाट भारतविरोधी ‘अजेंडा’ राबवण्यात येत आहे. यासाठी कुणी सरकार, राजकीय पक्ष सध्या तरी काही कृती करू शकतील, अशा आशेवर हिंदूंनी रहाणे, म्हणजे आत्मघात करणेच होय ! राजकीय पक्षांनाही ‘नॅरेटिव्ह’च्या युद्धाची कल्पना आली आहे; पण ते त्यांचा विरोध राजकीय धोरणाच्या चौकटीत राहून करतील. हिंदु धर्म आणि हिंदूंच्या संदर्भातील कृती करणे, हे नियतीने हिंदूंनाच दिलेले दायित्व आहे, हे कर्महिंदूंना लक्षात आले असेल. हिंदु राष्ट्रासाठी अधिवेशन चालू असतांनाच भाजपच्या एका नवनिर्वाचित खासदाराने संसदेत ‘जय हिन्दु राष्ट्र’ असा जयघोष केला, हे निश्चितच आशादायी उदाहरण आहे. भारताच्या संसदेत विरोधासाठी हिंदु राष्ट्राचे उल्लेख झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्राचा सकारात्मक जयघोष होणे, हे हिंदूंना भूषणावह आहे.

अगदी अलीकडच्या काळातील घटना पाहिल्या, तर हिंदुविरोधी गटांना चर्चेचे उघड आव्हान देत त्यांचा हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविरुद्ध अपप्रचार खोडून काढावा लागणार आहे. गावोगावी आणि घरोघरी जाऊन हिंदूंना त्यांच्याविरुद्ध चाललेल्या षड्यंत्राविषयी अवगत करावे लागणार आहे. हिंदूंना विरोध, म्हणजेच भारताला विरोध, हिंदूंचा शत्रू तोच भारताचाही शत्रू, हे हिंदूंच्या मनावर बिंबवावे लागले. हिंदू आणि भारत यांच्यात भेद नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर सांगायचे, ‘हिंदु हे स्वयं एक राष्ट्र आहेत !’ यानुसार हिंदूंवर आघात म्हणजे भारतावर आणि त्याच्या अस्तित्वावर आघात या व्यापक दृष्टीने खोट्या कथानकांच्या या मोठ्या युद्धात हिंदु समाजाला उतरावे लागेल. आधुनिक माध्यमे, तंत्रज्ञान यांचा प्रचारात उपयोग करावा लागेल. मंदिरांना ‘हिंदु जागृतीची केंद्रे’ सिद्ध करून त्याद्वारे आसपासच्या भागांत हिंदुहितैषी उपक्रम राबवावे लागतील. अशा कितीतरी कृती धर्माचे अधिष्ठान ठेवून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे ‘ही श्रींची इच्छा’ या उदात्त ध्येयाने केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना या महन्मंगल कार्यात हिंदु समाज यशस्वी होईल आणि त्याचा पारमार्थिक अभ्युदयही साध्य होईल, यात संशयच नाही !