Disinformation Lab Report On Khalistani India :  भारताला अस्थिर करण्यासाठी पाश्‍चिमात्य देशांकडून खलिस्तान्यांचा वापर ! – ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’चा अहवाल

  • भारतपुरस्कृत ‘आंतरराष्ट्रीय दडपशाही’ आणि खलिस्तानी कार्यकर्ते’ या संज्ञांचा वापर !

  • कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रलिया आदी देशांत घडल्या नियोजनबद्ध घडामोडी !

लंडन (ब्रिटन) – ‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’ या भारत आणि हिंदु धर्म यांच्या विरोधात चालू असलेल्या जागतिक षड्यंत्राचा भांडाफोड करणार्‍या संस्थेने खलिस्तान्यांचा वापर करून रचलेले असेच एक षड्यंत्र उघड केले आहे. संस्थेने तिच्या ‘एक्स’ खात्यावरून याची माहिती देत गतवर्षी जून महिन्यात घडलेल्या विविध देशांतील ५ स्वतंत्र दिसणार्‍या घडामोडींवर प्रकाश टाकला आहे.

संस्थेने सांगितले की,

१. पहिली घडामोड : १३ जून २०२३ या दिवशी लंडन येथील ‘सेंटर फॉर इन्फॉर्मेशन रेझिलियन्स’ (सी.आय.आर्.) या भारतद्वेष्ट्या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला. त्यात तिने  भारताने कथानक रचून खलिस्तानी ‘कार्यकर्त्यां’ना नकारात्मकदृष्ट्या रंगवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला. यासाठी भारत सरकारने मूठभर निनावी व्यक्तींचा वापर केला. हा आरोप करतांना या संस्थेने खलिस्तानी चळवळीचा उदोउदो करत कथित भारतपुरस्कृत ‘आंतरराष्ट्रीय दडपशाही’ आणि ‘खलिस्तानी कार्यकर्ते’ हे शब्द प्रसृत केले.

२. दुसरी घडामोड : १४ जून २०२३ या दिवशी अमेरिकेने चेक रिपब्लिक येथे अटकेत असलेले भारतीय प्रशासकीय अधिकारी निखिल गुप्ता यांना तेथून प्रत्यार्पण केल्याचे दाखवले. त्यांच्यावर कुख्यात खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नून याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला. १४ जूनला गुप्ता यांचे प्रत्यार्पण झाले, तर १७-१८ जूनला या घटनेची बातमी प्रसारित करण्यात आली.

 

३. तिसरी घडामोड : १७ जून २०२३ या दिवशी ‘ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ (एबीसी) या वृत्तसंस्थेने पत्रकार अवनी डायस यांच्या अहवालाच्या आधारे ‘भारत सरकार खलिस्तान्यांच्या विरोधात कारस्थान करत आहे’, असे सांगणारा माहितीपट सिद्ध केला. यामध्येही ‘खलिस्तानी कार्यकर्ते’ आणि ‘आंतरराष्ट्रीय दडपशाही’ या शब्दांचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे याच अवनी डायस यांनी ‘भारताने त्यांना व्हिसा नाकारला’ असे म्हटले होते. हा आरोप बनाव असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

४. चौथी घडामोड : १७ जून २०२३ या दिवशी अमेरिकेचे संसद सदस्य जेफ मक्ले आणि इतर डेमोक्रॅट्स (होलन, सँडर्स, केन, वायडेन) यांनी भारताच्या ‘आंतरराष्ट्रीय दडपशाही’ या शब्दांचा वापर करत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला पत्र लिहिले.

५. पाचवी घडामोड : १९ जून २०२३ या दिवशी कॅनडाच्या संसदेने भारताच्या कथित ‘आंतरराष्ट्रीय दडपशाही’च्या कटात मारला गेलेला खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्यासाठी मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

‘डिसइन्फॉर्मेशन लॅब’ संस्थेने मांडलेले निष्कर्ष !


१. या सर्व घटना एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असल्या, तरी एकाच कालावधीत घडल्या आहेत. यातून मोठा भारतद्वेषी प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

२. बहुतेक खलिस्तानी ‘काल्पनिक’ धमक्यांसाठी घाबरलेले असतात, असे दाखवले जाते. त्यामुळे हे खलिस्तानी स्वत:च्या मालमत्तेचे रक्षण करतात आणि भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

३. अशा प्रकारे समन्वय साधून आणि बातम्या अन् बनावट सामग्री पेरून ते भारतात संघर्ष भडकावण्याचा प्रयत्न करत असतात. भारतातील काही मानवाधिकार कार्यकर्त्यांना हाताशी धरून निषेध मोर्चे काढणे आणि त्यात ‘आंतरराष्ट्रीय दडपशाही’चे कथानक राबवण्याचे काम ते करतात.

४. या षड्यंत्राकडे आपण केवळ एक बघ्याची भूमिका घेतली आहे; मात्र ‘नैतिक अध:पथनाचा’ हा अन्याय उघड झालाच पाहिजे, असेही या संस्थेने शेवटी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

भारतविरोधी शक्ती कशा प्रकारे भारत आणि हिंदु धर्म यांच्या मुळावर उठल्या आहेत, याचे सबळ पुरावे देणारे हे उदाहरण ! या जागतिक शक्तींना शह देण्यासाठी सर्व स्तरावरील हिंदूंनी नि:स्वार्थ रूपाने एकत्र येऊन संघटित नि पद्धतशीरपणे कार्य करणे काळाची नितांत आवश्यकता !