भारताचे खाऊन पाकिस्तानचे गुणगान गाणार्‍यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – शंकर संगपाळ, बजरंग दल सहसंयोजक, नवी मुंबई

निषेध आंदोलनात सहभागी धर्माभिमानी

नवी मुंबई, १९ जून (वार्ता.) – पाकिस्तान आतंकवादी निर्माण करत आहे. अशा स्थितीत भारताचे खाऊन म्हणजेच भारतामध्ये राहून पाकिस्तानचे गुणगान गाणार्‍यांना बजरंग दल जशास तसे उत्तर दिल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी बजरंग दलाचे नवी मुंबई सहसंयोजक शंकर संगपाळ यांनी येथे दिली. जिहादी आतंकवाद्यांनी यात्रेकरू भाविकांच्या बसवर जिहादी आक्रमण केले. त्यात ११ हिंदु बांधव ठार झाले. याचा निषेध करण्यासाठी सीबीडी येथील श्री महाकाली माता चौक येथे विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई जिल्हा सहमंत्री स्वरूप पाटील, अमरजीत सुर्वे, नगर कार्यवाह निशांत नाईक यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

शंकर संगपाळ म्हणाले…

१. नवी मुंबईतील अनेक विभागांमधून रोहिंग्या बांगलादेशी घुसखोर पकडले गेले आहेत. बेकायदेशीररित्या रहाणार्‍या नायजेरियन लोकांचाही त्रास वाढला आहे. सीवूड मध्येही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या आतंकवाद्यांना पकडण्यात आले.

२. पोलिसांना याची माहिती मिळत नाही, ही पोलीस दलाची शोकांतिका आहे. सैनिक सीमेवरील आतंकवाद मोडून काढतीलच; परंतु गाव आणि शहरे येथे असलेले छुपे आतंकवादी बजरंग दल शोधून काढेल.

३. काही वर्षांपूर्वी सैन्यासह सीमेवर जाऊन कोण कोण लढले, याविषयी स्वाक्षरी अभियान घेण्यात आले होते. त्या वेळी बजरंग दलाच्या लाखो कार्यकर्त्यांनी त्यावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. बजरंग दल कोणत्याही परिस्थितीत देशविरोधी कारवाया सहन करणार नाही.

४. पोलिसांनीही कोणत्या ठिकाणी बांगलादेशी रोहिंग्या रहातात, याविषयी सतर्क असायला हवे. आम्हाला याची माहिती मिळाली आणि त्यावर कारवाई करण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, तर याला सर्वस्वी पोलीस प्रशासन उत्तरदायी राहील.

देशविरोधी कारवायांना संघटितपणे प्रतिकार करावा ! – निशांत नाईक, नगर कार्यवाह   

आपल्या भागामध्ये कुणी देशविरोधी कारवाया करत असतील, तर त्यांना आपण संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे. यासाठी आपण आपल्या नोकरी-व्यवसायातून वेळ काढून संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे.