निर्जला एकादशीचे माहात्म्य !

आज (१८.६.२०२४ या दिवशी) ‘निर्जला एकादशी’ आहे. त्या निमित्ताने…

१. व्रतांचा महिमा आणि त्यापासून होणारे लाभ

‘निज ज्येष्ठ एकादशी ही कायदेविषयक कामास योग्य. या दिवशी विवाहविषयक कामे करू नयेत. निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम जे काही केले जाते, ते सर्व अक्षय होते. या एकादशीला विधीपूर्वक उत्तम रितीने उपवास करून भक्त वैष्णव पद प्राप्त करतो. शास्त्रांमध्ये व्रतांचा पुष्कळ महिमा आहे. प्राचीन काळी व्रतांचा उद्देश केवळ आत्मकल्याण आणि आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती एवढाच मर्यादित होता. काळाच्या ओघात विविध कामनांची पूर्ती, सुख-शांती आणि लौकिक उत्कर्षासाठी विविध प्रकारची व्रते रूढ झाली. व्रताद्वारे श्रद्धा, भक्ती, पवित्रता, ज्ञान इत्यादी सद्गुणांची वाढ होते. त्यासह आयुर्वेदाच्या दृष्टीने व्रते उत्तम आरोग्यासाठीही साहाय्यक आहेत. पुराणांमध्ये व्रतांना पाप-ताप, दुःख-दारिद्र्य आणि रोगांचा नाशकर्ता मानलेले आहे. त्यांच्याद्वारे ईश्वरप्राप्तीचे वर्णनही शास्त्रांमध्ये येते. व्रतांद्वारे मनोरथ पूर्ण झाल्याचेही अनेक प्रसंग शास्त्रांमध्ये वाचायला मिळतात. महान ऋषींनी व्रतांमध्ये केवळ बाह्य आचरणांचा समावेश केलेला नसून माणसाची खरी उन्नती व्हावी, या दृष्टीकोनातून व्रतांची संज्ञा दिली आहे.

 २. एकादशीचे प्रकार

प्रत्येक ३ वर्षांनी येणार्‍या अधिक मासातील २ एकादशींनाही नावे आहेत. अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘कमला’ आणि कृष्ण पक्षातील एकादशीलाही ‘कमला’ म्हणतात. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात २ वेळा एकादशी येते. एखाद्या पंधरवड्यात क्वचित् एकादशी दोन दिवस लागोपाठ येते. त्यापैकी ‘पहिली स्मार्त एकादशी, तर दुसर्‍या दिवशी भागवत एकादशी’, असे म्हणतात. श्री शंकराने पहिल्या पूर्णतिथीचा स्वीकार केला, तर श्रीविष्णूने दुसर्‍या शेष तिथीचा स्वीकार केला; म्हणून वारकरी संप्रदाय दुसरी एकादशी करतात.

दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र होऊन फुले वाहून श्री केशवांची पूजा करावी. मग नित्य पूजा-पाठ आटोपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे. प्रसुती आणि मृत्यूनंतर लागलेल्या सूतकातही एकादशीला भोजन करू नये.

३. एकादशी व्रत

हे व्रत फारसे अवघड नाही. एकादशीच्या आदल्या दिवशी आणि पुढील दिवशी, म्हणजे द्वादशीस एक वेळ जेवण घ्यावे. एकादशीस फळ, दूध, आहार, ईश्वर चिंतन, दर्शन वारी, पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण धार्मिक कार्यात दिवस पूर्णपणे घालवून उपवास करावा. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे पारायण करावे.

या व्रताने मनशुद्धी आणि आरोग्य प्राप्ती होते अन् भक्तीभाव वाढतो. भगवान कृष्णाने पांडव, कुंती, द्रौपदी यांना व्रत महत्त्व सांगितले आहे. याचेच आचरण आज सर्व वारकरी संप्रदाय करतो.

 ४. एकादशी व्रताचे महत्त्व

सदा सर्वकाळ ईश्वराचे महत्त्व ध्यानात रहावे, ही भक्ताची इच्छा असते. यामुळे यात्रेकरू पंढरपूर, आळंदी इत्यादी क्षेत्री जातात. सहस्रोंनी लोक आल्याने त्याला वारीचे स्वरूप प्राप्त होते. यात्रेत ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘रामकृष्ण हरि’ या नामाचा घोष होतो. हरिभजन, कीर्तन, नामस्मरण होते. प्रपंच, संसार, दुःख, पाप यांचे हरण होऊन पुण्य मिळते. मन आणि शरीर शुद्ध होते. संत संगत मिळते.

५. निर्जला एकादशी व्रताचा महिमा आणि लाभ

निर्जला एकादशीला जो अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू, तसेच छत्री दान करतो, तो साेन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचा महिमा भक्तीभावाने ऐकतो अथवा तिचे वर्णन करतो, तो स्वर्गात जातो. चतुर्दशीयुक्त अमावास्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो, तेच पुण्यफळ या एकादशीचे माहात्म्य ऐकल्यानेही लाभते. प्रथम हा नियम घेतला पाहिजे, ‘मी श्रीहरीच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही.’

द्वादशीला देवेश्वर भगवान विष्णूची पूजा करावी. गंध, धूप, फुले आणि सुंदर वस्त्राने विधीपूर्वक पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा.

देवदेव हृषीकेश संसारार्णवतारक ।
उदकुम्भप्रदानेन नय मां परमां गतिम् ।।
– पद्मपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ५१, श्लोक ६०

अर्थ : संसारसागरातून तारणार्‍या हे देवाधिदेवा हृषीकेशा, या पाण्याने भरलेल्या घड्याच्या दानाने आपण मला श्रेष्ठ गतीला न्यावे.

पद्मपुराणातून जे लोक चातुर्मास व्रतात एखाद्या ‘निर्जला एकादशी’सारखे व्रत करतील, त्यांना अनंत सुख मिळते आणि अखेरीस स्वर्गलोकी जातात.’

– ज्योतिषी ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे
(साभार : मासिक ‘भक्तीसंगम’, वर्ष २००७)