हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी … महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

हिंदूंच्या आणि जगभरातील मानवांच्या सद्यःस्थितीवरील एकमेव उपाय म्हणजे अध्यात्म विश्वविद्यालय !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

१. भारताला पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना !

विविध संत-महात्मे आणि संप्रदाय यांनी भारताची आध्यात्मिक चेतना सहस्रो वर्षे जागृत ठेवली. यापुढेही ती जागृत रहावी, यासाठी धर्मग्रंथ, हिंदूंच्या विविध उपासनापद्धती, साधनामार्ग, धार्मिक विधी अन् त्यांमागील शास्त्र, देवतांच्या उपासनेमागील शास्त्र इत्यादींचे एकत्रित ज्ञान देणारे एक विश्वविद्यालय स्थापन करण्याची आवश्यकता आहे. भारत जेव्हा वैभवाच्या शिखरावर होता, तेव्हा आपल्याकडे तक्षशिला, काशी, भोजशाळा इत्यादी विद्यापिठे होती. जर तशी विद्यापिठे स्थापन केली, तर भारत पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचेल. या दृष्टीनेच सनातन संस्थेचे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ स्थापन करण्यात आले आहे.

२. तक्षशिला आणि नालंदा यांप्रमाणे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय होणार असणे !

भारतात इ.स. पूर्व ७०० वर्षांपूर्वी तक्षशिला विश्वविद्यालय होते. ‘नालंदा’ या विश्वविद्यालयाची स्थापना ५ व्या शतकात करण्यात आली होती. तेथे शिकण्यासाठी जगभरातील सहस्रो जिज्ञासू येत. त्या विश्वविद्यालयात ईश्वरप्राप्तीसाठीच्या १४ विद्या आणि ६४ कला शिकवल्या जात असत. आज जगभर भौतिक शिक्षण देणारी विद्यापिठे असली, तरी अशा प्रकारे सर्वव्यापी अध्यात्मशास्त्र, तसेच ईश्वरप्राप्ती यांचे शिक्षण देणारे एकही विद्यापीठ नाही. ही उणीव दूर करण्यासाठी आणि जगभर सनातन धर्माच्या प्रसारासाठी २२.३.२०१४ या दिवशी गोवा येथे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ स्थापन करण्यात आले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेनंतर व्यापक स्वरूपात कार्यरत होणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’त ईश्वरप्राप्तीसाठीच्या ६४ कलाही शिकवल्या जातील. त्यासंदर्भातील सिद्धतेचे एक उदाहरण म्हणजे ‘गायन, नृत्य, वाद्यवादन, चित्रकला आणि मूर्तीकला या कलांच्या माध्यमातून सुख नाही, तर ईश्वरप्राप्ती कशी करायची’, हे सध्या साधकांना शिकवण्यात येत आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा मुख्य उद्देश !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’तील विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक उन्नती करून मोक्षप्राप्ती करून घ्यावी’, हा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या स्थापनेमागील मुख्य हेतू आहे. मी वर्ष १९८९ मध्ये अध्यात्म विश्वविद्यालयाची संकल्पना मांडतांना म्हणालो होतो, ‘सनातनच्या अध्यात्म विश्वविद्यालयातून पदवीधर होऊन बाहेर पडणारे संतच असतील. त्यांना कागदावर लिहिलेल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसेल !’

जगभरच्या मानवजातीला हिंदु धर्म सोडून कोणताच आधार नाही. तो त्यांना मिळावा, यासाठी विश्वविद्यालयातील विद्यार्थी आणि संत जगभर धर्मशिक्षण देतील.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची वैशिष्ट्ये आणि कार्य !

पूर्वी तक्षशिला आणि नालंदा या विद्यापिठांत जसे जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत, तसेच आता जगभरातील जिज्ञासू आणि साधक या विश्वविद्यालयात विविध विषयांवरील कार्यशाळांच्या निमित्ताने येत आहेत. तक्षशिला आणि नालंदा यांची उणीव भरून काढून भारताला ‘विश्वाचा आध्यात्मिक गुरु’ या स्थानी विराजमान करण्याच्या ध्येयाच्या दिशेने ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची पावले वेगाने पडत आहेत !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


संत बनवणारे विश्वविद्यालय !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातून प्राप्त होणारे संतपद केवळ मानसिक किंवा बौद्धिक स्तरावरचे नसून ते आध्यात्मिक स्तरावरचे आहे. या संतांमध्ये सूक्ष्म जगताविषयी जाणण्याची क्षमता आहे. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात शिकवली जाणारी साधना केल्यामुळे साधक साधनेत जलद गतीने वाटचाल करत आहेत. येणार्‍या तिसर्‍या महायुद्धात अखिल मानवजातीला संहारापासून वाचवण्यासाठी ‘संत होणे’ पुष्कळ महत्त्वाचे आहे. वास्तविक पहाता तिसरे महायुद्ध चांगल्या आणि वाईट शक्ती यांच्यामध्ये होणार आहे. संतांकडून चांगली शक्ती प्रक्षेपित होत असते. या चांगल्या शक्तीमुळेच जग वाचू शकणार आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील शिकवण्याची पद्धत

१. सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असे मूलभूत शिक्षण : महाविद्यालये आणि पदव्युत्तर शिक्षण देणार्‍या संस्था यांत ‘कोणता विषय प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने कसा शिकवायचा’, याचे नियोजन असते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात पुढे शिकवण्यात येणार्‍या १४ विद्या आणि ६४ कला या सर्व विषयांचा पाया ‘सात्त्विकता’ हा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडून पहिली ४ – ५ वर्षे साधना करून घेतली जाते. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’ हा अध्यात्मातील एक मूलभूत सिद्धांत आहे. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याचा साधनामार्ग निरनिराळा असला, तरी कोणत्याही मार्गाने साधनेत प्रगती करण्यासाठी विद्यार्थी सात्त्विक असणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येकाकडून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या जोडीला नामजपाची साधना करून घेतली जाते. यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१ अ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन : यांच्यामुळे मन सात्त्विक होते. सात्त्विक मनामुळे विषय शिकणे सुलभ होते.

१ आ. नामजप

१ आ १. वाईट शक्तीच्या त्रासाचे निर्मूलन : हल्लीच्या काळात समाजातील सुमारे ८० टक्के व्यक्तींना वाईट शक्तींचा अल्प, मध्यम किंवा तीव्र त्रास असतो. तो गेल्यावरच साधनेत आणि शिक्षणातील विषयात प्रगती करणे शक्य होते. नामजपामुळे वाईट शक्तीचा त्रास दूर होतो.

१ आ २. चांगली शक्ती आणि चैतन्य यांची प्राप्ती : यांमुळे साधना करायला बळ आणि उत्साह मिळतो.

२. अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य : विद्यार्थ्यांच्या वयानुसार नव्हे, तर साधनेच्या स्थितीनुसार आणि अंगी असलेल्या कलागुणांनुसार त्यांच्यासाठीचा अभ्यासक्रम ठरवला जातो.

३. अध्यात्म विश्वविद्यालयातील शिकवण्याची सद्यःस्थिती : स्वभावदोष आणि अहं निर्मूलन, तसेच  नामजप हे साध्य केलेले गुरुकृपायोगानुसार साधना केलेले विद्यार्थी अध्यात्म, तसेच चित्रकला, संगीत, नृत्य इत्यादी कला आध्यात्मिक स्तरावर शिकून प्रगती करत आहेत.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


‘एखादी वस्तू किंवा व्यक्ती चांगली आहे कि वाईट’ याचा अभ्यास करता येणे

वाईट शक्तींचे मोजमापन करण्यासाठी प्रगत मोजमापक यंत्रे उपलब्ध नाहीत. वाईट शक्तींसंदर्भात संशोधन करतांना लक्षात आले की, एक ‘मोजमापक यंत्र’ म्हणूनही त्यांचा वापर करता येतो. सात्त्विक वस्तू किंवा व्यक्ती यांमुळे वाईट शक्तींना त्रास होतो, तर तामसिक वस्तू किंवा व्यक्ती यामुळे त्यांना चांगले वाटते. त्यामुळे वाईट शक्तींना किती त्रास होतो आणि किती चांगले वाटते, यावरून ‘वस्तू किंवा व्यक्ती चांगली आहे कि वाईट’ याचा अभ्यास करता यायला लागला !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले


आध्यात्मिक कार्यशाळांचे आयोजन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने देश-विदेशांतील जिज्ञासूंसाठी आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यांमध्ये साधना चांगली होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, आध्यात्मिक उपाय आदींविषयी जिज्ञासूंना तात्त्विक आणि प्रायोगिक मार्गदर्शन केले जाते. मार्च २०२४ पर्यंत ६४ आध्यात्मिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.

येथे वैज्ञानिक उपकरणांद्वारे सकारात्मक आणि नकारात्मक घटकांचा आध्यात्मिक दृष्टीकोनातून वेध घेऊन त्यांची सत्यता पडताळली जाते. यातून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला वैज्ञानिक परिभाषेत अध्यात्म सांगण्याचे कार्य करता येत आहे.

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय


हिंदु धर्माची प्रयोगशाळा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय हे सनातन धर्माच्या सर्व अंगांचा तौलनिक अभ्यास करून संशोधन करणारे अद्वितीय विश्वविद्यालय आहे. अध्यात्म किंवा धर्म हे ९८ टक्के प्रायोगिक शास्त्र आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ ही हिंदु धर्माची प्रयोगशाळा आहे.

– कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे, सनातन आश्रम, रामनाथी गोवा.


महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक उपकरणे वापरून संशोधन करण्याचे कारण !

ऋषिमुनींना त्यांचे बोलणे सिद्ध करण्यासाठी कधी वैज्ञानिक उपकरणांचा वापर करावा लागला नाही. ऋषिमुनींना सूक्ष्मातील सर्व ज्ञात असल्याने ‘ते जे बोलतात, ते सत्यच असते’, यावर सर्वांची श्रद्धा होती. त्यामुळे ऋषिमुनी जे सांगत, ते ‘शब्दप्रमाण’ मानून, म्हणजे ‘सत्य आहे’, असे समजून सर्व जण त्यावर विश्वास ठेवायचे.

सौ. मधुरा कर्वे

आता कलियुगात बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादींना अध्यात्मशास्त्रातील सिद्धांत पटवून देण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्माे स्कॅनर)’, ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा  स्कॅनर)’, ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी), ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’,‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘थर्मल इमेजिंग (Thermal Imaging)’ इत्यादी उपकरणे आणि प्रणाली यांचा वापर करून अध्यात्मशास्त्रातील संशोधन सिद्ध करून दाखवावे लागते. आतापर्यंत २ सहस्र ७०६ विषयांवर उपकरणांच्या साहाय्याने संशोधन झाले आहे.

– सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय


वाचकांना सूचना :

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाची ओळख

‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत.


‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे कलेच्या संदर्भातील कार्य !

नृत्य साधना

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’कडून वेदांसह १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून साधना करणार्‍यांना ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीने शिक्षण दिले जाणार आहे. याचा आरंभ म्हणून पौरोहित्य, चित्रकला, मूर्तीकला, संगीत आणि नृत्य यांचे प्रशिक्षण देणे चालू आहे.

हिंदु संस्कृतीने प्रत्येक कलेला ईश्वरप्राप्तीचे एक माध्यम म्हणून पाहिले आहे. संत सूरदास यांची भजने ऐकण्यासाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः यायचा, तर संत नामदेवांच्या भजनांवर श्री विठ्ठल प्रत्यक्ष नाचत असे. ‘प्रत्येक कलेच्या उपासकांना कलेच्या  माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या या टप्प्यापर्यंत नेणे’, हा महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

विविध कलांचे बीजारोपण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

वर्ष १९९७ पासून चित्रकला आणि वर्ष २००२ पासून मूर्तीकला या कलांच्या माध्यमातून साधना करणार्‍यांना साधनेच्या दृष्टीतून शिक्षण दिले जात आहे. या साधक-कलाकारांनी विविध सात्त्विक कलाकृतींची निर्मितीही केली आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संगीत, नृत्य आणि वाद्यवादन या विभागांच्या कार्यांचे बीज हे एका ठिकाणचे दोन संत ७.२.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रमात येऊन भेटल्यापासून चांगल्या प्रकारे रोवले गेले आहे. या विषयांशी संबंधित पाश्चात्त्य आणि भारतीय शास्त्रे यांचा, तसेच दैवी आणि आसुरी विषय यांचा अभ्यास चांगल्या गतीने होत आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

६४ कलांना पुनरुज्जीवित करण्याचा संकल्प आणि त्याचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी पाया सिद्ध केलेला असणे !

‘सध्याच्या काळात ६४ कला सुप्त अवस्थेत आहेत. ज्या साधकांना कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करायची आहे, त्यासाठी ‘६४ कलांना पुनरुज्जीवन प्राप्त व्हावे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प आहे आणि त्याचा त्यांनी पाया सिद्ध केला आहे. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने ज्ञानसूर्यात श्रीविष्णूच्या कलात्मक शक्तीचे अंशात्मक प्रगटीकरण होईल. त्यामुळे ज्ञानसूर्याला ‘६४ कलांविषयी साधक-कलाकारांना उपयोग होईल’, असे तात्त्विक आणि प्रायोगिक ज्ञान प्राप्त होईल. यातूनच कलाकारांना कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग मोकळा होईल.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.११.२०१७)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.