ठाणे येथील संत पू. डॉ. राजकुमार केतकर यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या कार्याविषयी व्यक्त केलेला विश्वास !

मार्च २०२० मध्ये पू. डॉ. राजकुमार केतकर यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या त्यांच्या संत सन्मानाचे चलत्‌चित्र (व्हिडिओ) त्यांना पहाण्यासाठी पाठवले होते. त्याविषयी माझे त्यांच्याशी भ्रमणभाषवर संभाषण झाले. त्या वेळी त्यांनी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. डॉ. राजकुमार केतकर : ‘मला नृत्यावरील काही ग्रंथ मिळाले आहेत, तसेच माझ्याकडे नृत्याविषयीच्या ध्वनी-चित्रचकत्याही (सीडी) आहेत. त्या मला तुम्हालाच द्यायच्या आहेत; कारण या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून जे कार्य होणार आहे, ते मानवजातीसाठी आहे. त्यामुळे हे सर्व साहित्य तिथे असणे आवश्यकच आहे. ही दळणवळण बंदी संपल्यावर मी माझ्या पूर्ण कुटुंबासहित तिकडे येणारच आहे.

नृत्याविषयी माझ्याकडे असलेले ज्ञान मला तुम्हाला द्यायचे आहे. आम्ही स्वतः आश्रमात येऊन तुमचे कार्य पाहिले आहे. त्यामुळे ‘समाजातील अधिकाधिक लोकांपर्यंत हे कार्य पोचावे’, असे मला पुष्कळ वाटत आहे. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण केल्यावर ते सतत माझ्या समवेतच असल्याचे मला जाणवते. त्यांना माझा नमस्कार सांगा.’

– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२०)