मुंबई महापालिकेच्या अनुपस्थित कर्मचार्यांवर कारवाईची शक्यता !
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या कर्मचार्यांना जिल्हाधिकार्यांनी कार्यमुक्त केलेले असले, तरी ८० टक्के कर्मचारी कर्तव्यावर रुजू झालेले नाहीत. अपुर्या मनुष्यबळामुळे अडचण येत आहे. अनुपस्थित रहाणार्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. २६ जूनला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कार्यरत कर्मचार्यांनी मूळ कार्यालय सांभाळून आठवड्यातील दोन दिवसच निवडणुकीला देणे अपेक्षित आहे.
दूषित पाण्यामुळे रहिवासी आजारी !
वांद्रे (मुंबई) – येथील साहित्य सहवास आणि पत्रकार वसाहत येथे दूषित पाणी प्यायल्याने काही रहिवासी आजारी पडले आहेत. या प्रकरणी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संपादकीय भूमिका : आरोग्याच्या संदर्भात असा निष्काळजीपणा करणार्यांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !
आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा पुनरुच्चार !
पनवेल – येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव मिळण्यासाठी आंदोलक प्रयत्न करत आहेत. ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती’च्या बैठकीत पंतप्रधान, नागरी विमान वाहतूक केंद्रीय आणि राज्य मंत्री यांच्याकडे नावासाठी पाठपुरावा करण्याचे एकमताने ठरवण्यात आले. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे संमतीसाठी पाठवून २ वर्षे होऊनही त्यावर निर्णय झालेला नाही.
नवी मुंबईत अमली पदार्थ विक्रीसाठी आणणारे दोघे अटकेत !
नवी मुंबई – येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत अमली पदार्थ विक्रीसाठी आणलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १३१.५० ग्रॅम वजनाचा एम्डी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. त्याचे बाजारमूल्य १३ लाख १५ सहस्र रुपये आहे. जितेंद्र गुप्ता आणि भूपेंद्र हिरांचंद खंडेलवाल अशी आरोपींची नावे आहेत.
संपादकीय भूमिका : समाजाला व्यसनाधीन करणार्यांवर कठोर कारवाईच हवी !
पनवेल येथे ‘महावितरण’चे वायरमन घायाळ !
पनवेल – येथील आदई गावात एका इमारतीजवळील वीज वाहिनीवर दुरुस्तीचे काम करत असतांना शॉर्टसर्किटमुळे आगीच्या ठिणग्या उडून ‘महावितरण’चे वायरमन किरण पाटील यांचा मानेचा भाग जळून ते घायाळ झाले. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
मुंबईत हिवतापाचे रुग्ण अधिक !
मुंबई – मुंबईत जानेवारी ते मे या कालावधीत हिवतापाचे १ सहस्र ६१२ रुग्ण आढळले आहेत. मागील ४ वर्षांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. (सरकार आणि प्रशासन हिवताप रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार ? – संपादक)