पालख्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून पालखी मार्गांची पहाणी !

पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्याचे पुणे महापालिकेच्या आयुक्तांचे आदेश !

पालखी मार्गांची पहाणी करताना आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले

पुणे – संतश्रेष्ठ जगद्गुरु ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरुस्ती करणे, अतिक्रमण हटवणे, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता करणे, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणे आणि स्वच्छताविषयक कामे करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. पालखी मार्गांवरील अतिक्रमणे काढण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. दोन्ही पालख्यांचे आगमन पुणे शहरात ३० जून या दिवशी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गांची पहाणी केली.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकर्‍यांसाठी विसावा/आराम कक्षही उभारण्याची व्यवस्था करण्याविषयी आदेश देण्यात आलेले आहेत. वाहतूक पोलिसांद्वारे वाहतूक सुरळीत रहावी, तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याविषयीच्या सूचना त्यांनी या वेळी केल्या. अग्नीशमनविषयक सुविधा, पालखी मार्गावर आणि सर्व पेठांमध्ये २४ घंटे पाणीपुरवठा व्यवस्था, फिरती रुग्णालये आणि फिरती शौचालये यांची व्यवस्था, तसेच पालखी पुणे मुक्कामी असतांना विद्युत् व्यवस्था खंडित होणार नाही, याविषयी संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.