अंडा पुलावचाही समावेश !
मुंबई, ११ जून (वार्ता.) – यापूर्वी चालू असलेल्या केंद्र सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेचे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’ असे नामांतर करण्यात आले आहे. या योजनेतून इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५ प्रकारचे विविध पौष्टिक पदार्थ दिले जाणार आहेत. यामध्ये मांसाहार करणार्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस अंडा पुलावही दिला जाणार आहे. या दिवशी शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी शाकाहारी पुलाव दिला जाईल.
‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने’च्या अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी पाककृती सुधारणा समितीने विद्यार्थ्यांसाठी १५ प्रकारच्या पाककृतींना मान्यता दिली आहे. यामध्ये ‘व्हेजिटेबल पुलाव’, ‘मसाले भात’, ‘मटार पुलाव’, ‘मूगडाळ खिचडी’, ‘चवळी खिचडी’, ‘चणा पुलाव’, ‘सोयाबीन पुलाव’, ‘मसुरी पुलाव’, ‘अंडा पुलाव’, ‘मोड आलेल्या मटकीची उसळ’, ‘गोड खिचडी’, ‘मूग शेवगा वरण भात’, ‘तांदळाची खीर’, ‘नाचणीचे सत्त्व’ आणि ‘मोड आलेले कडधान्य’ आदी पदार्थांचा समावेश आहे. जे विद्यार्थी अंडी खाणार नाहीत, त्यांना केळी देण्यात येणार आहेत. आठवड्यातील ४ दिवस विद्यार्थ्यांना तांदळाची खीर आणि आठवड्यातील १ दिवस नाचणीचे सत्त्व दिले जाणार आहे. दूध पावडर, गूळ, साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करण्यासाठी शासनाकडून शालेय व्यवस्थापन समितीला निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. नाचणीच्या सत्त्वासाठी भारतीय अन्न महामंडळाकडून शाळांना नाचणीचा पुरवठा करण्यात येणार आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणते पदार्थ निश्चित करावेत, याचा निर्णय घेण्याचा अधिकार शासनाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना देण्यात आला आहे.