बीजिंग (चीन) – तैवानला चीनपासून जो वेगळा करण्याचा प्रयत्न करेल त्याचा नाश होईल, अशी धमकी चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांनी दिली आहे. गेल्या २-३ दिवसांत चीनने तैवानच्या भोवताली असलेल्या समुद्रात सैनिकी सराव केला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात युद्धनौका, लढाऊ विमाने आदी तैवानजवळील समुद्रात तैनात करण्यात आल्या होत्या. चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो, तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो.
डोंग जून पुढे म्हणाले की, चीनने नेहमीच इतर देशाच्या कायद्यांचा आदर केला आहे. चीनच्या सार्वभौमत्त्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करणे हे चिनी सैन्याचे पवित्र कार्य आहे. तैवान प्रश्न हा चीनच्या मूळ हितसंबंधाच्या केंद्रस्थानी आहे; मात्र तैवान विभक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. तैवान चिनी ओळख पुसून टाकण्याचा आणि तैवान सामुद्रधुनी ओलांडून सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध तोडण्याकरता प्रयत्न करत आहे. तैवानसंबंधातील समस्या चिनी कायद्यानुसार हाताळणे हे पूर्णपणे कायदेशीर आहे. यात कोणताही परकीय हस्तक्षेप नाही. तैवानच्या स्वातंत्र्याला आळा घालण्यासाठी आम्ही ठोस कृती करू आणि तैवानला स्वतंत्र करण्याचा डाव कधीही यशस्वी होणार नाही, याची निश्चिती करू.
संपादकीय भूमिकाविस्तारवादी चीन तैवानला घशात घालू पहात आहे. त्याला रोखण्यासाठी आता जागतिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक ! |