मुंबई, २७ सप्टेंबर (वार्ता.) – जागतिक वारसास्थळांमध्ये ‘लष्करी भूप्रदेश’ असे नामांकन प्राप्त व्हावे, यासाठी भारत सरकारने महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ अशा १२ शिवकालीन गडांची माहिती ‘युनेस्को’कडे (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था) पाठवली आहे. येत्या आठवडाभरात युनेस्कोच्या पथकाकडून या गड-दुर्गांच्या पहाणीला प्रारंभ होणार असून जुलै २०२५ पर्यंत युनेस्कोकडून याविषयीचा अहवाल भारत सरकारला प्राप्त होईल, अशी माहिती पुरातत्व विभागाच्या एका अधिकार्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ला दिली.
याविषयी अधिक माहिती देतांना पुरातत्व विभागाचे अधिकारी म्हणाले, ‘‘या गड-दुर्गांची प्रत्यक्ष पहाणी करतांना ‘युनेस्को’च्या पथकासमवेत भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारीही असणार आहेत. आपण माहिती पाठवलेले गड-दुर्ग जागतिक वारसास्थळ म्हणून नामांकन प्राप्त होण्यासाठी अतिशय सक्षम आहेत; परंतु त्या ठिकाणी स्वच्छता आणि त्यांची दुरुस्ती यांचीच अडचण आहे. आपण माहिती पाठवलेले सर्वच गड-दुर्ग ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून निश्चितच पात्र ठरतील.’’
भारत सरकारकडून जानेवारी २०२२ मध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड, तर तमिळनाडूमधील जिंजी या गड आणि दुर्ग यांची माहिती युनेस्कोकडे पाठवण्यात आली होती. महाराष्ट्राच्या राज्य पुरातत्व विभागाकडून या गड-दुर्ग यांविषयीची माहिती युनेस्कोच्या पथकापुढे सादर केली जाणार आहे. त्यानंतर युनेस्कोच्या पथकाकडून या सर्व गडांची प्रत्यक्ष पहाणी केली जाणार आहे.