उत्तरप्रदेश सरकार शाळांमध्‍ये मुलींना नि:शुल्‍क ‘सॅनिटरी पॅड’ देणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे सरकार मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरण यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या अनुषंगाने योगी सरकारने आता जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील मुलींना त्‍यांची नियमित उपस्‍थिती सुनिश्‍चित करण्‍यासाठी ‘सॅनिटरी पॅड’ देण्‍याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशातील ५३५ शाळांमध्‍ये शिकणार्‍या एकूण ३६ सहस्र ७७२ विद्यार्थिनींसाठी १ कोटी १० लाख रुपयांची रक्‍कम संमत करण्‍यात आली आहे. ही रक्‍कम संबंधित शाळा व्‍यवस्‍थापन समिती खर्च करणार आहे.

१. २०२४-२५ शालेय वर्षामध्‍ये ५३५ शाळांमध्‍ये इयत्ता सहावी ते आठवीच्‍या वर्गांत   शिकणार्‍या मुलींना ‘पीएमश्री’ योजनेचा लाभ मिळेल. या शाळांमध्‍ये शिकणार्‍या बहुतांश मुली ग्रामीण भागांतील आहेत. सॅनिटरी पॅड आणि त्‍यांच्‍या वापराविषयी त्‍यांना अल्‍प माहिती आहे. योगी सरकारचे हे पाऊल मुलींची नियमित उपस्‍थिती सुनिश्‍चित करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी ठोस पाऊल मानले जात आहे.

२. शिक्षणमंत्री (स्‍वतंत्र प्रभार) संदीप सिंह यांच्‍या सूचनेनुसार सॅनिटरी पॅड खरेदीमध्‍ये संपूर्ण पारदर्शकता सुनिश्‍चित करण्‍यात आली आहे. या संदर्भात साहाय्‍यक वित्त आणि लेखाधिकारी आणि जिल्‍हा समन्‍वयक कन्‍या शिक्षण यांना आवश्‍यक सूचना देण्‍यात आल्‍या आहेत.

३. सॅनिटरी पॅड खरेदी आणि वितरण यांसाठी शालेय स्‍तरावर एक समिती स्‍थापन केली जाईल, ज्‍यामध्‍ये शाळा व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष, मुख्‍याध्‍यापक, एक महिला शिक्षिका, पर्यवेक्षक आणि एक अंगणवाडी सेविका सदस्‍य म्‍हणून असतील.