China Troops East Ladakh :  पूर्व लडाखमधून सैन्‍य मागे घेण्‍यास चीनने दर्शवली सिद्धता !

बीजिंग – गेल्‍या ४-५ वर्षांपासून पूर्व लडाखमधील सीमेवर भारत आणि चीन यांच्‍यामध्‍ये तणावाचे वातावरण आहे; मात्र दोन्‍ही देशांमधील हा तणाव अल्‍प करण्‍यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत. आता पूर्व लडाखमधील नियंत्रणरेषेवरील तणाव संपवण्‍यासाठी आणि संघर्ष अल्‍प करण्‍याच्‍या दृष्‍टीने लडाखमधून सैन्‍य मागे घेण्‍याच्‍या संदर्भात चीनने सहमती दर्शवल्‍याची माहिती समोर आली आहे.

१. चीनच्‍या संरक्षण मंत्रालयाकडून स्‍पष्‍ट  करण्‍यात आले आहे की, चर्चेच्‍या माध्‍यमातून चीन आणि भारत यांच्‍यामधील मतभेद अल्‍प करण्‍यास आणि दोन्‍ही देशांना स्‍वीकारार्ह तोडगा काढण्‍यासाठी प्रयत्न चालू आहेत.

सौजन्य:The Indian Express

२. चीनच्‍या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्‍ते झांग झियाओगांग यांनी चीनमधील भारताचे राजदूत प्रदीपकुमार रावत यांची भेट घेतली. या वेळी झियाओगांग यांनी सांगितले की, भारत आणि चीन पूर्व लडाखमधील नियंत्रणरेषेवरील तणाव अल्‍प करण्‍यासाठी सक्षम आहेत. तसेच दोन्‍ही बाजूंनी शक्‍य तितक्‍या लवकर तोडगा काढण्‍याचेही प्रयत्न असल्‍याचे झियाओगांग यांनी स्‍पष्‍ट केले.

३. ‘पूर्व लडाखमधील संघर्ष संपवण्‍यासाठी दोन्‍ही देशांमध्‍ये डेमचोक आणि डेपसांग येथून  सैन्‍य मागे घेण्‍याविषयी चर्चा चालू आहे’, असे झांग झियाओगांग यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

चीनने आतापर्यंत दिलेले कुठलेही आश्‍वासन पाळलेले नाही, हा इतिहास आहे. त्‍यामुळे कावेबाज चीनच्‍या कोणत्‍याही म्‍हणण्‍यावर भारताने विश्‍वास न ठेवता अखंड सतर्क रहाणे आवश्‍यक !