आझाद भवन, पर्वरी (गोवा) येथे होली संघटनेच्या वतीने श्रीमद् भागवत कथा कार्यकमाचे भव्य आयोजन

पणजी (गोवा), २७ सप्टेंबर (वार्ता.) – हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड पीपल (HOLI) म्हणजेच ‘होली’ या संघटनेकडून आझाद भवन, पर्वरी येथे ७ दिवसांच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम ३ ते ९ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. हे संगीतमय कथावाचन हिंदी भाषेतून असणार आहे. यासंबंधी माहिती देण्यासाठी ‘होली’ संघटनेकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष श्री. के.के. चतुर्वेदी, मार्गदर्शक डॉ. गोविंद काळे, कार्यक्रमाचे समन्वयक श्री. लालजी पागी, सहसचिव श्री. बी.एम्. यादव आणि महासचिव श्री. सूरज नाईक हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत पदाधिकार्‍यांकडून संघटनेच्या कार्याची माहिती देण्यात आली.

वर्ष २०१६ मध्ये ‘होली’या संघटनेची स्थापना झाली असून गोव्यातील स्थानिक लोक, तसेच उत्तर आणि दक्षिण भारतीय या संघटनेत कार्यरत आहेत. देशप्रेम वाढवण्याविषयी या संघटनेचे कार्य चालू आहे. राष्ट्रभक्तीविषयक हिंदी कवीसंमेलन, आरोग्य शिबिरे, कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना साहाय्य करणे, प्रधानमंत्री साहाय्य निधी अर्पण करणे, नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देणारी मिरवणूक, वृक्षारोपण कार्यक्रम, श्रीरामावरील सुंदर कांडवर सांकेतिक कार्यक्रमाचे आयोजन, श्रीमद्भगवद्गीता आणि रामचरित मानस ग्रंथाचे वितरण; योग शिबिर, साहित्यिक, सांस्कृतिक अन् सामाजिक कार्यात विशेष योगदान, सेवाभावी वृत्तीच्या विविध उपक्रमांचे आयोजन, तसेच तानाजी वॉरियर, कश्मीर फाईल्स इत्यादी चित्रपटांचे विनामूल्य प्रदर्शन यांसारखे अनेक उपक्रम संघटनेकडून घेण्यात येत आहेत.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष के.के. चतुर्वेदी म्हणाले, ‘‘आम्ही विविध प्रकारे प्रत्येक वर्षी हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. युवकांमध्ये राष्ट्रवाद, राष्ट्राप्रती प्रेम जागृत करण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत.’’

महासचिव सूरज नाईक म्हणाले, ‘‘लोकांमध्ये जागृती करण्यासाठी पहिल्यांदाच असे प्रयत्न करत आहोत. आझाद भवनच्या सभागृहाची ५०० जणांची क्षमता आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे.’’ आचार्य श्री विपिन कृष्ण महाराजजी हे या ठिकाणी प्रतिदिन कथावाचन करणार आहेत. ते खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर आहेत. ज्या भक्तगणांना त्यांची ज्योतिष कुंडली दाखवायची इच्छा असेल, ते त्यांना सकाळच्या वेळेत भेटू शकतात.

कार्यक्रम

हा कार्यक्रम नवरात्रीच्या काळात, म्हणजे ३ आक्टोबर ते ९ आक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. या वेळी प्रतिदिन सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत श्रीमद्भागवत या ग्रंथावर निरूपण होणार आहे. ३ ऑक्टोबरला श्री भागवत माहात्म्य शुकदेव जन्म आणि परिक्षित जन्म; ४ ऑक्टोबला कपिल देवहूति संवाद आणि ध्रुव चरित्र; ५ ऑक्टोबरला अजामिल प्रसंग आणि प्रल्हाद चरित्र; ६ ऑक्टोबरला वामन अवतार, श्रीरामजन्म, श्रीकृष्णजन्म; ७ ऑक्टोबरला बाललीला आणि गोवर्धन पूजा; ८ ऑक्टोबरला श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह आणि ९ ऑक्टोबर या दिवशी सुदामा चरित्र आणि परिक्षित मोक्ष या विषयांवर निरूपण करण्यात येणार आहे. प्रतिदिन कथा झाल्यावर महाप्रसाद असणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबरला हवन आणि प्रसाद वितरण कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रारंभी ३ ऑक्टोबर या दिवशी कलश यात्रा निघणार असून त्याची सांगता आझाद भवन येथे होणार आहे. अधिकाधिक भाविक महिलांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. याखेरीज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मध्यप्रदेशमधील कला संगम, गुंडवाना आर्टमधील विद्यार्थी लाईव्ह पेंटिंग (कथा चालू असतांना चित्र रंगवणे) करणार आहेत.