श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटकमधील ‘वादिराज स्वामी मठ’ आणि ‘श्री मारिकांबादेवी’ यांच्या घेतलेल्या दर्शनाचा वृत्तांत !

‘सप्तर्षी जीवनाडीवाचन क्रमांक १६५ मध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘नंदीहिल्स’ येथील नंदीच्या तपस्थानाचे दर्शन घेऊन दुसर्‍या दिवशी सकाळी, म्हणजे २४.१.२०२१ या दिवशी कर्नाटकातील सोंदा येथील ‘वादिराज मठ’ येथे दर्शन घेण्यासाठी निघालो. सोंदा हे गाव बेंगळुरूपासून ८ घंट्यांच्या अंतरावर आहे. ‘येथील वादिराजांच्या जीवसमाधी स्थानाचे दर्शन घेणे आमच्यासाठी पुष्कळ महत्त्वाचे आहे’, असे महर्षींनी आम्हाला सांगितले होते.

(भाग १)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. चारचाकी वाहनावर वाईट शक्तींनी केलेले आक्रमण !

१ अ. घारीच्या माध्यमातून वाईट शक्तीने गाडीवर आक्रमण करणे आणि त्यावर उपाय म्हणून ‘इंद्राक्षी’ स्तोत्र लावून नंतर पुढचा प्रवास करणे : आम्ही चारचाकीतून प्रवास करत असतांना आकाशातील एका घारीने अकस्मात् चालक-साधकाच्या समोर लावलेल्या काचेवर झेप घेतली. आमची चारचाकी या घारीला धडकल्याने ती घार मार्गाच्या दुसर्‍या बाजूला जाऊन पडली. घारीच्या माध्यमातून वाईट शक्तीने आमच्या गाडीवर आक्रमण केल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही आमची चारचाकी ५ मिनिटे थांबवली आणि प्रार्थना करून गाडीत ‘इंद्राक्षी स्तोत्र’ लावले. नंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

१ आ. अल्प वेळात नकारात्मक स्पंदने पसरवू शकत असल्यामुळे मोठ्या वाईट शक्ती पक्ष्यांच्या माध्यमातून आक्रमण करत असल्याचे महर्षींनी सांगणे : महर्षि बर्‍याचदा सांगतात, ‘मोठ्या वाईट शक्ती पक्ष्यांच्या माध्यमातून काळी शक्ती पसरवण्याचा प्रयत्न करतात. पक्षी आकाशातून उडत असल्याने त्यांच्या माध्यमातून अल्प वेळात सर्वत्र आकाशतत्त्वाच्या स्तरावर नकारात्मक स्पंदनांनी आक्रमण करणे सोपे जाते.’ आता बर्‍याचदा अशा पक्ष्यांच्या माध्यमातून आकाशातून आक्रमणे होतात. पूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमावर करणीचे प्रयोग करण्यात आले. तेव्हा कबुतरांना धागा बांधून त्यांच्या माना मुरगळून त्यांना आश्रमाच्या छपरावर किंवा परिसरातील झाडावर मारून टाकलेले आढळले होते.

२. वादिराज स्वामी मठ !

२ अ. श्रीविष्णूच्या ‘हयग्रीव’(अश्व) अवताराचे अंश असलेले स्वामी वादिराज ! : पूर्वीच्या काळी वादिराज स्वामींनी धर्मप्रसाराचे कार्य केले. ‘ते साधारण १४ व्या शतकात होऊन गेले’, असे सांगण्यात येते. ते सर्वत्र द्वैत सिद्धांताचा प्रसार करायचे. ते श्रीविष्णूच्या ‘हयग्रीव’ या अवताराचे अंश होते. ‘हयग्रीव’ अवताराच्या कृपाप्रसादानेच वादिराज स्वामींचा जन्म झाला होता. सोंदा (कर्नाटक) या गावी त्यांनी पुष्कळ साधना करून अनेकांना सन्मार्गाला लावले. धर्मस्थळ येथील शिवस्थान आणि उडुपी येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण देवस्थान यांच्या परंपराही त्यांनीच विधीवत् चालू करून दिल्या आहेत.

श्रीविष्णु हयग्रिवाच्या, म्हणजे पांढर्‍या घोड्याच्या रूपात येऊन स्वामींच्या खांद्यांवर आपले गुडघे टेकवून प्रसाद ग्रहण करताना

२ आ. श्रीविष्णु हयग्रीव रूपात येऊन वादिराज यांनी बनवलेला प्रसाद ग्रहण करत असणे : ध्यानाला बसण्यापूर्वी वादिराज स्वामी श्रीविष्णूच्या हयग्रीव अवतारासाठी गूळ, डाळ, तूप आणि बदाम घालून प्रसाद बनवायचे. स्वामी तो प्रसाद एका भांड्यात घेऊन ते भांडे आपल्या डोक्यावर ठेवायचे आणि ध्यान करायचे. त्या वेळी प्रत्यक्ष श्रीविष्णु हयग्रिवाच्या, म्हणजे पांढर्‍या घोड्याच्या रूपात येऊन स्वामींच्या खांद्यांवर आपले गुडघे टेकवून प्रसाद खायचा. मठात असे चित्रही लावलेले आपल्याला पहायला मिळते.

२ इ. वादिराज स्वामींना साहाय्य करणार्‍या ‘भूतराज’ या सूक्ष्म शक्तीचे स्थान : वादिराज मठाच्या परिसराचे दृश्य अत्यंत चैतन्यमय आहे. वादिराज स्वामींना त्यांच्या कार्यात ‘भूतराज’ नावाची सूक्ष्मातील एक शक्ती साहाय्य करायची. येथे भूतराजांचेही स्थान आहे.

२ ई. वादिराज स्वामींनी साक्षात् गंगेला आवाहन करून या स्थळी पाचारण केले होते. या स्थानाला ‘धवलगंगा’, असे नाव आहे.

२ उ. वैकुंठगमनापूर्वी वादिराज स्वामींनी त्यांचे ५ प्राण ५ वृंदावनांत ठेवणे : महर्षींनी आम्हाला सांगितले होते, ‘तुम्ही वादिराज स्वामींच्या या स्थानी प्रार्थना करा; कारण त्यांचे पंचप्राण अजूनही या भूतलावर आहेत.’ त्या ठिकाणी ५ वृंदावने आहेत. याविषयी सांगितले जाते, ‘वादिराज स्वामी १२० वर्षे जगले. त्यांनी त्यांचे ५ प्राण एकेका वृंदावनात ठेवले आणि मगच त्यांनी विमानातून वैकुंठाकडे गमन केले. संत तुकाराम महाराज यांच्याप्रमाणेच त्यांनाही न्यायला श्रीविष्णूचे वैकुंठविमान आले होते.’

३. अनुभूती

३ अ. ‘वादिराज स्वामींनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन धर्मकार्याला आशीर्वाद दिला’, असे जाणवणे : आम्ही येथील ५ वृंदावनांचे दर्शन घेतले. त्या वेळी ‘एक पांढरा घोडा माझ्या डोक्यावर उच्छ्वास साेडून आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले. त्याच वेळी माझ्या समवेत असलेले सहसाधक श्री. स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३७ वर्षे) यांना घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकू आला. प्रत्यक्षात या स्थानी घोडा नाही. यावरून ‘हयग्रीव अवतार श्री वादिराज स्वामींनी आम्हाला त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची जाणीव करून देऊन धर्मकार्याला आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.

४. त्रिविक्रम मंदिराचा इतिहास !

४ अ. व्यासांच्या आज्ञेने वादिराज स्वामी यांनी बद्रीनाथ येथे त्रिविक्रम मंदिराचा दगडी रथ आणि मूर्ती सिद्ध करणे अन् ‘भूतराजां’ना रथ सोंदा येथे आणण्याची आज्ञा करणे : येथेच वादिराज स्वामींनी स्थापन केलेले श्री त्रिविक्रम मंदिरही आहे. या मंदिराविषयी एक कथा सांगितली जाते, ‘वादिराज स्वामी बद्रीनाथ येथे गेले होते. तेथे त्यांची श्री व्यासांशी भेट झाली. त्यांनी व्यासांना सांगितले, ‘माझ्या मनात सोंदा येथे त्रिविक्रमाचे मंदिर बांधण्याची इच्छा आहे.’ व्यासांच्या आज्ञेने त्यांनी बद्रीनाथ येथेच या मंदिराचा दगडी रथ आणि मूर्ती सिद्ध केली. त्यांनी ‘भूतराज’ या सूक्ष्मातील दैवी शक्तीला तो रथ सोंदा येथे आणण्याची आज्ञा केली.

४ आ. त्रिविक्रम मंदिराच्या दगडी रथाला तीनच चाके असण्यामागील कारण : रथ सोंदा येथे आणत असतांना वाटेत काही वाईट शक्तींनी रथावर आक्रमण केले. त्या वेळी भूतराजांनी या दगडी रथाचे एक चाक काढले आणि त्याच्या साहाय्याने वाईट शक्तींशी सामना करून त्यांचे आक्रमण परतवून लावले; म्हणून या मंदिराच्या दगडी रथाला ४ चाकांच्या ऐवजी तीनच चाके आहेत.

४ इ. भूतराजांनी बद्रीनाथहून आकाशमार्गे आणलेले दैवी मंदिर ! : हे मंदिर भूतराजांनी बद्रीनाथहून आकाशमार्गाने सोंदा येथे आणले आहे. हा एक मोठा चमत्कार आहे ! मंदिराभोवती अनेक शिल्पे आहेत. यांत कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण, गरुड, हनुमंत, कार्तिकेय, खांबावर कोरलेला हयग्रीव, अशी अनेक प्रकारची शिल्पे आहेत. मंदिर पुष्कळ सुंदर आणि दैवी आहे.

५. मठाच्या परिसरात असलेला पिंपळवृक्ष !

येथील स्थानिक लोक सांगतात, ‘वादिराज स्वामींनी एके ठिकाणी राजपक्षाला वादविवादात हरवले होते आणि पुष्कळ सोने जिंकून आणले होते. एका संन्याशाला सोने काय कामाचे ? म्हणून त्यांनी ते या मठाच्या परिसरात टाकून दिले. त्यावर आता एक पिंपळवृक्ष उभा आहे. प्रत्यक्ष नागदेवताच या धनाचे रक्षण करतात.’ या ठिकाणी पिंपळवृक्षाच्या मुळाशी नागदेवतांच्या अनेक मूर्ती ठेवल्या आहेत.

६. प्रार्थना

महर्षींच्या कृपेमुळे आम्हाला भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांविषयीची माहिती प्राप्त होत आहे आणि या स्थानांचेही दर्शन मिळत आहे. त्या वेळी ‘भारतात किती प्रकारचा अमूल्य असा आध्यात्मिक ठेवा आहे !’, हे आम्हाला कळते. या चैतन्याच्या बळावरच भारत अजूनही शत्रूंची एवढी आक्रमणे होऊनही उभा आहे. या चैतन्याला पुन्हा जागृत करून आता आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची आहे. त्यासाठी ‘श्रीविष्णूचे हयग्रीव अवतार असलेले वादिराज स्वामी यांनी आम्हाला आशीर्वाद आणि बळ द्यावे, तसेच भूतराज या दैवी सूक्ष्म शक्तीने जसे श्री वादिराज स्वामींना त्यांच्या दैवी कार्यात साहाय्य केले, तसेच आम्हालाही करावे’, अशी श्रीमन्नारायणाच्या चरणी आम्हा साधक, संत अन् सद्गुरु यांची कळकळीची प्रार्थना आहे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, होस्पेट, कर्नाटक. (२८.१.२०२१, सकाळी १०.४९) (क्रमशः)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/798707.html