आयुष्याचा नाश होत असतांना ‘राम’ कां रे म्हणाना !

‘मानवी जीवन हे फार क्लिष्ट आहे. त्याची गुंतागुंत, त्या जीवनाचे प्रयोजन, ध्येय इत्यादी अनेक प्रश्न माणसाला पडतात. आपापल्या परीने त्याचा विचार करून मनुष्य जीवनाचे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे पूर्वजन्मीचे संस्कार आणि त्यामुळे मिळालेले ज्ञान याचा त्याला उपयोग होतो. जितके उच्च संस्कार, तितके उच्च प्रतीचे ज्ञान त्याला असते. प्रत्येक व्यक्ती जन्माला येते आणि एक दिवस ती इहलोक यात्रा संपवते. जगाचा हा नियमच आहे की, जे जे जगात उत्पन्न होते, ते एक दिवस नाश पावते. मनुष्य प्राण्यालाही हा नियम लागू आहे. भेद इतकाच की, आयुष्य कसे जगायचे ? हे बर्‍याच अंशी मनुष्याच्या अधीन आहे. त्याला खुंट्याला दोरी बांधलेल्या जनावराप्रमाणे जितकी लांब दोरी असेल, तितक्या क्षेत्रात मोकळेपणाने वागण्याचे स्वातंत्र्य आहे.

१. ‘कर्म’ भूलोकीच केले जात असल्याने तिला ‘कर्मभूमी’ म्हणणे

भूलोक ही कर्मभूमी आहे. याच ठिकाणी चांगले-वाईट कर्म करता येते आणि त्याचे फळ आपल्या झोळीत बांधता येते. स्वतः देवही याच कारणाने भूलोकावर अवतार घेतात, सत्कर्म आणि तपस्या करतात अन् सर्व समाजाला उद्बोधन करून साधना अन् चांगले कर्म करण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्या सहवासाने समाजाचे कल्याण होते. ‘देव लोकांनी केलली तपस्या दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यास कामी येते. लक्षात ठेवा, ‘कर्म’ भूलोकीच केले जाते. त्यामुळेच हिला ‘कर्मभूमी’ म्हटले आहे.

श्री. श्रीनिवास गोटे

२. मनुष्य जन्माचे ध्येय

मनुष्य आपल्या जीवनात कळत न कळत चांगले-वाईट कर्म करतो. त्यातील काही भाग भूलोकात आणि काही परलोकात भोगतो. कर्म भोगल्यानंतर उरलेले कर्म संचितात टाकून त्यातील काही भाग (प्रारब्ध) देवाच्या कृपेने सोबत घेऊन पुन्हा जन्माला येतो. थोडक्यात उदाहरण म्हणजे माझ्या अधिकोषात (बँकेत) पैसे आहेत आणि मला प्रवासाला जायचे आहे. अधिकोषातील काही पैसे मी प्रवासासाठी काढतो. प्रवास करता करता काही उद्योग करून पैसे मिळवतो (क्रियमाण) आणि ते पैसे परत अधिकोषात भरतो. आपले संचित संपेपर्यंत जन्म-मरण हा खेळ चालणारच ! बहुतेक आपले संचित कर्म वाढतच असते. ते पूर्ण भोगून शून्य करण्याचा प्रयत्न आपण करतो का ? आपल्याला त्याची जाणीव आहे का ? आपण गर्भात आल्यापासून ते चितेवर चढेपर्यंत काय काय करतो, ते सर्व संतांनी निरनिराळ्या प्रकारांनी आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. काय करावे ? आणि काय करू नये ? हा विवेक शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या जीवनाच्या वाटेत ठिकठिकाणी हे विचार अमृताच्या घड्याप्रमाणे  ठेवले आहेत. आम्ही पाणपोईवर आल्याप्रमाणे ते विचार प्राशन केले, तर आपले जीवन सार्थक होईल. उलट आंधळ्याप्रमाणे त्या घड्याला लाथाडून मार्गक्रमण केल्याने स्वतःचे अकल्याणच होईल. आपल्याला हा सर्व विचार जीवनात करून स्वतःचे हित साधायचे आहे. असे विचार मनात येण्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचे सत्कर्म कामास येते. स्वतःचे ध्येय काय ? हे कळले पाहिजे. पुनःपुन्हा जन्म-मरण हाच खेळ खेळायचा आहे का ? कि त्याला कुठेतरी संपवायचे आहे ?

३. सद्यःस्थिती आणि समर्थ रामदासस्वामी यांनी संसारात ‘रामनाम’ घेण्याविषयी केलेला उपदेश

आज कलियुगात रहाणी अशी काही झाली आहे की, साधा विचारसुद्धा करण्यासाठी वेळ नाही. समोर दिसेल ते करून मोकळे होणे हाच विचार. आज आपल्या पुढे ध्येय काय ? पुष्कळ वेतनाची नोकरी, मोठी सदनिका, विदेशात शिकत असलेली मुले, सगेसंबंधात होणारी वाहवा ! या सर्व गोष्टी अनुकूल असतांना यातून कधीतरी बाहेर निघावे, असे वाटते का ? याचे उत्तर बहुतेक ‘नाही’ असेच आहे; परंतु पुष्कळ जणांना अशी वेळ येते की, हे सर्व व्यर्थ (वैराग्य) आहे. आपण दुसरे काही तरी करायला हवे. पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे असा विचार मनात येतो आणि आपण त्याचे उत्तर शोधू लागतो. त्यामुळेच समर्थ रामदासस्वामी यांनी उपदेश करतांना म्हटले आहे, ‘घटका गेली पळें गेलीं तास वाजे झणाणा । आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना ।।’ म्हणजे ‘वेळ हातातून निघून चालला आहे, नामस्मरण करून आयुष्याचे सार्थक करून घ्या.’ त्यांनीच म्हटले आहे, ‘तू तुझा व्यवहार आणि संसार करत रहा. परमार्थाला गृहस्थाश्रमाचे बळ लागतेच. हे सारे करत असतांना तू माझ्या रामाला विसरू नकोस. त्याची आठवण अंतःकरणात सदैव ठेव. प्रयत्न कर, हळूहळू जमेल. तुझा निश्चय पाहून रामच तुला साहाय्य करील. तो दयाळू आहे !’

४. आता आयुष्याचा नाश होत असतांना फुशारक्या मारण्यापेक्षा ‘राम’नाम घेणे महत्त्वाचे !

खरे तर सर्व अनुकूल असेल, तर देवाची, मोक्षाची आणि सत्कार्य करण्याची साठवण रहात नाही. एवढ्यासाठीच कुंतीने भगवान कृष्णाला ‘आयुष्यात संकटे येऊ दे’, हे मागणे मागितले. जेव्हा आपल्या आयुष्यात संकटे येतात, तेव्हा देव, मंदिर, ज्योतिषी आठवतात. विपरित परिस्थिती कायम रहात नाही. पुन्हा दिवस पालटले की, ‘मी असे केले म्हणून मी अडचणीतून बाहेर पडलो’, अशी फुशारकी मारतो. देवाला सोयीस्करपणे विसरतो. आपण देवाचे अस्तित्व सहजपणे मान्य करत नाही.

आपले सर्वांचे विचार यापेक्षा वेगळे नाहीत (यातून मी साधक वर्गाला वगळतो). इतकी वर्षे कशासाठी धडपड केली ? आणि त्यातून काय मिळाले ? मी माझ्या आयुष्याच्या शेवटाला आलो आहे; पण आयुष्यभर नामस्मरण करायला (जे इतके सोपे आहे) त्यासाठी कधीच वेळ मिळाला नाही. आयुष्य जगण्याच्या निरर्थक धडपडीत मी देवाला पूर्ण विसरलो. प्रत्येक घंट्याला वाजणारा ठोका मला कधीच ऐकू आला नाही; पण आता आयुष्याचा नाश होत असतांना ‘राम’ कां रे म्हणाना !

आता डोळे उघडले; पण आता त्यात शंका कुशंका न काढता जेव्हा जसे शक्य होईल, तसे हरिनाम घ्यावे. चिंतनाने आयुष्याला अर्थ येतो. मानसिक आणि शारीरिक शक्ती टिकते, निराशा येणे न्यून होते. एक दिवस आपण नक्की यशस्वी होऊ. त्यामुळे ‘राम’ कां रे म्हणाना !’

– श्री. श्रीनिवास के. गोटे, प्रकाशक, त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, नागपूर. (२.३.२०२४)