|
ढाका (बांगलादेश) – बांगलादेश आणि म्यानमार यांची फाळणी करून तेथे पूर्व तिमोरसारखा ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा दावा बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केला. ‘आम्ही असे कधीच होऊ देणार नाही’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘या षड्यंत्रामागे कोण आहेत ?’, हे त्यांनी उघड केले नाही. पंतप्रधान हसीना यांनी येथील गोनो भवनामध्ये १४ पक्षांच्या बैठकीत बोलतांना ही माहिती दिली.
पंतप्रधान शेख हसीना यांनी असाही दावा केला आहे की, ७ जानेवारी या दिवशी झालेल्या देशातील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एक गोरा परदेशी माणूस त्यांच्याकडे प्रस्ताव घेऊन आला होता. त्याने ‘जर हसीना यांनी त्यांच्या देशाच्या सीमेत वायूदलाचा तळ उभारण्याची अनुमती दिली, तर त्यांना कोणत्याही अडचणींविना निवडणुका घेऊ दिल्या जातील’, असे सांगितले होते; मात्र असे कोणत्या देशाने सांगितले होते, हे पंतप्रधान शेख हसीना यांनी उघड केले नाही.
Conspiracy being hatched to divide #Bangladesh and #Myanmar – Bangladesh Prime Minister Sheikh Hasina
Plot to establish a “Christian state like East Timor”#WorldNews #GeoPolitics pic.twitter.com/sdjUbgP0vj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 28, 2024
पंतप्रधान हसीना पुढे म्हणाल्या की, त्यांना देशांतर्गत आणि बाह्य दोन्ही कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या विरोधात कट रचला जात आहे. बंगालच्या उपसागरातून आणि हिंदी महासागरातून शतकानुशतके व्यापार होत आहे; परंतु आता या भागांकडे अनेकांचे लक्ष आहे. या भागांत कोणताही वाद किंवा संघर्ष नाही. आम्ही या क्षेत्रात कधीही वाद होऊ देणार नाही. बांगलादेशसमोर आणखी समस्या वाढणार आहेत; पण घाबरण्याची आवश्यकता नाही.
पूर्व तिमोर देशाविषयी माहिती !
पूर्व तिमोर देशाला ‘तिमोर-लेस्ते’ असेही म्हणतात. हा ख्रिस्ती बहुसंख्य असणारा देश आहे. पूर्व तिमोर येथे १६ व्या शतकापासून पोर्तुगालची वसाहत होती आणि अनेक शतके हा देश पोर्तुगिजांच्या अधिपत्याखाली होता. वर्ष १९७५ मध्ये पूर्व तिमोरला स्वातंत्र्य मिळाले. तथापि काही दिवसांनंतर इंडोनेशियाने त्याला कह्यात घेतले आणि त्याचे २७ वे राज्य घोषित केले. त्यानंतर येथे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न झाले. अखेर वर्ष १९९९ मध्ये इंडोनेशियाने पूर्व तिमोरमध्ये सार्वमत घेण्याचे मान्य केले. यानंतर २००२ मध्ये पूर्व तिमोर स्वतंत्र देश बनला.