वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव सहावा दिवस (२९ जून) :  हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध संघटना आणि युवक यांनी केलेला संघर्ष

‘भगवान शिवाचे मूलधाम ज्ञानवापी मशीद आहे’, असे पुढील पिढीला आपण सांगणार आहोत का ? – सोहन लाल आर्य, लेखक, वाराणसी, उत्तरप्रदेश

श्री.सोहन लाल आर्य

मी ४० वर्षांपासून ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीसाठी न्यायालयीन लढा देत आहे. पाकिस्तानमधून माझे ‘सर कलम’ (शिरच्छेद) करण्याचा फतवा २ वेळा आला, तरीही माझा संघर्ष चालू आहे. काशी विश्वेश्वर येथे भगवान शिवाविना नंदीच्या डोळ्यातील अश्रू आम्ही अनुभवत आहोत. आपल्या समस्या आपण नंदीच्या कानात सांगतो; परंतु नंदीला भगवान शिवाचे दर्शन आपण करून देणार आहोत कि नाही ? वर्ष १६७२ मध्ये औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच नव्हे, तर भारतातील सहस्रावधी मंदिरे तोडली. अनेक संस्कृत विद्यापीठे तोडली. हिंदूंनी प्रत्येक ठिकाणी संघर्ष केला. ‘प्रभु श्रीराम यांचा जन्म बाबरी मशिदीमध्ये झाला’, असे आपण सांगणार होतो का ? म्हणून बाबरीचा ढाचा तोडला. येणार्‍या पिढीला ‘भगवान शिवाचे मूलधाम ‘ज्ञानवापी मशीद’ आहे’, असे आपण सांगणार आहोत का ? त्यामुळे संकल्प करून ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीसाठी संघटित व्हा.


तमिळनाडूमध्ये इस्लामी आक्रमकांनी तोडलेली मंदिरे अजूनही उपेक्षित ! – पाळा संतोष कुमार, संस्थापक अध्यक्ष, ‘हिंदू येलूच्ची पेरवाई’, तंजावूर, तमिळनाडू

श्री.पाळा संतोष कुमार

विद्याधिराज सभागृह – तमिळनाडूमध्ये १३ व्या शतकापासून विविध धर्मांध आक्रमकांनी आक्रमण केले. त्यांनी तेथील भव्य मंदिरे तोडली, तसेच अनेक ठिकाणी मशिदी बांधल्या. अगणित सोने, चांदी, हिरे, मोती लुटून नेले आणि तलवारीच्या जोरावर कित्येक हिंदूंचे धर्मांतर केले. त्यामुळे हिंदूंना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. इस्लामी आक्रमकांनी केलेल्या या आक्रमणाविषयी शाळा-महाविद्यालयात शिकवले जात नाही. त्यामुळे या क्रूर इतिहासाविषयी हिंदू अनभिज्ञ आहेत. गेल्या ८०० वर्षांपासून विद्ध्वंस केलेली मंदिरे उपेक्षित असून या मंदिरांमध्ये आजही पूजा-अर्चा चालू झालेली नाही. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन कार्य केले पाहिजे. या हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन ‘हिंदू येलूच्ची पेरवाई’चे संस्थापक अध्यक्ष श्री. पाळा संतोष कुमार यांनी केले.


धर्मांतर रोखण्याचा आदर्श धर्मवीर संभाजी राजे यांनी हिंदूंपुढे ठेवला आहे ! – सद्गुरु बाळ महाराज, इचलकरंजी, कोल्हापूर

सद्गुरु बाळ महाराज

विद्याधिराज सभागृह : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे हिंदु धर्म टिकून आहे, तर धर्मवीर संभाजी महाराज यांच्यामुळे हिंदूंचे अस्तित्व टिकून आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज नसते, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात इस्लामीकरणाचा प्रभाव निर्माण झाला असता.

भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की, धर्मसंस्थापनेसाठी मी पुन:पुन्हा अवतार घेतो. ज्याप्रमाणे रावणाचा वध श्रीरामाने, कंसाचा वध श्रीकृष्णाने वध केला, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला जेरिस आणले. धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्तांवर जरब बसवली. ‘हिंदूंचे धर्मांतर केले, तर पोर्तुगालचे हिंदूकरण करू’, अशी चेतावणी दिली. हिंदूंचे धर्मांतर कसे रोखायचे ? याचा धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदूंना आदर्श घालून दिला आहे. आपल्याला भारताला हिंदु राष्ट्र करायचे आहे, हा विचार आपल्या हृदयामध्ये दृढ करावा.


पाकिस्तानप्रमाणे मणीपूरलाही भारतापासून तोडण्याचे मिशनरींचे षड्यंत्र ! – प्रियानंद शर्मा, सदस्य, मणीपूर धर्मरक्षक समिती, मणिपूर

श्री. प्रियानंद शर्मा

विद्याधिराज सभागृह : मणीपूरची स्थिती सध्या ‘टाईमबाँब’प्रमाणे झाली आहे. या स्थितीचा कधीही स्फोट होऊ शकतो. मणीपूरमधील हिंसाचारामागे पाश्चात्त्य देशांचा हात आहे. म्यानमार आणि बांगलादेश यांचा काही भाग मिळून, तसेच मणीपूरला तोडून एक नवीन स्वतंत्र कुकी देश बनवण्याचे पाश्चात्त्य देश अन् त्यांच्याशी जोडलेल्या मिशनर्‍यांचे षड्यंत्र आहे. मणीपूरमध्ये वर्ष १९६१ जनगणनेनुसार अनुसूचित जमातींच्या सूचीत कुकी जमातीचे नावही नव्हते; मात्र आज ते स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत. बांगलादेशी, तसेच म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमान, कुकी जमात यांनी मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. आधारकार्ड आणि मतदानकार्ड त्यांना सहजपणे प्राप्त होते. सीमेवरील सुरक्षेच्या अभावामुळे पूर्वाेत्तर भारतामध्ये घुसखोरी वाढत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पूर्वाेत्तर भारतातही याचे लोण पसरण्यास वेळ लागणार नाही. मणीपूरमध्ये दिवसेंदिवस अहिंदूंची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे मणीपूरला वाचवण्यासाठी भारताने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मणीपूर येथील ‘मणीपूर धर्मरक्षक समिती’चे सदस्य श्री. प्रियानंद शर्मा केले.


संघर्षासाठी सिद्ध रहा ! – पवन द्विवेदी, जालौन, उत्तरप्रदेश

श्री. पवन द्विवेदी

विद्याधिराज सभागृह : राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी तुम्ही येथे जो संकल्प कराल, तो प्रथम देवाच्या चरणी अर्पण करा आणि तो पूर्ण करण्यासाठी देवाकडे शक्ती मागा; कारण येथून आपण ऊर्जा घेऊन जातो; परंतु आपल्या कार्यात व्यस्त झाल्यावर ती ऊर्जा क्षीण होते. ती ऊर्जा टिकून रहाण्यासाठी देवाला प्रार्थना करा. तुम्ही केलेला संकल्प तुमच्या घरात भिंतीवर लावून ठेवा, जेणेकरून त्याची तुम्हाला निरंतर आठवण राहील. संकल्प कुठलाही असू दे; कारण आज राष्ट्र-धर्म सर्वच बाजूंनी संकटात आहे. भारत आपले घर असूनही आपण असुरक्षित आहोत. ही भीती, असुरक्षितता का आहे ? याचे आत्मपरीक्षण करायला हवे. आपल्या देवतांच्या हातात शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहेत. जसे उपग्रहाला सतत संपर्क यंत्रणांशी जोडलेले रहावे लागते, संपर्क यंत्रणा तुटली, तर वैज्ञानिक त्या उपग्रहाकडे दुर्लक्ष करतात, तसेच या जिवात्म्याने सतत परमात्म्याच्या संपर्कयंत्रणेत रहायला हवे. ती तुटली, तर तो आपल्याकडे लक्ष देणार नाही. हिंदु जनजागृती समितीसारख्या संघटनांशी तुम्ही जोडलात, तर तुम्ही निडर व्हाल. अधिवक्ते हिंदुत्वाच्या कार्यात जोडले गेले, तर मोठे कार्य होईल. तुम्ही बचावात्मक भूमिकेत राहू नका, तर संघर्षासाठी सिद्ध रहा. आम्ही ८० टक्के मुसलमान असलेल्या भागात रहातो, सर्व संघर्षमय असूनही ईश्वर नेहमी समवेत असतो, असे प्रतिपादन जालौन, उत्तरप्रदेश येथील श्री. पवन द्विवेदी यांनी केले. ‘गोरक्षणाचे कार्य आणि धर्मांधांनी कह्यात घेतलेली भूमी घटनात्मक दृष्टी से पुन्हा प्राप्त करण्यासाठी केलेला संघर्ष’ या विषयावर वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात ते बोलत होते.

श्री. पवन द्विवेदी पुढे म्हणाले, ‘‘बुंदेलखंडमध्ये एका तलावावर आक्रमण करून उभारलेली धर्मांध कसायांची ४५० घरे आम्ही न्यायालयात खटला जिंकून शासनाला पाडायला लावली आणि धर्मांधांना १ कोटी २२ लाख रुपयांचा दंड बसला. त्यात गोमांस विक्री करणारेही होते. अधिवक्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या शक्तीने आपण असे परिवर्तन करू शकतो. ४०० गोमाता असलेल्या सरकारी गोशाळेची अत्यंत दुरवस्था झाली होती, गोमाता मरत होत्या. त्याविषयी आम्ही लढा दिला. त्यानंतर तेथील व्यवस्थापन सुधारून गोशाळेची स्थिती पालटली. माहिती अधिकार कार्यकर्ते ऑनलाईन माहिती मागवू शकतात. बलिया येथे वर्ष २०२३ मध्ये माहिती अधिकारातून माहिती मिळत नसल्याने गुन्हा नोंद केला. नंतर त्या जिल्ह्यात कुठलीही माहिती लगेच मिळू लागली.’’

हिंदु जनजागृती समितीविषयी गौरवोद्गार !

हिंदु जनजागृती समिती ही संस्था परमात्म्याने निर्माण केली आहे. तुम्ही (हिंदु जनजागृती समिती) ठिकठिकाणच्या लोकांमधील लपलेली प्रतिभा बाहेर काढून ती प्रसारित करत आहात. हे मोठे कार्य आहे. राष्ट्र-धर्माचे विचार हिंदूंमध्ये वाटून ते संपर्कयंत्रणा वाढवत आहेत.