सुनिता शुक्ला यांचा संक्षिप्त परिचय
सुनिता शुक्ला या हस्तरेषातज्ञ असून त्या मूळच्या देहली येथील आहेत. अनेक वर्षे त्या ‘यू.ए.ई.’ (संयुक्त अरब अमिरात) येथील एका शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या. गत ५ वर्षांपासून त्या ऋषिकेश (उत्तराखंड) येथे राहून साधना करत आहेत. त्यांनी विविध आध्यात्मिक संस्थांमधून साधनाविषयक अभ्यासक्रम (Spiritual Courses) पूर्ण केले आहेत. त्यांनी हस्तरेषेचा अभ्यास तरुणपणी केला होता. त्यांनी आतापर्यंत २ सहस्रांहून अधिक व्यक्तींच्या हस्तरेषा अभ्यासल्या आहेत. त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या डाव्या आणि उजव्या हातांवरील रेषांचे परीक्षण केले आहे, ते येथे दिले आहे.
सुनिता शुक्ला यांना आलेल्या त्रासदायक अनुभूती
अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या मार्गदर्शनानुसार हस्तरेषा पहाण्यापूर्वी (परीक्षणापूर्वी) मी ३ घंटे नामजपादी उपाय केले. नामजपादी उपायांच्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उजव्या खांद्याच्या ठिकाणी त्रास असल्याचे जाणवले.
आ. आश्रमाच्या उजव्या बाजूला (रामनाथी मंदिराकडील बाजू) असलेल्या शक्तीत जडपणा (दाब) जाणवला. तेथे काहीतरी वाईट घडलेले असल्याने एखादा आत्मा (लिंगदेह) तेथे असावा. त्यामुळे तेथे पुष्कळ जडपणा (दाब) जाणवत आहे.
इ. रामनाथी आश्रमात फिरतांना आश्रमातील लहान खोलीकडे जाणारा पहिल्या जिन्याच्या ठिकाणी पुष्कळ दाब जाणवला.’
– सुनिता शुक्ला, हस्तरेषातज्ञ, ऋषिकेश, उत्तराखंड.
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या डाव्या हातावरील रेषांचे परीक्षण
‘डाव्या हातावरील रेषा या व्यक्तीच्या मागील जन्माविषयी सांगतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या डाव्या हातावरील रेषांच्या परीक्षणाची (त्यांच्या मागील जन्माविषयीची) सूत्रे पुढे दिली आहेत.
१ अ. मागील जन्मात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे ज्ञान आणि धर्म यांच्या मार्गावर होते ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले अनेक जन्मांपासून साधना करत आहेत. त्यांच्या डाव्या हातावरील कृपाशीर्वादाच्या आणि अध्यात्माच्या रेषा गुरु अन् शनि यांच्या बोटांच्या दिशेने जात आहेत. गुरु आणि शनि हे ग्रह ज्ञान अन् धर्म यांच्याशी संबंधित आहेत. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे ज्ञान आणि धर्म यांच्या मार्गावर होते’, याचे हे दर्शक आहे.
१ आ. मागील जन्मात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी कठोर परिश्रम आणि साधना करून संतपद प्राप्त केले होते ! :गेल्या जन्मात ते संत होते. त्यांनी कठोर परिश्रम आणि साधना करून हे संतपद प्राप्त केले होते. ते अत्यंत ज्ञानी होते. त्यांची सूर्य रेषा बळकट आहे; पण त्यात अडथळे आहेत. त्यामुळे गेल्या जन्मात त्यांना जे साध्य करायचे होते, ते मूर्तरूपात येऊ शकले नाही.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये उत्तम संवाद-कौशल्य होते ! : त्यांच्या हातावरील बुधाचा उंचवटा आणि बुधाची रेषा प्रभावी असल्याने त्यांचे संवाद-कौशल्य (भावना दुसर्यापर्यंत पोचवण्याचे कौशल्य) उत्तम होते. त्यांनी त्यांच्या षड्चक्रांच्या शुद्धीसाठी परिश्रम घेतले होते.
१ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये ध्येय साध्य करण्याचा दृढनिश्चय होता ! : त्यांच्या हातावरील ‘मंगळाचा उंचवटा ठळक असणे’, हे त्यांची महत्त्वाकांक्षा, तीव्र इच्छाशक्ती आणि ध्येय साध्य करण्याचा दृढनिश्चय याचे दर्शक आहे. ‘त्यांनी ध्येय साध्य करण्याचे पूर्ण प्रयत्न केले; परंतु ते कल्पनेच्या स्तरावरच राहिल्यामुळे मूर्तरूपात येऊ शकले नाही’, असे त्यांचे ‘मणिबंध’(मनगटावरील रेषांना ‘मणिबंध’ असे म्हणतात.) दर्शवत आहे.
१ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना मिळालेले ज्ञान आणि धन यांचा सुयोग्य पद्धतीने उपयोग करण्याची त्यांची इच्छा होती; परंतु अकस्मात् देह ठेवल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही ! : अंगठा हा व्यक्तीची इच्छाशक्ती दर्शवतो. या जन्माच्या तुलनेत गेल्या जन्मी त्यांची इच्छाशक्ती तेवढी बलवान नव्हती. त्यांचे विचार नेहमीच सुस्पष्ट होते. त्यांनी जे ज्ञान मिळवले किंवा त्यांना जे काही शिकायला मिळाले, ते सर्व त्यांना मानवजातीला शिकवायची इच्छा होती. गेल्या जन्मात त्यांच्याकडे पुष्कळ धन होते; मात्र ते त्यांनी स्वतःकडे ठेवले होते. धनाच्या बाबतीत ते सात्त्विकपेक्षा राजसिक होते. त्यांना मिळालेले ज्ञान आणि धन यांचा सुयोग्य पद्धतीने उपयोग करण्याची त्यांची इच्छा होती; परंतु अकस्मात् देह ठेवल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.
१ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी मागील जन्मी पुष्कळ लोकसंग्रह केलेला असून लोकांचा त्यांच्या कार्याला पाठिंबा होता ! : त्यांचा शुक्राचा उंचवटाही बलवान आहे. लोकांचे रहाणीमान सुधारून त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी त्यांना कार्य करायचे होते. मागील जन्मी त्यांनी पुष्कळ लोकसंग्रह केलेला असून लोकांचा त्यांच्या कार्याला पाठिंबा होता. स्वतःकडील अमाप धनाचा उपयोग मानवजातीसाठी करता आला नाही, ही तीव्र खंत त्यांच्या अंतर्मनात होती.
१ ए. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेतला आहे ! : त्यांच्या हातावरील ‘आयुष्य रेषा’ ही गेल्या जन्मात त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षाच्या जवळपास अपघाती निधन किंवा आकस्मिक मृत्यू झाल्याचे दर्शवते. त्यामुळे त्यांना जे करायचे होते, ते करू शकले नाहीत. भगवान शिवाप्रमाणे त्यांना मानवजातीसाठी त्याग करायचा होता. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि मिळालेले धन यांचा योग्यप्रकारे उपयोग करून मानवजातीला शिकवण्याची त्यांची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुन्हा जन्म घेतला आहे.
१ ऐ. मागील जन्मात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये शिवाची वैशिष्ट्ये होती, तर या जन्मात श्रीविष्णूची वैशिष्ट्ये आहेत ! : ते त्यांच्या गेल्या जन्मापासूनच वैराग्यपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न करत होते; परंतु त्यांच्यातील महत्त्वाकांक्षा आणि आक्रमकता यांमुळे त्यांचा संघर्ष होत असे. त्यांचा राग आणि आक्रमकता ही भगवान शिवाप्रमाणेच होती. गेल्या जन्मात त्यांच्यात भगवान शिवाची वैशिष्ट्ये होती, तर या जन्मात त्यांची आध्यात्मिक रेषा ही श्रीविष्णूची वैशिष्ट्ये दर्शवते. त्यांची सूर्य रेषा बलवान असून ती नावलौकिक, कीर्ती आणि विवेक (ज्ञान) दर्शवते.
१ ओ. गेल्या जन्मातही ते (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व होते.’
– सुनिता शुक्ला, हस्तरेषातज्ञ, ऋषिकेश, उत्तराखंड.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उजव्या हातावरील रेषांचे परीक्षण
‘उजव्या हातावरील रेषा या व्यक्तीच्या चालू (वर्तमान) जन्माविषयी सांगतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उजव्या हातावरील रेषांच्या परीक्षणाची (वर्तमान जन्माविषयीची) सूत्रे पुढे दिली आहेत.
२ अ. या जन्मात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना उशिरा (४० व्या वर्षी) आरंभ होणे आणि त्यांचा भाग्योदय विदेशात होणे : मागील जन्मातील सर्व बलस्थाने आणि दुर्बलता यांसहित त्यांनी हा जन्म घेतला आहे. त्यांनी यापूर्वीच त्यांच्या चक्रांची शुद्धी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; परंतु मानवजातीला साहाय्य करण्याच्या अपूर्ण इच्छेमुळे त्यांच्या मूलाधारचक्राची शुद्धी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे या जन्मात त्यांच्या साधनेला उशिरा (४० व्या वर्षी) आरंभ झाला. ते विदेशात (७ वर्षे) राहिले असल्याचे त्यांच्या हस्तरेषा दर्शवतात. विदेशात असतांनाच त्यांनी त्यांच्या साधनेला आरंभ केला. त्यांना विदेशात राहून त्यांचे ध्येय गाठणे शक्य झाले नसले, तरी त्यांच्या भाग्योदय तेथे झाला. त्यांचा आध्यात्मिक प्रवास तेथून चालू झाला असला, तरी त्यांना तेथे साधनेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मर्यादा असल्याने ते भारतात परतले. गेल्या जन्मातील त्यांची अपुरी इच्छा त्यांनी भारतात येऊन मूर्तरूपात आणली.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना कशाचीच आसक्ती नसणे : त्यांच्या हाताच्या कडेला रेषा नाहीत; म्हणजे त्यांना कशाचाच मोह नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परमार्थाचा मार्ग निवडला आहे.
२ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आयुष्यात २-३ वेळा गंडांतर (अपमृत्यूचे योग) आलेले असणे : त्यांची आयुष्य रेषा २-३ ठिकाणी खंडित झालेली असून ती मंगळाच्या उंचवट्यावरून येते. यामुळे त्यांच्या आयुष्यात २-३ वेळा गंडांतर आले असावे किंवा तीव्र शारीरिक त्रास झाले असावेत. त्यांच्यावर झालेले शेवटचे आक्रमण हे त्यांच्यासाठी वरदान बनून त्यांचे रक्षण झाले आहे. ते आक्रमण त्यांच्या प्रारब्धानुसार होते; परंतु त्यांना मिळालेल्या असंख्य आशीर्वादांमुळेच ते त्यातून बाहेर येऊ शकले. आता त्यांच्या जिवाला कोणताही धोका नाही.
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या उजव्या हातावरील सर्व रेषा फिकट होणे : त्यांच्या उजव्या हातावरील सर्व रेषा फिकट होत चालल्या आहेत; परंतु त्यांच्या डाव्या हातावरील (पूर्वजन्माशी संबंधित) रेषा ठळक आणि खोल आहेत. त्यांच्या सर्व कर्मांचा (संस्कारांचा) क्षय होत आला आहे. त्यांच्या हातावरील ‘संस्कार-रेषा’ अजूनही ठळक आहेत. त्यांचे साधारणतः १० टक्के संस्कार शिल्लक आहेत.
२ उ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या तळहातांवर विशेष चिन्हे असणे : त्यांना श्रीविष्णूचा आशीर्वाद आहे. त्यांच्या डाव्या तळहातावर त्रिशूळ आहे. याचा अर्थ गेल्या जन्मात त्यांना भगवान शिवाचे आशीर्वाद प्राप्त झाले होते. त्यांच्या उजव्या तळहातावर श्रीयंत्राप्रमाणे एक नक्षत्र असून त्याभोवती पंचकोनाचा आकार आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती अध्यात्माच्या क्षेत्रात नक्षत्राप्रमाणे झळकत असतात. त्यांच्या सर्व बोटांवरील रेषा वरच्या दिशेने जात आहेत. या सर्व सकारात्मक रेषा आहेत.
२ ऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता असणे : त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीच्या खाली असलेल्या बुधाच्या उंचवट्यावर पुष्कळ रेषा आहेत. या रेषा अंतःस्फूर्ती आणि सूक्ष्म ज्ञान दर्शवतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अफाट आहे. त्यांची बुधाची रेषाही ठळक आहे. मागील जन्माच्या अनुभवावरून त्यांना या जन्मी पैसे मिळवण्याची इच्छा झाली नाही; मात्र भाग्य आणि प्रारब्ध यांनुसार त्यांच्याकडे पैसा येत राहील. तरीही पैशाच्या तुलनेत त्यांचे लक्ष ज्ञानाकडे अधिक आहे. संस्थेच्या आरंभापासूनच त्यांनी पैशांची व्यवस्था इतरांना पहाण्यास सांगितली असावी. (असे आहे. – संकलक)
२ ए. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिये’चे जनक असणे : मागील जन्मात त्यांचे जीवन रज-सत्त्व-तम (रज-सत्त्वप्रधान किंवा राजसिक) असे होते. या जन्मात त्यांचे जीवन सत्त्व-रज-तम (सत्त्वप्रधान किंवा सात्त्विक) असे आहे. त्यांच्या गेल्या जन्मातील राजसिक संस्कार घालवणे, हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता. इतरांनाही त्यांच्या अंतर्मनातील संस्कार घालवायला साहाय्य व्हावे, यासाठी त्यांनी ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ शोधून काढली आहे. स्वतःचा संघर्ष आणि अनुभव यांच्या आधारे त्यांनी याची निर्मिती केली आहे. गेल्या जन्मात भगवान शिवाप्रमाणे त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला असून या जन्मात श्रीविष्णूप्रमाणे मानव समाजाला एक सुसंस्कृत जीवनशैली देऊन त्यांना साहाय्य करायचे आहे. श्रीविष्णुसमवेत श्रीलक्ष्मीही आहेच. त्यामुळे ते करत असलेल्या कार्यास धनाची कमतरता कधीच भासणार नाही.
२ ऐ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी आश्रमाच्या वास्तूसाठी पुष्कळ त्याग केलेला असणे : त्यांचा हात आश्रमाच्या वास्तूचा आकार दर्शवतो, तसेच आश्रमाचा विस्तार करण्याचा विचार चालू असल्याचे दर्शवतो; परंतु त्यात अनेक अडचणी असण्याची शक्यता असल्याने ते पूर्णत्वाला जात नाही. कदाचित् निधीची कमतरता असावी किंवा लक्ष अन्य ठिकाणी केंद्रित असावे. कोणत्या तरी कारणामुळे विस्ताराचे काम थांबले आहे; परंतु ते लवकर पूर्ण होईल.
आश्रमाच्या वास्तूच्या आकाराभोवती अनेक रेषा आहेत. या रेषा त्यांनी आश्रमाच्या वास्तूसाठी पुष्कळ त्याग केला असल्याच्या दर्शक आहेत. एक पुसटशी रेषाही दिसते, ज्यामुळे अनेक विदेशी लोक साधनेसाठी आश्रमात येत आहेत. ही रेषा आध्यात्मिक संशोधन केंद्राच्या वास्तूच्या दिशेने जात आहे.
२ ओ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये सर्वांप्रती प्रीती असणे : त्यांची ‘हृदय-रेषा’ लुप्त होत आहे; कारण त्यांची आसक्तीविषयीची संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे. त्याच समवेत ती गडद आणि ठळकही आहे, जी त्यांची इतरांबद्दल असलेली प्रीती दर्शवते. त्यांची ‘हृदय-रेषा’ ही ‘विवाह-रेषे’कडे जाणारी नसल्यामुळे त्यांच्यामध्ये त्या प्रकारची आसक्ती नसून तिचे रूपांतर सर्वांप्रती असलेल्या सात्त्विक प्रेमात (प्रीतीमध्ये) झाले आहे.
२ औ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामध्ये श्रीविष्णूची वैशिष्ट्ये असणे : त्यांचा अंगठा त्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि सुस्पष्ट तर्क (विचारप्रक्रिया) दर्शवतो. त्यांच्या ‘मणिबंधा’वरून (मनगटावरील रेषांना ‘मणिबंध’ असे म्हणतात.) लक्षात येते की, त्यांचे विचार, रहाणीमान आणि ते करत असलेले कार्य यांत सुस्पष्टता आहे. श्रीविष्णूप्रमाणे त्यांचे सर्व सुव्यवस्थित असते. त्यांचे व्यवस्थापन बुद्धीमत्तेने (विवेकपूर्वक) केलेले असते. त्यांचे मुखमंडल श्रीविष्णूप्रमाणे सहजसुंदर आणि हसरे आहे. श्रीविष्णूची वैशिष्ट्ये त्यांच्या मुखमंडलावर पहायला मिळतात.
२ अं. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे एक स्वतंत्र आत्मा असून ते कुणावरही अवलंबून नाहीत ! : त्यांची ‘मस्तक-रेषा’ अतिशय तीक्ष्ण असून त्यात कोणताही अडथळा नाही. त्यांची विचारप्रक्रिया सुस्पष्ट आणि सखोल आहे. ते कुणावरही अवलंबून नाहीत. ते एक स्वतंत्र आत्मा आहेत. त्यांच्या सभोवताली अनेक लोक त्यांच्या साहाय्यासाठी असले, तरी ते कुणावरही अवलंबून नाहीत. त्यांना असेच स्वतंत्र रहायला आवडते.
२ क. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे अध्यात्माच्या क्षेत्रात अग्रेसर असतील ! : त्यांचा हात ‘ते अध्यात्माच्या क्षेत्रात अग्रेसर असतील’, असे दर्शवतो. त्यांच्या हातावर नावलौकिक, कीर्ती, समृद्धी, विद्वत्ता आणि सुस्पष्टता दर्शवणारी उत्तम प्रतीची सूर्य रेषा आहे. या सर्वांची अशा स्वरूपाची आध्यात्मिक संस्था चालवण्यासाठी आवश्यकता असते.’
– सुनिता शुक्ला, हस्तरेषातज्ञ, ऋषिकेश, उत्तराखंड.
डिसेंबर २०२३ च्या तुलनेत फेब्रुवारी २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उजव्या हातावरील रेषांत गतीने पालट होणे
१. ‘त्यांच्या हातावरील रेषा जलद गतीने पालटत आहेत आणि ते असेच चालू राहील. सर्वसाधारण व्यक्तीतील हस्तरेषांमध्ये पालट होण्यास ६ मास लागतात; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जीवनकाळ समाप्तीकडे (मृत्यू कधी आहे? – सुनिता शुक्ला यांनी सांगितले की, ‘सध्या त्यांचा याविषयी नेमकेपणाने अभ्यास नाही. त्यामुळे त्या ‘मृत्यू कधी आहे ?’, हे सांगू शकत नाहीत; पण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जिवाला आता आक्रमणांचा धोका मुळीच नाही. तसेच ते जे काही कर्म (कार्य) करतील त्याला १०० टक्के यश मिळेल हे निश्चित !’) जात असल्यामुळे हे पालट जलद गतीने होत आहेत.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले जे विचार करतील त्यानुसार त्यांच्या उजव्या हातावर ठळकपणे रेषा उमटतील.
३. डिसेंबर २०२३ मध्ये त्यांच्या हातावरील आश्रमाची वास्तू दर्शवणार्या रेषा एवढ्या स्पष्ट नव्हत्या; मात्र आता त्या अधिक स्पष्ट दिसतात. त्यामुळे अलीकडे त्यांनी आश्रमाच्या विस्ताराविषयी विचार केलेला असावा. (यासंदर्भात कार्य चालू आहे.- संकलक)
– सुनिता शुक्ला, हस्तरेषातज्ञ, ऋषिकेश, उत्तराखंड.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला सूक्ष्म-जगत् असे संबोधतात. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |