‘भूतलावरील अवतारी युगपुरुष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे केवळ त्यांच्या स्थूल अवतारी देहाचा जन्मोत्सव नव्हे, तर शाश्वत चैतन्यदायी परब्रह्माचे तत्त्व जगताच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतरले, तो दिव्य दिवस ! श्री गुरूंचा जन्मोत्सव म्हणजे सर्व साधकांच्या जीवनातील सुमंगलदिन ! गुरूंचा ८२ वा जन्मोत्सव साजरा करण्याची संधी आम्हा भाग्यवान साधक-जिवांना प्राप्त होत आहे. खरेतर गुरुदेव विश्वगुरु असल्यामुळे केवळ साधकच नव्हे, तर चराचर सृष्टीतील सर्व जण श्री गुरूंच्या जन्मोत्सवाचा सोहळा आणि त्याचा आनंद अनुभवत असतात. अशा परम कृपासागर श्री गुरूंचे अनुपमेय माहात्म्य अनुभवत आणि त्यांच्या कृपासागरातील काही भक्तीमय थेंबांनी भक्तीअर्चना करत श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी हे लेखरूपी स्तुतीपुष्प श्री गुरुचरणी अत्यंत शरणागतीने अन् कृतज्ञतेने समर्पित करत आहे.
आदिगुरु महादेवाच्या मुखातून प्रगटलेल्या ‘श्री गुरुगीते’तील एका श्लोकामध्ये म्हटले आहे,
आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तम्।
योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि।। – गुरुगीता, श्लोक ९३
अर्थ : आनंदस्वरूप, आनंददाता, प्रसन्नमुख, ज्ञानस्वरूप, आत्मबोधयुक्त, योगीश्वर, स्तुती करण्यास योग्य, संसाररूपी रोगावर रामबाण औषध देणारा वैद्य, अशा श्री गुरूंना मी नित्य नमस्कार करतो.
हा श्लोक वाचतांना मला गुरुदेवांचे स्मरण झाले आणि ‘या श्लोकात गुरूंचे केलेले वर्णन सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अवतारी कार्य आणि वैशिष्ट्ये यांच्याशी मिळतेजुळते आहे’, असे माझ्या लक्षात आले.
१. आनंदस्वरूप आणि आनंददाता
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे स्वतः आनंदस्वरूप तर आहेतच; पण ते सार्या सृष्टीला आनंद देणारे आनंददाताही आहेत. ते केवळ आनंदच नाही, तर परमानंद आणि सच्चिदानंदही प्रदान करणारे आहेत; म्हणूनच सप्तर्षींनीही जीवनाडीपट्टीमध्ये त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी देण्यात आल्याचे सांगितले. ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’ शिकवणारे गुरुदेव हे या कलियुगातील एकमेवाद्वितीय आहेत. असे आनंददाता गुरुदेव जीवनात आल्यामुळे साधकांचे जीवन आनंदाने भरून गेले आहे.
२. प्रसन्नमुख
प्रत्येक स्थितीमध्ये गुरुदेवांचे मुखमंडल प्रसन्नच असते. कोणतेही संकट आले, तरी त्यांच्या चेहर्यावरील हास्य कधीही मावळत नाही. त्यांच्या त्या प्रसन्नवदनाकडे पाहून कित्येक साधक आश्वस्त होतात. एवढेच नव्हे, तर जेव्हा साधक अडचणी, संकटे किंवा कठीण प्रसंग यांमध्ये अडकलेले असतात, तेव्हा केवळ गुरूंच्या प्रसन्नवदनाच्या स्मरणानेही त्यांना धैर्य मिळते. कधी साधकांना गुरूंचे स्मरण झाले नाही, तरी विविध अनुभूतींच्या माध्यमातून गुरुदेव स्वतःच प्रसन्नवदनाने त्यांना सूक्ष्मातून दर्शन देऊन आश्वस्त करतात. त्यांचे हे प्रसन्न मुखच साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि संकटात धैर्य अन् आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते.
३. ज्ञानस्वरूप
पृथ्वीतलावर कुठेही उपलब्ध नसलेल्या अध्यात्मशास्त्रावरील ज्ञानाची गंगोत्री गुरुदेवांच्याच कृपेने कार्यरत झाली आहे. हे ज्ञानामृत अखिल मानवजातीसाठी उपलब्ध होत आहे. अध्यात्मातील गूढ रहस्ये अथवा अध्यात्माच्या संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरे गुरुदेवांनी आरंभी ध्यानाद्वारे स्वतः शोधून काढण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांच्या कृपेने सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या काही साधकांमध्ये सूक्ष्म ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता गुरुकृपेने निर्माण झाली. ईश्वराकडून प्राप्त झालेले हे दैवी ज्ञान गुरुदेवांनी सामान्य लोकांना समजेल, अशा भाषेत शेकडो ग्रंथांच्या रूपात जगताला दिले. सनातनचे ग्रंथ हे रामायण, गीता, भागवत या ग्रंथांप्रमाणेच धर्मग्रंथ आहेत. हे ग्रंथ ज्ञानस्वरूप गुरुदेवांचे स्वरूप आहे.
४. आत्मबोधयुक्त (आत्मसाक्षात्कार झालेला, परमात्म्याला जाणणारा)
‘साधना करून मोक्षप्राप्ती करणे’, हाच पृथ्वीतलावर जन्म घेणार्या मानवांचा एकमात्र उद्देश आहे’, असा आत्मबोध श्री गुरूंनी साधकांना दिला आहे. ते स्वतःच ईश्वराचे अवतार आहेत; मात्र जगताला शिकवण्यासाठी साधनेच्या आरंभी त्यांनी विविध संतांकडे जाऊन आत्मबोध घेतला. गुरूंची ही कृती म्हणजे त्यांचीच एक दैवी अवतारी लीला म्हणावी लागेल. त्यांनी दिलेला आत्मबोध आणि त्यासाठी सांगितलेले प्रयत्न (साधना) साधकांसाठी गुरुमंत्रासमान आहे. त्या आत्मबोधाचे श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त आचरण केल्याने साधकांना आत्मकल्याण साधणे सुलभ होत आहे.
५. योगीश्वर
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी गुरुकृपायोगाची निर्मिती केली आहे. ते गुरुकृपायोगाचे जनक आहेत. ‘गुरुकृपायोग’, या साधनामार्गात त्यांनी कर्म, ज्ञान आणि भक्ती या योगांचा सुरेख संगम साधला आहे. त्यामुळे या एकाच योगमार्गानुसार साधना करतांना साधकांकडून सर्व योगमार्गांची साधना होत असते. असा हा अनमोल योगमार्ग निर्मिलेल्या गुरुदेवांसाठी ‘योगीश्वर’ ही उपाधी यथार्थ आहे.
६. संसाररूपी रोगावर रामबाण औषध देणारा वैद्य
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज हे त्यांना ‘डॉक्टर’ असे संबोधत असत. ‘डॉक्टर’ या इंग्रजी शब्दासाठी मराठी भाषेत ‘आधुनिक वैद्य’ हा प्रतिशब्द आहे. ‘वैद्य’ हे श्रीविष्णूच्या सहस्र नामांपैकी एक नाम आहे. ‘वैद्यो नारायणो हरिः।’ म्हणजे ‘खरा वैद्य तो श्रीमन्नारायण हरिच आहे’, असे वचन आहे. तोच नारायण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे रूप धारण करून या भूतलावर अवतरला आहे. ‘संसाररूपी व्याधी’, हेच जिवांच्या दुःखाचे मूळ कारण आहे. त्यापासून मुक्त होण्यासाठी गुरुदेवांनी साधनारूपी रामबाण औषध दिले आहे; म्हणूनच ‘संसाररूपी रोगावर रामबाण औषध देणारा वैद्य’, ही उपाधी गुरुदेवांसाठी लागू पडते. जन्म-मरणरूपी घोर चक्रात पुनःपुन्हा अडकणार्या जिवांची ही मूळ व्याधी जाणून त्यावर साधनारूपी योग्य उपाय सांगणारे गुरुदेव या भूलोकातील एकमेवाद्वितीय आध्यात्मिक डॉक्टर / वैद्य आहेत.
७. स्तुती करण्यास योग्य
अशी अनेक गुणवैशिष्ट्ये असल्यामुळेच सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव हे अखिल जगतातील सर्वांकडून स्तुती करण्यास योग्य आहेत.
‘हे गुरुदेवा, आपण अविनाशी तत्त्व असलेल्या साक्षात् परब्रह्माचा अवतार आहात. भूतलावर आपल्या रूपाने कार्यरत असलेले दिव्य परब्रह्माचे तत्त्व आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत ग्रहण करता येऊ दे आणि आपण हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याच्या रूपाने भूतलावर रोवलेला धर्मध्वज अवघ्या विश्वभरात सर्वत्र फडकवता येऊ दे. हे गुरुनाथा, जोपर्यंत हे आकाशमंडल आहे, सूर्य, चंद्र आणि तारे आहेत, तोपर्यंत आमचे आपल्या श्री चरणी नित्य कोटी कोटी नमन !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी) (१६.५.२०२४)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या / संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |