Gadkari Lack Of Honest Leaders : भारतात देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या नेत्यांची कमतरता ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चंडीगड – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बोलतांना मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, भारतात पैशांची नव्हे, तर देशासाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या नेत्यांची कमतरता आहे.


नितीन गडकरी पुढे म्हणाले की,

मी वर्ष १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या सरकारमध्ये मंत्री होतो. मुंबईत वरळी-वांद्रे सी लिंक बांधण्याचे भाग्य मला मिळाले. मी मुंबईत ५५ पूल बनवले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बनवण्याचेही दायित्व मी पार पाडले. तेव्हा माझ्या खात्याकडे पैशांची कमतरता होती. त्या वेळी रिलायन्स आस्थापनाची ३ सहस्र ६०० कोटी रुपयांची निविदा मी रहित केली. आज तिची किंमत ४० सहस्र कोटी रुपयांच्या घरात आहे. मी ती निविदा रहित केल्यानंतर फार वाद झाला. मला सांगायला आनंद होतो की, आम्ही शेअर बाजारातून पैसे उभे केले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासारखी संस्था निर्माण केली. आम्ही ६५० कोटी रुपये जमवायला गेलो होतो; पण आम्हाला १ सहस्र १५० कोटी रुपये मिळाले. या एका प्रसंगाने मला शिकवले की, देशात पैशांची कमतरता नाही. मी केंद्रात मंत्री असतांना आतापर्यंत ५० लाख कोटी रुपयांचे काम केले आहे. तरीही आणखी २० ते २५ लाख कोटी रुपयांचे काम मी करू शकलो असतो; पण ते झाले नाही, याची सल माझ्या मनात आहे.

संपादकीय भूमिका

ही आहे भारतातील नेत्यांची स्थिती ! यावरून भारतातील नेते नाही, तर निःस्वार्थी संतच देशाला पुढे नेऊ शकतात, हे लक्षात घ्या !