लोकशाहीच्या उत्सवातील गोंधळ ! 

धारावी (मुंबई ) येथील मतदान केंद्राच्या बाहेरील एक दृश्य

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतील पाचव्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सरकारसह, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी यंदा बराच घाम गाळला. त्यासाठी सामाजिक माध्यमे, तसेच तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करण्यात आला. देशातील महनीय व्यक्तींच्या संदेशांसह बस स्टँड, रेल्वेस्थानके येथेही उद्घोषणा करून मतदानाचे आवाहन करण्यात आले; मात्र मुंबईतील मतदानाचा टक्का पन्नाशीही पार करू शकला नाही. मतदारांतील निरुत्साह यंदा पुन्हा दिसला आणि उत्साही मतदारांची ठिकठिकाणी घोर निराशा झाल्याचे चित्रही अनेक ठिकाणी दिसले. बर्‍याच तरुण मतदारांची नावे सूचीत समाविष्टच करण्यात आली नव्हती, कितीतरी मतदारांची नावे नेहमीप्रमाणे गायब झाली होती.

मुंबईच्या बाहेर गेलेले अनेक जण मतदानासाठी मुंबईत आले होते, त्यांना मतदान न करताच परतावे लागले. घरातील एका सदस्याचे नाव मतदार सूचीत नाव नसेल, तर ते शोधण्यात केंद्रावर बसलेल्यांची दमछाक होत होती. या गोंधळाने केंद्रावर मोठे घोळके झाले होते. ठाणे आणि नालासोपारा या ठिकाणी १ लाखांहून अधिक मतदारांची नावे मतदार सूचीतून लुप्त झाली होती. त्यामुळे मतदार संतापले. अनेक ठिकाणी मृत व्यक्तींची नावे होती. यात बोगस मतदानाचा हेतू तर नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात होती. काही मतदान केंद्रांवर बोगस मतदान केले जात असल्याचा आरोप करत राजकीय नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही मतदारांची नावे यंदा भलत्याच मतदान केंद्रांना जोडली गेल्याने त्यांना विनाकारण धावपळ करावी लागत होती. काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याने विलंब झाला. अशा सर्व गोंधळामुळे मतदारांना ३ ते ४ घंटे रांगेत ताटकळत उभे रहावे लागले. त्यामुळे अनेक मतदार अप्रसन्न झाले होते. उन्हाच्या झळा आणि त्यात शासनाचा भोंगळ कारभार यांमुळे अनेकांनी वैतागून मतदान करण्याचे टाळत घरचा रस्ता धरला. अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचार्‍यांना मतदान करता यावे यासाठी कार्यालयात २ घंटे विलंबाने येण्याची मुभा दिली होती. अशांचे रांगेतच ४ घंटे वाया गेल्याने काहींनी मतदान न करताच कामावर जाणे पसंत केले. मतदानासाठी नियुक्त केलेले कर्मचारी पुरेसे प्रशिक्षित नसल्याने मतदान संथगतीने होत होते, तर काही ठिकाणी मुद्दामहून गती संथ केल्याचा आरोप करण्यात आला. अनेक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णाईत यांना आसंद्या, स्वच्छतागृहे इत्यादींची योग्य सोय नव्हती. सर्वांत मोठ्या लोकशाही असलेल्या देशात लोकशाहीच्या उत्सवात असा गोंधळ होणे कितपत योग्य ?

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.